अविनाश देशपांडे : कृषी उत्पन्न बाजार समिती: पत्रकार हेमंत जोशी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती गुंडागिरीचे आणि भ्रष्टाचाराचे आगर आहे तेथे शासनाला, शेतकऱ्यांना लुटले जाते लुबाडले जाते फसविले जाते नागविले जाते म्हणून हा तेथल्या काही वाईट प्रवृत्तीविरुद्ध आमचा लढा. सध्या एमएमआरडीए मध्ये कार्यरत असलेले पण त्याआधी कित्येक वर्षे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तळ ठोकून कोट्यवधी रुपयांचा मलिदा जमा करणारे कार्यकारी अभियंता रमेश खिस्ते असोत, सध्याचे अधीक्षक अभियंता विलास बिरादार असोत अथवा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून अलीकडे सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधून वर्ग झालेले अट्टल दरोडेखोर अविनाश देशपांडे असोत,या अशा तद्दन खादाड अधिकाऱ्यांच्या मागे लागणे येऱ्यागबाळ्याचे हे काम नव्हे कारण साम दाम दंड भेद सारे काही तोंडपाठ असणाऱ्या या अशा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या मंडळींची धाव अगदी एखाद्याला खतम करण्यापर्यंत देखील जाऊ शकते आणि आम्हाला सुदैवाने कोणतीही कसलीही भीती कधीही शिवत नसल्याने या मंडळींना प्रसंगी पोलिसात किंवा आयकर खात्याकडे सुपूर्द करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, लढा आता सुरु झाला आहे…
वास्तविक अविनाश देशपांडे यांचे दिवंगत पिताश्री माणिकराव एकेकाळी परभणी चारठाणा म्हणजे मराठवाड्यातले मोठे प्रस्थ होते, मला वाटते माणिकराव कधीकाळी चारठाणा भागातून जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले होते आणि त्याच ओळखीतून त्यांनी जयप्रकाश दांडेगावकर या माजी राज्यमंत्र्याला सांगून अविनाश यासी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिटकवून घेतले होते. पुढे अविनाशने अचानक हि नोकरी सोडली आणि औरंगाबाद च्या लोकमत दैनिकात नव्याने पुन्हा नोकरी सुरु केली पण जयप्रकाश मुंदडा पुढे सहकार मंत्री झाले व वादग्रस्त मार्गाने अविनाश पुन्हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोकरीमध्ये घुसले. अविनाश यांनी सख्खा भाऊ शेतकरी रवी देशपांडे असो अथवा त्यांचे इतर देशपांडे नातेवाईक, अविनाश रग्गड पैसे आल्यानंतर देखील कधी या मंडळींच्या मदतीला धावून गेले नसल्याने सारे देशपांडे त्यांच्यावर दात खाऊन असल्याचे मला आढळून आले पण पत्नी जयश्रीच्या भावाला म्हणजे सुनील कायंदे किंवा परिवहन महामंडळात कार्यरत असणाऱ्या साडूला अविनाश देशपांडे यांनी बऱ्यापैकी आर्थिक गैरव्यवहारात जवळ केल्याचे मला मालमत्तेच्या काही कागदपत्रांवरून आढळून आले आहे…
www.vikrantjoshi.com
जयश्री यांचे माहेरघर आमच्या बुलढाणा जिल्ह्यातले, लोणार जवळचे गुंधा त्यामुळे काही गुंतवणुकी व आर्थिक व्यवहार अविनाश यांनी त्या भागात केले आहेत का, त्यावर नक्की लिहिणार आहे. अविनाश यांचा जेमतेम पगार किती तर लाखाच्या आसपास मग त्यांची मोठी आर्थिक आर्थिक गुंतवणूक काही कुटुंबियांच्या नावे तर काही जवळच्या व्यापारी मित्रांच्या नावे डोळे दिपवून टाकणारी नक्की आहे. त्यांचे नव्या मुंबईतले भगवान अपार्टमेंट मधले प्रचंड महागडे घर किंवा चिरंजीव अजिंक्य याचे पुण्यात मॅरियट हॉटेलात लागलेले लग्न, या लग्नातली महागडी खरेदी, सारे प्रकार अचंबित करून सोडतात. आयकर खात्यातर्फे केवळ अविनाश देशपांडे यांचीच नव्हे तर त्यांच्या कटुंबीयांची काही नातेवाईकांची मित्रांची चौकशी करवून घेणे त्यांत आवश्यक असे काम आहे. अविनाश देशपांडे त्यांच्या पत्नी मुलगा सून या काही कुटुंब सदस्यांचे परदेश प्रवास कसे कुठे व किती झाले एवढे जरी शोधले तरी मला खात्री आहे, देशपांडे आणि कुटुंबीय खडी फोडायला शंभर टक्के जाऊ शकते. मरणाची ना भीती आम्हा, म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या आजी माजी मंडळींच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे वेशीवर टांगणे नक्की गरजेचे आहे, आवश्यक आहे. समजा देशपांडे यांनी काही आर्थिक नोंदी शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर आधारित दाखविल्या असतील तर त्यावर रवी देशपांडे नेमके स्पष्टीकरण नक्की देऊन सांगून मोकळे होतील…
क्रमश: हेमंत जोशी.