वाहवा ! आता काय तर उद्धवा : पत्रकार हेमंत जोशी
निदान पुढले आणखी काही महिने, त्यांना काम करू द्या, त्यांच्या कामाची पद्धत तर बघा, अगदीच फेल्युअर ठरले वाटले तर त्यांच्या नावानेही मग खडे फोडायला सुरुवात करा, आमची काहीही हरकत नसेल. होय, उद्धवजींच्याही नावाने बोंबाबोंब करणे सुरु झाले आहे कि त्यांना पोलिटिकल आणि कोरोना दोन्हीकडे अपयश येते आहे. इट्स टू अर्ली, एवढेच मी तुम्हाला सांगू शकतो कारण तुमचे कोणाचेही तोंड दाबणे धरणे माझ्या हातात नाही. कोरोना या जीवघेण्या महामारीमध्ये कोण मुख्यमंत्री म्हणून अधिक योग्य ठरले असते अशी चर्चा सध्या सर्वत्र सर्हास ऐकायला मिळते आणि उत्तर असते, अर्थात देवेंद्र फडणवीस. याउलट माझे मत त्यावर एकदम वेगळे आहे, कोरोना महामारी योग्य रीतीने त्या नारायण राणे यांनी अधिक हाताळली असती त्यानंतर माझा अर्थात प्रेफरन्स आहे नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांना. सध्या कोणीही कोणाचे ऐकत नाही हि जी शासन आणि प्रशासनात अस्वस्थता आहे त्यावर या तिघांनी नक्की चांगला तोडगा काढून लगेचच हाती चाबूक घेतला असता. उद्धवजी नवीन आहेत मान्य आहे, अननुभवी आहेत, एकदम मान्य आहे पण ते लेचेपेचे आहेत असे जर तुमचे म्हणणे असेल ते मला तरी अजिबात मान्य नाही कारण जेव्हा केव्हा त्यांची सटकते ना तेव्हा याच उद्धव सारखा खतरनाक नेता मी बघितलेला नाही, हा नेता प्रसंगी एवढा खतरनाक ठरतो कि अशावेळी ते शरद पवार देखील त्यांच्यासमोर थेट बालक मंदिरात जाणारे पिटुकले इवलेशे कुकुलु बाळ ठरतील वाटतील…
या कोरोना महामारीच्या दिवसात समजा तुम्हाला शासनाचा प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असेल तर उद्धव यांना अवश्य सूचना करा उद्धव यांची चांगली सवय आहे कि ते केलेल्या सूचनांचा आदर करतात प्रसंगी कठोर निर्णय घेऊन ते नक्की मोकळे होतील. तुमच्या मनात त्यांना सूचना करायचे नक्की असेल तर फक्त आणि फक्त या पत्त्यावर पत्र पाठवून मोकळे व्हा. श्री मिलिंद नार्वेकर, मातोश्री बांगला, साहित्य सहवास, बांद्रा पूर्व, मुंबई. इतर कोणी ” शहा ” जोग दलाल सांगून मोकळे होत असतील कि यादिवसात बढत्या बदल्या किंवा वर्गण्या इत्यादीसाठी आम्ही उद्धवजींचे उजवे हात आहोत तर त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेऊ नये, ती तुमची शुद्ध फसवणूक ठरेल. अलीकडे मला काही उद्योगपती व्यापारी व्यवसायिक मित्रांनी फोन करून सांगितले कि काही शहाजोग मंडळी त्यांच्यासारख्यांना फोन वरून किंवा प्रत्यक्ष बोलावून सांगताहेत कि उद्धवजींना या महामारी दरम्यान दररोज अनेकांना जेवण द्यायचे असते किंवा आर्थिक मदत करायची असते त्यांनी त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीची त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्यावर साऱ्या मित्रांना एवढेच सांगितले कि उद्धव यांना जेवढे मी ओळखतो तेवढे मला नाही वाटत फार कोणी ओळखलेले असेल. अत्यंत महत्वाचे म्हणजे उद्धव असे चिप काम करायला कधीही कोणाला सांगत नाहीत सांगणार नाहीत उद्या एकनाथ शिंदे अनिल परब संजय राऊत यांचे जरी तुम्हाला उद्धव यांच्या नावाने असे फोन आलेत तरी विश्वास ठेऊ नका, सीझन्ड सेना नेते असे वागणार देखील नाहीत अर्थात एखादा नवखा दलालच अशा चुका करू शकतो, इतर सेना नेते नक्की कधीही असे करणार नाहीत, याउलट तुम्ही हे असे वाईट गलत काम करणाऱ्याचे नाव थेट उद्धव यांनाच सांगून मोकळे व्हा, अशा भामट्या शहाजोग मंडळींची मग क्षणार्धात हजेरी घेऊन अशांना मातोश्रीवरून नोव्हेअर केले जाते…
www.vikrantjoshi.com
एखादा दलाल मातोश्रीच्या जवळ आहे असे भासविण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेकदा सेनाभवनाचा आसरा घेऊन मोकळा होतो, सेना भवन ते मातोश्री मानसिकदृष्ट्या फार मोठे अंतर आहे किंवा जे सेना भवनात बसतात त्यांना मातोश्रीवर मानाचे स्थान असते असे नसते त्यातला एखादाच हर्षल प्रधान असतो ज्याचा थेट कुटुंबातल्या इतरांशी नव्हे तर फक्त उद्धवजींशी संपर्क असतो आणि जे हर्षल यांच्यासारखे सावध राहून तेथे त्या वर्तुळात मेहनत घेतात त्यांनाच पुढे चांगली फळे त्या संजय राऊत यांच्यासारखी खायला मिळतात, बदमाशी करणाऱ्यांचा निभाव लागत नाही त्यांचा कचरा होतो, संजय निरुपम होतो, कालांतराने अशांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. आजतागायतच्या ठाकरे घराण्यातले सर्वाधिक कणखर ठरले दिसले आहेत ते फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे, तुम्ही सामान्य वाचक, त्यांना तुम्ही अजिबात जवळून बघितलेले नाही, त्यांना तुम्ही फारसे ओळखून नाहीत, माझ्यावर विश्वास ठेवा, या माणसाची एकदा का सटकली कि त्याच्यासारखा खतरनाक नेता मी आजतागायत बघितलेला नाही. यादिवसात उद्धव नक्की नेमके लक्ष ठेऊन आहेत कि शासन प्रशासनातले नेमके कोण कोण त्यांना फसवते आहे, एकदा का त्यांना खात्री पटली कि मग बघा उद्धव कसे आक्रमक ठरतील ते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी