बावनकुळे तुमच्यामुळे संजय राऊत बरळले,
नेमके काय कसे घडले तेच येथे सांगितले !!
जत्रेत कमावले आणि तमाशात गमावले, संजय राऊतांचे नेमके हे असे कायम होत आलेले आहे तेच बावनकुळे यांच्यावर ते हास्यास्पद आरोप करतांना देखील हेच घडले आहे, संजय वास्तविक तुम्ही केलेल्या आरोपांमुळे विरोधकांची क्षणार्धात फाटायला पाहिजे पण ते तसे कधीही घडतांना मी बघितलेले नाही उलट ज्यांच्यावर तुम्ही आरोप करता त्यावर हा एक आजच्या दिवसातला मनोरंजनाचा भाग, अशी थट्टा उडवून जणू काही घडलेच नाही या अविर्भावात विरोधक पुढल्या कामाला लागतात. तुमच्या आरोपानंतर जेव्हा मी बावनकुळे यांच्याशी बोललो त्यांनी देखील तुमचे बोलणे हसण्यावारी नेले आणि पुढल्याक्षणी ते जणू काही घडलेच नाही, या अविर्भावात शांतपणे झोपी गेले. पाच तासात चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊच्या कसिनोमध्ये साडे तीन कोटी रुपये उडविले, हा आरोप तुम्ही केला आणि त्यातले जे जाणकार आहेत ते तुमच्या या आरोपावर पोट धरून हसायला लागले, माझी तर हसता हसता बोबडी वळली. पाच तासात साडे तीन कोटी रुपये उडविले, म्हणजे बावनकुळे यांनी खर्चासाठी किमान चार कोटी रुपये नक्कीच संगतीने नेलेले असतील, जेथे विमानातून चार लाख रुपये सोबत घेतांना प्रवाशांना घाम फुटतो कारण सुरक्षा रक्षकांची अतिशय करडी नजर तुमच्यावर असताना बावनकुळे यांनी सोबतीने संगतीने तब्बल चार कोटी कसे नेले हे तुम्हीच तुमच्या अनुभवावरून सांगा म्हणजे इतरांना त्याचा भविष्यात मोठा उपयोग होईल. ज्या व्यक्तीला जराशी अक्कल असते तो क्रेडिट कार्डवर साडे तीन चार कोटी नक्कीच उधळणार नाही खर्च करणार नाही, बावनकुळे हे तर अतिशय सावध असे भाजपा नेते म्हणून ओळखले जातात, आपण केलेली कोणतीही चूक एका क्षणात कशी आपले उज्वल राजकीय भवितव्य उध्वस्त करू शकते हे ज्या नेत्यांना आयुष्यात नेमके उमगले आहे त्यातले एक बावनकुळे, त्यामुळे पाच तासात कसिनोमध्ये त्यांनी तब्बल साडे तीन कोटी रुपये उडविले असे हास्याची कारंजी राऊतांनी नेहमीप्रमाणे उडविणे म्हणजे एखाद्या उंटीणीला राऊत तुमच्यामुळे दिवस गेले किंवा आदित्य ठाकरे सन्यास घेऊन मोकळे झाले, म्हणण्यासारखे…
www.vikrantjoshi.com
व्हायरल झालेल्या फोटोत बावनकुळे रुले हा गेम खेळतांना दिसताहेत जो मी गोव्यापासून तर लास वेगास पर्यंत जेथे जेथे जेव्हा जेव्हा जातो तेथे हमखास खेळतो, नक्कीच जिंकतो. वीस हजार रुपये खेळायला घेतो आणि चाळीस हजार रुपये जिंकले कि कसिनोमधून बाहेर पडतो, चाळीस हजारापर्यंत जिंकायला मला तीन साडे तीन तास लागतात, एकदा तर वॉशिंग्टन जवळच्या एका खेड्यात खेळतांना मी जिंकत होतो आणि शेजारी बसलेला अमेरिकन लाखो रुपये हरत होता शेवटी त्याच्या बायकोने त्याला माझ्या खेळाची नक्कल करायला सांगितले