संभाजी विरुद्ध शिवाजी : एक सत्तासंघर्ष
तुमच्या घरात एकाचे एखाद्याचे नाव शिवाजी असेल तर पुढल्या पिढीतल्या एकाचेही नाव कृपया संभाजी ठेवू नका कारण एकाच घरात शिवाजी आणि संभाजी असतील तर त्या दोघात कधी भावनिक तर कधी सत्तेतून संघर्ष निर्माण होतो असा माझा अनुभव आहे किंवा आपल्या या राज्यात ज्या ज्या घरात शिवाजी नंतर संभाजी जन्माला आला त्यानंतर कालांतराने त्या दोघात भावनिक किंवा राजकीय संघर्ष नक्की घडून आला, तुम्हाला नेहमी किंवा हमखास बघायला पाहायला मिळेल, संभाजी आणि शिवाजी दोघेही आपापल्या जागेवर किंवा घेतलेल्या भूमिकेवर योग्य असतात पण दोघातले विचार करण्याची पद्धत भिन्न असल्याने संघर्ष निर्माण होतो जे मला अगदी निलंगेकरांच्या घरातही बघायला मिळाले, आजोबा माजी मंत्री आणि मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर आणि नातू माजी मंत्री व विद्यमान आमदार संभाजी निलंगेकर या दोघातला एकाच घरातला कधी भावनिक तर कधी सत्तेतून संघर्ष तुम्हाला खूप काही सांगून जातो. ऐन उमेदीत सुनबाई रूपाताई आणि त्यांचा कर्तबगार नातू संभाजी या दोघांशी निर्माण झालेला संघर्ष, त्याचा मोठा राजकीय फटका शिवाजीराव निलंगेकर यांना बसला ज्याचा मोठा राजकीय फायदा त्यांच्या पक्षातल्या पण कट्टर राजकीय विरोधक व दुश्मनी असलेल्या विलासराव देशमुख यांना खूप झाला, वेळोवेळी झाला किंबहुना दिवंगत प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे व त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जर संभाजी मधले नेमके नेतृत्व गुण हेरून त्यांना साथ व साद दिली नसती तर शंभर टक्के लातूर उस्मानाबाद परिसरात भाजपा आणि संभाजी दोघेही नेतृत्वात मर्यादित राहिले असते…
जेव्हा केव्हा मला शिवाजीराव आणि संभाजी हे निलंग्यातले नातू आणि आजोबा नजरेसमोर येतात तेव्हा तेव्हा मला शक्ती सिनेमातले दिलीपकुमार आणि अमिताभ आठवतात म्हणजे त्या दोघातला जसा भावनिक व इन्टलेक्चुअल संघर्ष, तो तसा या दोघांतही काही काळ त्या लातूर जिल्ह्यात साऱ्यांना बघायला मिळाला, एक मात्र नक्की अकाली विधवा झालेल्या त्या भागातल्या चालुक्य घराण्यातल्या रूपाताई, संभाजी आणि अरविंद निलंगेकर यांच्या पाठीशी कणखर जिजाऊ बनून उभ्या राहिल्या नसत्या तरीही संभाजी यांना राजकीय वर्तुळात विशेषतः विलासराव देशमुख यांची राजकीय दादागिरी असतांना नक्की मोठी झेप घेणे शक्य झाले नसते, कारण संभाजी समोर एकाचवेळी घरातले शिवाजी किंवा अशोक काका आणि विलासराव यांच्यासारखे कडक कणखर ताकदवान प्रतिस्पर्धी उभे होते पण थेट 2003-04 पासून रूपाताई आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी भाजपाशी जोडलेले नाते आणि प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यासारख्या भाजपच्या वरिष्ठांनी वेळोवेळी आजतागायत केलेले सहकार्य भाजपा आणि संभाजी निलंगेकर त्यातूनच विलासराव आणि शिवाजीराव यांची गढी भेदून त्यांनी लातूर उस्मानाबाद परिसरात आपले व भाजपाचे जाळे पसरवून राजकीय गणित बदलवून टाकले…
अलीकडे अभिमन्यू देवेंद्र फडणवीस यांनी निलंग्यात दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले आणि पुन्हा एकवार माझया नजरेसमोरून शिवाजीराव यांचे अखेरचे पाच वर्षे डोळ्यासमोर आले म्हणजे ज्या काँग्रेसी कट्टर शिवाजीराव निलंगेकरांना संभाजी आणि रूपाताई या दोघांनी भाजपाशी साधलेली जवळीक केलेला प्रवेश मिळवलेली सत्ता अगदी मनापासून अस्वस्थ करायची त्याच निलंगेकर यांना जेव्हा आयुष्यात काही कटू अनुभव आले, भ्रमनिरास झाला त्याचवेळी त्यांच्यापासून दुरावलेला नातू आपल्या आईच्या सांगण्यावरून पुन्हा त्यांच्या मांडीवर बसण्यासाठी धडपड करतांना दिसला, आजोबा शिवाजीराव निलंगेकरांचे मग झपाट्याने त्वरेनेहृदयपरिवर्तन झाले आणि हेच आजोबा लोकांची विचारांची इतर नात्यांची चिंता पर्वा काळजी न करता पुन्हा एकवार नातवाच्या प्रेमात पडले मोठ्या अभिमानाने त्याच्या संगतीने कधी अमुक एखादे सार्वजनिक काम हाती घेऊन पूर्ण करू लागले तर कधी संभाजीच्या लाडक्या आवडत्या देवेंद्रला येऊन भेटू लागले, त्या दोघांच्या गप्पा मोठ्या कौतुकाने ऐकायला लागले. अखेरच्या काळात मिळालेला सहवास आजही सतत संभाजी यांना अस्वस्थ करून जातो ते ऋण फेडण्यासाठीच अगदी अलीकडे शिवाजीराव यांच्या लाडक्या नेत्याच्या हातून याच संभाजी पाटील यांनी आजोबाच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण घडवून आणले. वाचकांनो, देवेंद्र यांची आजची अवस्था आणि त्यांचे आजवरचे एकंदरीत आयुष्य हे खरेच त्या अभिमन्यूशी तुलना करणारे ठरते कारण हा नागपुरातला देवेंद्र थेट कोकणापासून तर मराठवाडा खान्देश मुंबई पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा धारदार शब्दरूपी तलवार घेऊन कधी कधी तर एकट्याने लढतो त्याच्या परतीचे दोर आपण साऱ्यांनी त्या अभिमन्यू सारखे केव्हाच कापून टाकलेले आहेत, तू यशस्वी झालास काय किंवा कधी अपयशी, देवेंद्र तुला आता अखेरच्या श्वासापर्यंत त्या अभिमन्यू सारखे राजकारणातून कटकटीतून समाजसेवेतून बाहेर पडणे अशक्य आहे. निलंगेकर घराणे हा विषय येथे संपलेला नाही…
अपूर्ण : हेमंत जोशी