कोणाला नैराश्य कोणाची नाराजी आणि
फडणवीसांची फजिती :
बुद्धिबळाच्या खेळात एकमेकांसमोर दोन स्पर्धक असतात, येथे महाराष्ट्राच्या राजकारणात विविध डाव मांडतांना डावपेच खेळतांना विशेषतः भाजपातर्फे दोन्ही बाजूंनी एकच व्यक्ती खेळी खेळते आहे, अमित शाह हे ते नाव कारण इतरांना शाह दरबारी महत्व नाही, नरेंद्र मोदी यांच्या कानावर अधून मधून नेमके काय करतोय, एवढे जुजबी शाह माहिती टाकून दुसरा विषय काढतात, शाह म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे शाह, हा विचार आचार देवेंद्र फडणवीसांनी घट्ट बांधून घेतलेला असल्याने, शाह जे सांगतात त्यापद्धतीने देवेंद्र येथे डावपेच आखून आणि हालचाली करून मोकळे होतात. राज्यात इतर भाजपा नेत्यांची त्या शाह यांच्यासमोर एखाद्या विटाळशी बाईसारखी भूमिका असते म्हणजे अगदी नितीन गडकरी असोत किंवा रावसाहेब दानवे किंवा भाजपाला पाठिंबा देणारे एकनाथ शिंदे किंवा अजित पवार, एखाद्या कर्मठ घरातल्या विटाळशी बाईसारखे त्यांना वागावे लागते, शाह यांच्या सूचनांशिवाय राजकीय भूमिका घेण्यात त्यांचे स्वतःचे असे काहीही नसते, कर्मठ घरातल्या विटाळशी बाईसारखे समस्त नेते एखाद्या बंद अंधाऱ्या खोलीत बसून विटाळ कधी संपतो याची वाट पाहत बसलेले असतात, आहेत. अधून मधून नितीन गडकरी यांच्या सारख्या एखाद्याने फडफड बडबड धडपड रडारड करण्याचा प्रयत्न केल्यास लगेच त्यांना नव्या प्रकरणांना भानगडींना तोड देण्यासाठी सज्ज व्हावे लागते त्यामुळे देवेंद्र फडणवीस सोडल्यास भाजपाचे किंवा भाजपाला सहकार्य करणारे नेते, हातात जपमाळ घेऊन शेवटचे दिवस मोजणाऱ्या एखाद्या वृद्धेसारखे देवाचा धावा करण्यात स्वतःला गुंतवून ठेवतात, भाजपातल्या संघ स्वयंसेवकांची अवस्था तर खाष्ट सासूसमोर अर्धमेल्या जगणार्या सुनेसारखी यादिवसात झालेली आहे, खालची मान वर न करता, सासू सांगेल त्या सूचना त्यांना पाळायच्या असतात…
www.vikrantjoshi.com
चार लेकरांना जन्म दिल्यानंतर आता पुरे कर असे सासूने वारंवार सांगूनही नवर्याच्या कुशीत शिरल्यानंतर पुढल्या दहा दिवसात नव्याने ओकार्या काढणार्या चावट सुनेसारखे त्या शरद पवार यांचे असते म्हणजे तिकडे अलीकडे त्या मित्राने सायरस पुनावाला यांनी अगदी जाहीर सांगूनही निवृत्तीचा सल्ला देऊनही पवारांचे वागणे त्या चावट सुनेसारखे राज्याच्या राजकारणात असते म्हणजे पवार सल्ला टीका धुडकावून लावतात आणि सतत नव्याने पोटुशी राहणाऱ्या बाळंतपणात न थकणार्या चावट तरुणीसारखे कायम ताजेतवाने होऊन दरदिवशी राज्याच्या राजकारणात मनाला हवा तसा चावटपणा करून मोकळे होतात. शंभर टक्के बातमी खरी अशी कि दस्तुरखुद्द शरद पवार यांना आपणहून मैत्रीचा युतीचा हात त्या मोदी यांच्या हाती देऊन मोकळे व्हायचे आहे पण जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील या दोघांचे भाजपाशी जुळवून घेतल्यास मोठे राजकीय नुकसान नक्की होणार असल्याने ते सुप्रिया सुळे यांना मोदी यांच्याशी युती पवार साहेबांनी न करण्याचा सल्ला देतात आणि सुप्रिया बापासमोर युती न करण्यासाठी रुसून फुगून बसते त्यातून वारंवार थकल्या भागल्या या बापाला दररोज मग प्रकाशझोतात राहण्यासाठी राजकीय भानगडी करून उकरून स्वतःला प्रसिद्धीच्या झगमगाटात राहून झिम्मा फुगडी खेळात बसावे लागते. ज्या राजकीय गोंधळाचा नेमका मोठा फायदा राज्यात होणाऱ्या येणाऱ्या निवडणुकात विशेषतः भाजपाला होऊन त्यांना लोकसभा आणि कदाचित विधानसभा दोन्हीकडे सत्तेत पुन्हा येणे सहज शक्य होणारे दिसते वास्तविक याचा फार मोठा हकदार उद्धव ठाकरे एकमेव होते पण भाजपाविषयी विशेषतः मोदी शाह फडणवीस यांच्याविषयीच्या मोठ्या रागातून उद्धव ठाकरे यांनी भलत्याच मंडळींशी आघाडी करून तोंडाशी आलेला सोन्याचा घास उकिरड्यावर फेकून दिलेला आहे आणि उद्धव यांचे जे नेमके वागणे दूरदर्शी धूर्त अमित शाह यांना हवे होते त्यात उद्धव अलगद अडकल्याने त्यांनी स्वतःचे आणि त्यांच्या शिवसेनेचे कसे फार मोठे नुकसान करवून घेतले त्यावर मी तुम्हाला पुढे नक्की सांगणार आहे..
तूर्त एवढेच : हेमंत जोशी