तेव्हा तो जिंकायला लागला. अर्थात मी आयुष्यात कोणत्याही व्यसनांकडे गम्मत म्हणून बघितले, कोणत्याही व्यसनांच्या आहारी गेलो नाही त्यामुळे आर्थिक सामाजिक कौटुंबिक जीवन जगणे सुसह्यय झाले. माझा एक गुजराथी मित्र त्याने उभे आयुष्य आणि कुटुंब खर्च न चुकता क्लब मध्ये जाऊन रमीवर पैसे लावत ते जिंकून काढले पण या भानगडीत तू कधीही पडू नको त्याने मला तंबी देऊन ठेवली होती, अगदी अलीकडे फायनल मॅच मित्राकडे बघतांना माझ्या शेजारी बसलेला लाखो रुपये बेटिंग वर लावत होता, साडे आठ लाख रुपये तो गमावून बसला, मी मात्र फक्त गम्मत बघत होतो. ज्याचा बदला घ्यायचा असेल त्याला सट्ट्याचे व्यसन लावून मोकळे व्हा असेही तो अनुभवी मला म्हणाला. कसिनोमध्ये जे रात्रभर सतत खेळतात ते फार फार तर वीस पंचवीस लाख रुपये गमावतात, कंजूस वृत्तीचे चंद्रशेखर बावनकुळे साडे तीन तास जर खेळले असतील तर चार दोन लाख इकडे तिकडे तेही गम्मत म्हणून, नक्कीच व्यसन म्हणून एखादा कुटुंबवत्सल तेही कुटुंबासमवेत असले उद्योग शंभर टक्के करणार नाही. संजय राऊत माझ्या मित्रा, याठिकाणी तुला किंवा इतरांना सांगायला नको ते बावनकुळे कुटुंबाचे एक गुपित सांगून मोकळा होतो. एका फार मोठ्या जीवघेण्या कठीण तणावपूर्ण संकटातून अगदी अलीकडे बावनकुळे कुटुंब सावरले आहे आणि हे महाशय तर प्रदेशाध्यक्ष म्हणून क्वचित घरी जातात कधीतरी कुटुंबासमवेत वेळ घालवतात, सतत राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात जे सर्वानाच सोशल मीडियावर बघायला मिळते. यावेळी त्यांना त्यांच्या बायकोने तंबी दिली होती कि दिवाळीत एकत्र कुटुंब फिरायला जाऊया आणि इतरांसारखे चंद्रशेखर देखील बायकोला घाबरून कुटुंबासमवेत तणाव घालवायला मकाऊला गेले आणि तुम्ही विरोधकांनी मात्र त्यांच्या जखमेवर थेट तिखट चोळले….
बरे झाले बावनकुळे तुमच्यावर हे असे विनाकारण खोट्या बदनामीचे संकट ओढावले त्यातून तुमच्या पक्षातले नेमके तुमच्यासाठी त्या मोहित कंबोज पद्धतीचे धावून येणारे कोण कोण हे तुम्हाला समजले आम्हाला देखील उमजले. तिकडे संजय राऊत यांनी आरोप करताच ज्या पद्धतीने चित्रा वाघ प्रवीण दरेकर मोहित कंबोज भारतिय पद्धतीचे चार दोन भाजपा नेते क्षणार्धात विरोधकांवर किंवा मी नाही त्यातली कडी लावा आतली पद्धतीने वागणारे नाना पटोले छाप उथळ नेत्यांवर तुटून पडले, हे भाजपा नेत्यांकडून आणखी मोठ्या प्रमाणावर घडायला हवे होते दुर्दैवाने ते फारसे घडले नाही, बहुतांश नेत्यांना फक्त बावनकुळे यांच्या कडून फायदे तेवढे उकळायचे असतात अशी मला खात्री पटलेली आहे, जे खादाड लबाड पत्रकारांकडून मध्यंतरी विरोधात असताना फडणवीस यांना त्यांचे कटू अनुभव आले तेच बावनकुळेंच्या बाबतीतही घडले….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी