ठाण्यातले रामायण : कोण राम कोण रावण :
आज जेथे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत तेथे आधी अजित पवार होते म्हणजे शरद पवार सांगतील त्याच्या अंगावर दादा धावून जायचे त्यातूनच दादांचे विशेषत: बारामती लोकसभा मतदार संघात पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात अनेकांशी संबंध बिघडले कायमचे दुरावले ज्यातून अलीकडे विजय शिवतारे हर्षवर्धन पाटील इत्यादी विरोधकांशी तोंडमिळवणी करतांना दादांच्या नाकात दम आला किंबहुना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस दादांच्या मदतीला धावून आले नसते या दोघांनी मध्यस्थी करून दादांविषयी झालेले असलेले गैरसमज दूर केले नसते तर बारामती लोकसभा मतदार संघाचा निकाल आधीच लागला असता, सुप्रिया सुळे प्रचार न करता सहज निवडून आल्या असत्या पण फडणवीस शिंदे दोघांची मध्यस्थी एवढी कामाला आली कि यादिवसातले शिवतारे म्हणजे प्रेयसीच्या लग्नात कोठीघर सांभाळणाऱ्या प्रियकरासारखे स्वतःच्या हाती अख्ख्या प्रचाराची सूत्रे घेऊन, प्रकृतिस्वास्थ्याकडे दुर्लक्ष करीत अगदी घरचे कार्य असल्यासारखे स्वतः सतत राबताहेत ज्याची मधुर फळे पुढे त्यांना नक्कीच चाखायला मिळतील, तसा शब्द त्यांना किंवा हर्षवर्धन पाटलांना देखील मिळाला आहे विशेषतः बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवारांचे आजतागायतचे तावरे पद्धतीचे ताकदवान विरोधक किंवा विजय शिवतारे हर्षवर्धन पाटील इत्यादी एकत्र येत ज्यापद्धतीने शरद पवार यांच्या नाजूक तोंडाला फेस आणताहेत, फडणवीसांची चाणक्य नीती आणि राजकीय कौशल्य त्यात दडलेले कसे तो गौप्य्स्फोट मी नक्कीच एक दिवस करणार आहे…
www.vikrantjoshi.com
गाढवाच्या मागून आणि शरद पवारांच्या पुढून कधीही जायचे नसते हे जसे आत्ताआतापर्यंत अजित पवारांच्या लक्षात आले नव्हते नेमके तेच जितेंद्र आव्हाड यांच्याही बाबतीत घडणार आहे त्यात जितेंद्र आव्हाड तर अजित पवारांच्या कित्येक पावले पुढे म्हणजे पवारांनी उभा राहा सांगायचा अवकाश कि आव्हाड उभे राहून जागच्या जागी उड्या मारायला लागतात, चालायला लागा पवारांनी सांगायचा अवकाश कि पुढल्या क्षणी धावत सुटतात पण नेमके जे दादांच्या किंवा अनेक महत्वाकांक्षी नेत्यांच्या बाबतीत घडले तेच पुढे आव्हाडांना देखील नक्की भोगावे लागणार आहे, कारण आव्हाड पवारांच्या पुढे पुढे करीत पुढे जाण्याचा केविलवाणा प्रयत्न अनेक प्रसंगात करतांना काकांनी हेरले आहे, आपल्यासाठी काहीही नाही सारेकाही पोटच्या सुप्रियासाठी हे जसे दादांच्या उशिरा लक्षात आले तेच एक दिवस नक्की आव्हाडांच्या देखील ध्यानात येणार आहे ज्यावेळी हात चोळत बसण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीही उरलेले नसेल त्यांचा देखील पदमसिंह पाटील दत्ता मेघे किंवा अजितदादा झालेला असेल. ठाण्यातल्या जाणकारांच्या मते आव्हाडांच्या देखील पवारांचे वापरून घेणे अलीकडे बऱ्यापैकी लक्षात आलेले आहे म्हणून यावेळी लोकसभा निवडणूक प्रचारात समोर प्रताप सरनाईक आणि डॉ श्रीकांत शिंदे असे दोघेही कट्टर विरोधक आणि दुश्मन निवडणूक लढवीत असतांना आव्हाडांचा तो अक्राळविक्राळ चेहरा कुठेही या दोघांच्या अंगावर धावून येतांना दिसत नाही पण वेळ बरयापैकी निघून गेलेली आहे, आव्हाड विरोधात सारेच नेते आधी एकवटले नंतर त्यांनी आव्हाडांच्या जवळचे सहकारी नेते फोडले त्यातून आव्हाड यांना आधी त्यांच्या कळवा मुंब्रा विधानसभा मतदार संघात क्षयरोगी केले, ज्या मुसलमान मतदारांसाठी आव्हाड स्वतः तेवढा मुस्लिम धर्म स्वीकारणे त्यांनी बाकी ठेवले होते आज त्याच मुंब्र्यातले मुसलमान आव्हाडांकडे पाठ करीत त्यांना एकटे पाडत इतरत्र वळले आहेत…
जितेंद्र आव्हाडांचा विधान सभा मतदार संघ कळवा मुंब्रा नावाने ओळखल्या जातो पैकी मुंब्रा परिसरात जशी मुसलमानांची दादागिरी किंवा मोनापली आहे तदवत कळव्यात मोठ्या संख्यने आगरी समाज पसरला आहे जेथे साळवी कुटुंबाचे गेली कित्येक अनेक वर्षे नेतृत्व अबाधित आहे, जसे मुस्लिम आव्हाडांमध्ये आवडता नेता म्हणून बघत होते तेच नेमके कळव्यातल्या आगरी समाजाचे घडल्याने असल्याने त्याचा मोठा फायदा आमदारकीच्या निवडणुकीत हमखास आव्हाडांना होत असे ते अगदी सहज निवडून यायचे दुदैवाने एकाचवेळी यावेळी यादिवसात मुस्लिम व आगरी दोघेही आव्हाडांपासून दूर गेल्याचे चित्र आहे त्यात नजीब मुल्ला, मंदार केणी, राजन किणे आणि साळवी कुटुंबीय का कोण जाणे पण आव्हाड यांच्यापासून दुरावले आहेत यांचा आता आव्हाडांना कट्टर शत्रूगत विरोध आहे, बरे झाले आव्हाड शांत आहेत, कठीण प्रसंगी चतुर नेता चार पावले मागे येतो, आव्हाड खूपच चाणाक्ष आणि चतुरही आहेत पण आव्हाडांचे यावेळी शांत असणे विशेषतः सरनाईक आणि शिंदे या त्यांच्या दोन्ही कट्टर शत्रूंना निवडणूक जिंकणे अधिक सोपे झालेले आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी