मंत्री आणि मंडळी : पत्रकार हेमंत जोशी
पवारांनी माजी राज्यमंत्री दीपक केसरकारांवर नेम धरला आणि गेम केला, फायदा उदय सामंतांना झाला ते थेट मंत्री झाले भास्कर जाधव आणि दीपक केसरकर आता निदान पाच वर्षांसाठी तरी राजकीय अडगळीत पडले सापडले. उद्धव ठाकरेंशी लॉयल्टी ठेवण्याची बक्षिशी दीपक केसरकर यांना मिळाली नाही त्यामुळे ते अस्वस्थ आहेत नाखूष आहेत नाराज आहेत पण केसरकारांचा गेम करण्यात उदय सामंत यांचा कुठेही कोणताही हात नाही नव्हता, वास्तविक सिंधुदुर्ग जिल्ह्यातले दीपक केसरकर व रत्नागिरी जिल्ह्यातले उदय सामंत आणि भास्कर जाधव हि तिघेही माजी राज्यमंत्री तसे शरद पवारांचे एकेकाळचे लाडके आणि राष्ट्र्वादीतले रीतसर नेते देखील होते पण काळाच्या ओघात तिघेही शरद पवारांना सोडून राष्ट्रवादीचा त्याग करून उद्धवजींना झोंबून बिलगून मोकळे झाले थोडक्यात तिघेही शिवसेनेत आले. शिवसेनेत आल्यानंतर उदय सामंत यांनी जरी लॉयल्टी मातोश्रीशी ठेवली तरी त्यांनी त्यांचे पूर्वीचे काही व्यवसायिक संबंध पवार कुटुंबियांशी तोडले नाहीत त्यामुळे या ना त्या निमित्ताने ते सतत अनुक्रमे अजितदादा, सुप्रियाताई आणि थेट शरद पवार यांच्या कायम संपर्कात असायचे….
www.vikrantjoshi.com
माझा एक मित्र आहे तो सरकारी अधिकारी आहे, त्याने अलीकडे पहिल्या बायकोशी घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केले आहे तरी तो अधूनमधून चेंज म्हणून पहिल्या बायकोच्या संपर्कात असतो. इकडे पप्पी आणि तिकडे मुका घेतो. उदय यांचे हे असे नेमके झाले आहे म्हणजे त्यांनी जरी राष्ट्रवादीशी फारकत घेतलेली आहे आणि सेनेशी नवा घरोबा केला आहे तरी ते अधून मधून राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटून येतात यायचे त्यामुळे उदय सामंतांचा गेम पवारांनी केला नाही, सामंत अगदी सहज मंत्री झाले. राष्ट्रवादीतून बाहेर पडणे भास्कर जाधव व दीपक केसरकर या दोघांनाही चांगले हा महागात पडले. माझी नेमकी तंतोतंत खरी माहिती अशी, आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या घरातून जरी हाक मारली तरी ती गोव्यात ऐकायला जाते एवढा त्यांचा विधानसभा मतदारसंघ गोव्याला लागून आहे किंबहुना त्यांच्या मतदारसंघात बहुसंख्य मतदारांचे नातेवाईक गोव्यात स्थायिक आहेत आणि दर दिवशी जवळपास केसरकारांचे पाच हजार मतदार गोव्यात नोकरी व्यवसायानिमीत्ते जाणे येणे करतात, या अशा घरोब्यातून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी तेही थेट पंतप्रधानकाकडे केसरकर यांना नेऊन भाजपामध्ये येण्याची गळ घातली होती, कॅबिनेट मंत्री करण्याचे त्यांनी तसे सांगितले देखील होते विशेष म्हणजे तोपर्यंत नारायण राणे यांना भाजपा मध्ये प्रवेशासाठी वेटिंगवर ठेवण्यात आले होते…
दीपक केसरकर राज्यमंत्री होते त्यांना तेही भाजपामध्ये कॅबिनेट दर्जा मिळणार होता पण केसरकर यांनी लॉयल्टी जपली ती थेट उद्धव ठाकरे यांच्याशी, त्यांनी शिवसेना न सोडता म्हणजे मोहाला बळी न पडता पंतप्रधानांना सेने सोडणार नाही, सांगितले पण पुढे मात्र त्यांच्या बाबतीत नेमके विपरीत घडले. पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपा युती असतांना देखील श्री नारायण राणे आणि भाजपा नेत्यांनी केसरकारांचा वचपा काढण्यासाठी बदला घेण्यासाठी स्थानिक प्रभावी नेते राजन तेली यांना अपक्ष उभे करून पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली तरीही दीपक केसरकर विजयी झाले, पुन्हा आमदार झाले. मी केवळ शिवसैनिक व उद्धवजींच्या लॉयल हे दाखवून दिले मात्र त्यांना त्यांच्या लॉयल्टीचे यावेळी फळ मिळाले नाही. जाधव व केसरकर यांना बाजूला ठेवावे तसे म्हणे थेट पवारांनीच उद्धव ठाकरे यांना सुचविले होते. अर्थात सारे काही उदय सामंत यांच्या मनासारखे झाले असेही नाही, त्यांच्याही बाबतीत खासदार विनायक राऊत यांनी मोठा घोळ निर्माण करून ठेवलेला आहे. त्यांनी उदय सामंत यांच्याकडे त्यांच्या रत्नागिरीचे पालकमंत्रिपद न देता त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी टाकून सामंत यांचे वर्चस्व कसे कमी करता येईल ते बघितले आणि रत्नागिरी जिल्हा पालकमंत्रिपद अनिल परब यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. थोडक्यात जाधव, केसरकर आणि सामंत तिघेही आपल्याजागी सुखी आणि समाधानी नाहीत, सारेच मनातून अस्वस्थ आहेत…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.