महाराष्ट्र विकणे आहे…!
-पत्रकार हेमंत जोशी
सज्जनांनी जावे तरी कुठे, अशी अभूतपूर्व परिसस्थिती कधी नव्हे ते राजकीय दलालांनी नेत्यांनी अधिकाऱ्यांनी सत्ताधीशांनी या राज्यात १९९० नंतर झपाट्याने आणून ठेवली आहे, आमच्या या महाराष्ट्रात आणीबाणीची अवस्था सज्जनांवर या मंडळींनी आणून ठेवली आहे, विधान सभेला अध्यक्ष नाही, सुसंस्कृत पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला त्यांच्या आघाडीतल्याच राष्ट्रवादीचा विरोध आहे कारण विधान भवनातील मोठ्या तोडपाण्या आणि सततच्या दुकानदाऱ्यांना पृथ्वीराज चव्हाण आडकाठी बंदी आणतील, कधी नव्हे ती या अपवित्र झालेल्या वास्तूला ते पवित्र करून सोडतील कदाचित विधान परिषद सभापतींना देखील तशी वेळ आलीच तर दम देऊन मोकळे होतील कि या विधान भवन परिसरातील तोडपाणीला दुकानदाराला दलालांना आळा घातला नाही तर खबरदार गाठ माझ्याशी आहे, पृथ्वीराज शिस्त लावून मोकळे होतील ज्या शिस्तीची राष्ट्रवादीला मोठी भीती वाटत असावी त्यामुळे या चांगल्या नेत्याला विधान सभा अध्यक्ष होण्याची संधी चालून येईल असे दूरदूरपर्यंत वाटत नाही. सतत वाकड्या चालीने चालणाऱ्यांची या राज्यात या मंत्रालयात सरकारी कार्यालयांमध्ये अगदी महापौरांसह सर्वांची चलती असल्याने ज्यांना सत्तेतले कळते आणि जे तेथे संबंध ठेवून आहेत पण चुकून सज्जन आहेत अशांना नैराश्येने गाठले आहे. येथे गर्विष्ठ, पापी, हरामखोर, भ्रष्ट, नालायक, लुटारू, डाकू, नीच, हलकट मंडळींची मोठी चलती आहे. बाहेर वाममार्गाने हि मंडळी खूप कमावतात पण ज्यांच्यासाठी कमावतात ते कुटुंबातले सारेच नालायक व्यसनी ऐतखाऊ निघताहेत निघाले आहेत त्यामुळे येथेच सारे फेडून ते वर जाताहेत जातील तरीही चांगले वागावे राज्याचे किंवा सर्वसामान्यांचे भले कारावे असे त्यातल्या एकालाही दुरदैवाने अजिबात वाटत नाही, फसविण्याचा लुटण्याचा व्यवसाय करणारांनी हा सत्तारूपी बाजार भरला आहे. राज्यकर्तेच जर नीच प्रवृत्तीचे निघाले तर सज्जनांना जगणे कठीण होऊन बसते जे या राज्यात सऱ्हास घडते आहे. महत्वाचे म्हणजे सज्जनांचा जसा कोणताही पक्ष नसतो तसा तो दुर्जनांचा देखील अजिबात नसतो म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांसारखे जसे काँग्रेस मध्ये सज्जन आहेत तसे खडसे भाजपा मध्ये देखील आहेत असतात होते हे आपण मागल्यावेळी ते या राज्यात सत्तेत असतांना बघितले आहेच त्यामुळे या राज्यातला सत्तेतला पक्ष बदलून उपयोग नाही तर सत्ते जवळ असलेला प्रत्येक माणूस बदलला पाहिजे….
छगन भुजबळ यांचे कार्यालय आणि खाते शिव-भोजन थाळी भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे हे काल पर्वा झी मराठी न्यूजने पुराव्यांसहित थोडावेळ दाखविले नंतर काय घडले नेमके माहित नाही पण ह्या गंभीर घोटाळ्याच्या बातम्या गायब करण्यात आल्या असे असले तरी तुम्हाला आठवत असलेच कि शिव-भोजन थाळी मध्ये छगन भुजबळ आणि कंपू भ्रष्टाचार करतो आहे हे मी एक वर्षे आधीच लिहून मोकळा झालो होतो, उशिरा का होईना पण झी न्यूजला थोडावेळ जाग आली आणि त्यांनी या घोटाळ्याची इत्यंभूत बातमी व माहिती काही क्षण दाखवून नंतर का कोण जाणे पण गायब केली, तुरुंगात जाऊनही भुजबळ आणि त्यांचा पुतण्या सुधारायला तयार नाहीत, प्रेतावरच्या टाळूवरचे लोणी घरी नेऊन कोरोना महामारीचा गैरफायदा घेणाऱ्यांचा अंत फार चांगला होईल असे जर त्यात सहभागी होणाऱ्यांना वाटत असेल तर ते सारे मुर्खांच्या नंदनवनात फिरताहेत एवढेच मी येथे सांगेल. जसे एखादा दरोडेखोर शिक्षा भोगून सुटल्यानंतर बाहेर आला कि संत तुकाराम होऊन जगत नाही तसे या छगन भुजबळ यांचे झालेले दिसते म्हणजे तुरुंगात दिवस काढूनही हा नेता सुधारायला तयार नाही पुन्हा ते डाके घालताहेत आणि मला नेमकी हीच भूमिका शरद पवार यांची आवडत नाही म्हणजे जे ओवाळून टाकले आहेत जे राज्याला घातकी आहेत त्यांना अधिक प्राधान्य व प्रोत्साहन देऊन मोकळे व्हायचे अशा तुरुंगातून सुटून आलेल्या नेत्यांचे आणखी उदात्तीकरण करून त्यांना ताकद देऊन सत्तेत आणायचे आणखी लूट असा अप्रत्यक्ष सल्ला देऊन मोकळे व्हायचे, चांगली माणसे पुढे करून देखील सत्ता काबीज करता येते हे सत्तेचे गणित स्वतः शरद पवारांना कधीच मान्य झाले नाही मान्य नाही….
झी न्यूजचा आणखी एक किस्सा, आयकर खात्याच्या रडारवर ४० अधिकारी असल्याचागौप्य्स्फोट त्यांनी अलीकडे केला, त्यावर सारे सविस्तर त्यांनी सांगितले पण सहज शक्य असून देखील ते ४० अधिकारी नेमके कोण त्यांनी त्यांची नावे का जाहीर केली नाहीत कि येथेही भुजबळांच्या बातमीसारखी संशयाला जागा? वास्तविक हि बातमी दोन महिने जुनी आहे जेव्हा सत्तेतल्या महत्वाच्या दलालांवर आयकर खात्याने धाडी टाकल्या त्यानंतर या ४० नव्हे तर बजरंग खरमाटे यांच्यासारख्या तब्बल 52 अधिकाऱ्यांची नावे थेट पुराव्यासहित आयकर खात्याला समजली पण दलालांवर धाडी पडण्यापूर्वीच या श्रीमंत अधिकाऱ्यांना असे काहीतरी घडणार आहे याची कुणकुण लागलेली असल्याने त्यांनी आधीच आपल्याकडे असलेल्या काळ्या पैशांची विल्हेवाट लावलेली होती लावलेली असल्याने, आयकर खात्यात तसा आता फार उशीर झाला आहे कारण जे नेते किंवा अधिकारी त्यांच्या रडारवर आहेत त्यांनी केव्हाच आपला काळा पैसा विविध गुंतवणुकीच्या माध्यमातून परदेशात किंवा देशात इतरत्र बेमालूम लपविलेला आहे. अलीकडे आम्हाला नेहमीचा माहिती घेण्याचा भाग म्हणून याच आयकर खात्यातील एका बड्या अधिकाऱ्याने खंत व्यक्त केली कि अमुक एका बड्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून खात्याला मोठे घबाड मिळेल असे जे वाटले होते तसे घडले नाही आम्हाला त्याची फारशी मालमत्ता गवसली नाही आणि जी गवसली ती अगदीच क्षुल्लक आहे त्यावर मी त्यांना देखील हेच सांगितले कि या अशा साऱ्याच चतुर नेत्यांनी दलालांनी अधिकाऱ्यांनी फार मोठी गुंतवणूक राज्याबाहेर आणि देशाबाहेर केलेली असल्याने आणि हि गुंतवणूक करतांना नावांची मोठी खबरदारी घेतलेली असल्याने केवळ मल्ल्या पद्धतीने तुम्ही माहिती घेतली तरच तुम्हाला त्या साऱ्यांची नेमकी मालमत्ता किती व कोठे हे कळेल. आश्चर्य म्हणजे आयकर खाते यातल्या ज्या दोन नामचीन व्यक्तीकडे केवळ १५ दिवसांपूर्वी धाड टाकते त्यातले ते दोघेही केवळ पंधरा दिवसात परदेशात जाऊन आपली व आणखी काही अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यात आजही गुंतलेले आहे आणि आयकर खात्याला हे असे ठग कसे बदमाश, का लक्षात येत नाही, मला न उलगडलेले हे कोडे आहे….
अपूर्ण : हेमंत जोशी