उदय किरण इत्यादी / पुत्र व्हावा ऐसा गुंडा
उत्तम पुत्र जन्माला घालणे म्हणजे पित्याचे पुण्य आणि कर्म पण मूर्ख पुत्रांना जन्म देणे तोही पित्याचाच दोष आणि वाईट कर्माचे फळ असते असे मी समजतो. या राज्याच्या एका दिवंगत मुख्यमंत्र्याने ठाणे जिल्ह्यात मोक्याच्या ठिकाणी जवळपास 850 एकर एवढी प्रचंड जमीन लाटली होती कवडीमोल भावाने विकत घेतली होती, आपण उगाच वादग्रस्त ठरता कामा नये म्हणून त्यांनी हि जमीन मित्राच्या नावाने विकत घेतली त्यावर पोटच्या दोन्ही मुलांना त्यांनी लक्ष ठेवायला लक्ष घालायला सांगितले पण दोघांनाही त्या मालमत्तेत अजिबात रस नव्हता, दोघेही आपल्या मस्तीत जगत होते, ज्याच्या नावाने हि जमीन घेतली होती केली होती तो अचानक एक दिवस वारला, असे म्हणतात त्याच्या जाण्याचा धसका धक्का याही माजी मुख्यमंत्र्याने घेतला कारण एवढी मोठी जमीन आपोआप मित्राच्या वारसदारांच्या नावाने झाली होती, या धक्क्याने माजी मुख्यमंत्री देखील देवाघरी निघून गेले, पुढे त्या मित्राच्या वारसदारांना एका कुप्रसिद्ध हिरे व्यापाराने चलाखीने खुबीने गंडवून कवडीमोल भावाने त्याने हि जमीन वारसदारांकडून विकत घेतली, आणि आता त्याच बदमाश हिरे व्यापाऱ्याने हि जमीन बाजार भावाने विकायला काढली आहे.
दुसरा किस्सा गायक दिवंगत किशोर कुमार आणि कुटुंबाचा म्हणजे अमित आणि सुमित दोघेही अधिक कर्तृत्ववान निघाले असते तर हे कुटुंब खूप आणखी पुढे निघून गेले असते पण अमित सुमित यांच्या विचित्र व्यसनी वाईट वागण्याचेच किस्से आमच्या परिसरात सतत चर्चेत असतात त्यामुळे सुमित आणि मी एका पंचतारांकित हॉटेलात अनेकदा स्विमिंग साठी एकत्र येत असू पण आपणहून त्याच्याशी किंवा आई लीना चंदावरकर यांच्याशी ओळख करून घ्यावी असे कधीही मनाला वाटले नाही किंवा अमितकुमार अनेकदा फिरतांना जुहू चौपाटीवर रस्त्यात आडवा येतो मात्र या विक्षिप्त पण गुणी मात्र आळशी गायकाला साधे स्माईल देण्याची पण कधी इच्छा झाली नाही. एक कुतूहल मात्र कायम होते कि नारायण राणे यांच्या उत्तुंग निवासी इमारतींसमोरील गौरीकुंज या किशोर कुमार यांच्या अनेक वर्षे वास्तव्याने पावन झालेला जुहूतील हा बंगला आतून कसा असेल ते बघण्याचे, योग्य मात्र जुळून येत नव्हता, आणि अलीकडे क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी हाच किशोर कुमार यांच्या बंगल्याचा केवळ निम्मे भाग भाड्याने घेऊन तेथे उत्तम रेस्टॉरंट सुरु केले आहे, अलीकडे मुद्दाम तेथे डिनरला गेलो, सावकाश तो बंगला आतून बघितला, अर्ध्या भागात आजही किशोर कुमार यांचे कुटुंब वास्तव्याला असल्याने तेवढा भाग बघता आला नाही पण बाहेरून अगदीच छोटासा दरवाजा असलेला हा बंगला आतून मात्र अति भव्य असा आहे, दोन्ही मुले किशोर कुमार यांच्या पायापर्यंत देखील न पोहोचल्याने पोटापाण्यासाठी शेवटी हि लाडकी स्मृती भाड्याने द्यावी लागलेली आहे…
www.vikrantjoshi.com
आणि आता सुरुवातीला रत्नागिरीच्या उत्तम व्यावसायिक अण्णा सामंत यांच्या दोन्ही मुलांविषयी म्हणजे किरण आणि उदय सामंत हे दोघेही व्यवसायात व राजकारणात बापसे बेटा सवाई आहेत. त्यांची दादागिरी आहे. उदय सामंत राज्याचे उद्योग मंत्री आहेत आणि किरण सामंत उत्तम व्यावसायिक आहेत पण ते उदय सामंत हे मुंबईत आणि राज्याच्या राजकारणात अगदी सुरुवातीपासून व्यस्त असल्याने, किरण सामंत हे उदय यांचा विधानसभा मतदार संघ देखील बऱयापैकी सांभाळतात, दोन्ही भावांची रत्नागिरी व आसपासच्या जिल्ह्यात मोठी राजकीय वट आहे दबदबा आहे विशेष म्हणजे उदय आणि किरण या दोघानाही मी अगदी सुरुवातीपासून ओळखतो, बघत आलो आहे आणि उदय जे ठरवितात ते करून दाखवितात त्यावर मला अनेक किस्से तोंडपाठ आहेत, त्यांना राज्याच्या देशाच्या राजकारणात आणखी मोठी महत्वाकांक्षा आहे आणि ते काहीही करून सतत स्वतःला झोकून देऊन आपली सारी राजकीय स्वप्ने पूर्ण करतील असे मला वाटत राहते. महत्वाचे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात असंख्य श्रीमंत मुस्लिम वास्तव्याला आहेत ज्यांचे मोठे व्यवसाय गल्फ कंट्रीज विशेषतः दुबईत आहेत आणि या सार्या गरीब श्रीमंत मुस्लिमांचे लाडके आणि आवडते उदय व किरण आहेत. थोडक्यात दोन्ही बंधू जिल्ह्याच्या राजकारणात समाजकारणात लोकमान्य लोकप्रिय जनमान्य आहेत, आता किरण आणि उदय सामंत या दोघांनीही ठरविले आहे कि पुढला खासदार हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा असेल म्हणजे विनायक राऊत यांनी जंग जंग पछाडले तरी ते पुढले खासदार नसतील आणि मी येथे नावे सांगत नाही पण कोकणातले अनेक मान्यवर व ताकदवान नेते हे अगदी उघड सामंत यांच्या पाठीशी उभे असतील, कदाचित पुढली लोकसभा स्वतः किरण सामंत लढवतील आणि उदय सामंत यांचा उमेदवार नक्की निवडून येईल कारण उदय यांच्या जिभेवर तीळ आहे आणि त्यांनी तर अगदी उघड आव्हान देत म्हटले आहे कि विनायक राऊत पुढले खासदार नसतील.
वाचकांनो, लायक आणि नालायक पुत्रांचे किस्से येथेच संपत नाहीत त्यावर आणखी पुन्हा कधीतरी….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी