सहज सुचले म्हणून: भाग २
-पत्रकार हेमंत जोशी
या ठिकाणी कार्स खरेदी विक्री हा विषय नाही पण अलीकडे मी विविध कार्स विषयी जे लिहिले तो लेख मराठी वाचक व भाषिकांमध्ये प्रचंड प्रमाणावर नावाजला खूप गाजला, म्हणून आणखी काही ओळी कार्स विषयी. माझे एक अतिशय जागरूक सडेतोड फेसबुक फ्रेंड श्री अशोक पटवर्धन यांनी तर पुढे जाऊन कार्स विषयी जराशी हटके छान माहिती दिली. ते लिहितात, तुम्ही जे काही लिहिले ते पेट्रोल, डिझेल आणि cng किट बसवलेल्या गाड्यांबद्दल. आता एक नवीन तथ्य लक्षात घ्या की पुढील वर्षात त्या प्रजातीच्या सर्व कार टप्प्याटप्प्याने इतिहासजमा होणार आहेत आणि नवीन खरेदी फक्त cng, इलेक्ट्रिक, हायड्रोजन आणि इथेनॉल वर किंवा त्यांची हायब्रीड इंजिन यांच्यावर चालणाऱ्या गाड्यांची होईल. याशिवाय 15 वर्षांहून अधिक जुनी कार स्क्रॅप करून टाकण्याचा कायदा येत आहे.यामुळे सेकंड हँड गाड्यांचा बाजार तर संपत आलाच आहे, पण नवीन तंत्रज्ञान सामिल नसलेल्या नव्या पेट्रोल, डिझेल आणि cng कार सुद्धा फार कमी ग्राहक खरेदी करतील, परिणामतः त्यांची किंमत तर कमी होईलच, पण त्यांची सेकंड हँड मॉडेल्स सुद्धा कचरा भावात मिळू लागतील आणि जरी डिमांड कमी म्हणून पेट्रोल, डिझेल, गॅस स्वस्त झाले तरी रिसेल व्हॅल्यू जमीन तळाला टेकून राहील. येथे पटवर्धन यांचे लिखाण संपले आहे. कार्स विषयी लिहिल्यानंतर कित्येकांचे अनेकांचे माहिती जाणून घेण्यासाठी फोन आले, छान वाटले. कार्स घेताना काही महत्वाचे मुद्दे असे कि जर कार तुम्ही स्वतः चालविणार असाल तर ती शक्यतो मॅन्युअल नको ऍटोमॅटिक घ्या जराशी ती महागडी असली तरी किंवा थोडे कमी ऍव्हरेज देणारी असली तरी त्यातून तुमचा ड्रायव्हिंग करतानाचा मोठ्या प्रमाणावर त्रास कमी होतो, ड्रायव्हिंग करण्याचा मनसोक्त आनंद त्यातून तुम्हाला लुटणे सहज शक्य होते अत्यंत महत्वाचे म्हणजे कार्स दुरुस्ती आणि देखभालीसाठी कधीही लोकर गॅरेज मध्ये देऊ नयेत असे केल्यास तुमची कार अल्पावधीत खिळखिळी होईल, आणि खर्च देखील वाढतील. कंपनीने नेमलेले गॅरेजेस महागडे असतात खरे पण त्यांच्याकडून केल्या गेलेली देखभाल व दुरुस्ती नेमकी असते, एकदा घेतलेली मोटार गाडी खूप वर्षे पुढे वापरता येते. आपल्याकडे बहुतेकांना पांढऱ्या रंगाच्या कार्स विकत घेणे अगदी मनापासून आवडते पण काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कार्स मेंटेन करायला खर्चिक असतात त्यावर खर्च अधिक होतो म्हणून शक्यतो इतर रंगाच्या कार्स विकत घ्याव्यात. शेवटी अत्यंत महत्वाचे म्हणजे तुम्हाला कार्सची खूप गरज असेल आणि कार विकत-घेणे एखाद्यावेळी सुरुवातीला शक्य असले तरी नंतर कर्ज फेडतानाचे हप्ते आणि देखभाल व दुरुस्तीवर होणार खर्च फार मोठा असतो. म्हणून सांगतो हे असे करणे शक्य असेल तरच कार खरेदी करण्याच्या भानगडीत पडा केवळ आम्ही कसे श्रीमंत असे खोटे भासविण्याचा नादात किंवा इतरांना फुकाचे इम्प्रेस करण्यासाठी कार खरेदी करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी