राज ठाकरेंचा हनुमंत : पत्रकार हेमंत जोशी
सोसाट्याचा वारा त्यात पाऊस आणि प्रचंड वादळ अशा दिवसात रस्त्यावर जागोजाग जसे महाकाय वृक्ष कोलमडून पडलेले असतात तसे या कोरोना महामारीत विशेषतः राज्यातल्या महानगरातून आणि मुंबई टेरेटरी मध्ये घडते आहे दरदिवशी कितीतरी कोरोना बाधित कित्येक कुटुंबातले महावृक्ष किंवा कुटुंब सदस्य धडाधड जमिनीवर कोसळताहेत देवाघरी निघून जाताहेत, अमीर खानचा लगान सिनेमा आठवा त्या सिनेमात पाऊस न आल्याने माणसे हतबल होतात आणि देवाचा धावा करतात धावून येण्यासाठी, आताही तुम्हा आम्हा सर्वांच्या हातात तेवढेच उरले आहे परमेश्वरी चिंतनात वेळ घालविणे आणि या जगात असेलच कुठेतरी तो देव तर धावा करून करून त्याला एवढेच आता विनवायचे आहे कि देवा आतातरी आम्हाला पाव आणि या महासंकटातून बाहेर काढ. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांचे आपापसात वागणे सावत्र भावांसारखे आणि आपल्या या मुख्यमंत्र्यांकडे अनुभवाची वानवा सारे कसे अतिशय कठीण होऊन बसले आहे, भोपाळ गॅस दुर्घटनेसारखे काही कळायच्या आत माणसे कोरोना महामारीत धाड्कन जमिनीवर कोसळताहेत अनेक कुटुंब उध्वस्त होताहेत, आता असेलच परमेश्वर तर त्या देवाने आम्हाला या जीवघेण्या ठरलेल्या संकटातून बाहेर काढावे….
साऱ्याच नेत्यांचे उजवे डावे हात असतात पण त्यातले हनुमंत कमी नारद अधिक असतात आणि हे उजवे डावे नारदच त्या त्या नेत्यांचे पुढे वाटोळे करून ठेवतात. फार कमी नेते चतुर असतात जे या अशा उजव्या डाव्या नारदांचे उजव्या कानाने ऐकतात आणि डाव्या कानाने जे आवश्यक नाही ते सोडून देतात. शरद पवार उद्धव ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस असे अलीकडले फार कमी नेते ज्यांचा सभोवताली वेटोळे करून बसलेल्या नारदांवर फारसा विश्वास नसतो असे फारच कमी नेते आहेत कि जे ऐकतात नारदांचे करतात आपल्या मनाचे. नेत्यांच्या सभोवताली नारद अजिबात नसावेत हनुमंत असावेत जे नेत्याने सांगताच थेट लंकेला सुद्धा आग लावून मोकळे होतात. विशेष म्हणजे नारद नेत्यांच्या संकटात गायब असतात पण सत्ता समोर दिसताच पुन्हा सर्वांच्या आधी त्या त्या नेत्यांना बिलगून झोंबून पाय पकडून मोकळे होतात हनुमंत मात्र तसे नसतात ते त्या त्या नेत्यांच्या अडचणीच्या संकटाच्या काळातही पाठीशी भिंत करून उभे असतात. मनसे नेते संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांचे नारद नव्हेत हनुमंत आहेत, जेथे कमी तेथे आम्हीच त्यांनी हे राज ठाकरे यांना सांगूनच ठेवले आहे त्यामुळे मनसे संकट आंदोलन असे समीकरण आले रे आले कि तेथे संदीप देशपांडे हजर नाहीत उपस्थित नाहीत सर्वात पुढे नाहीत असे आजवरच्या त्यांच्या व राज यांच्या एकत्रित राजकीय वाटचालीत कधीही घडलेले नाही…
कुटुंबाची अगदी लहान वयात अंगावर पडलेली जबाबदारी त्यात कुटुंबाचे बिघडलेले आर्थिक गणित संदीप कुटुंबाचे त्यांच्या अगदी तरुण वयात एकमेव आधारस्तंभ वरून हा असा सुरुवातीपासून चळवळ्या दुसऱ्यांना थेट अंगावर घेण्याचा स्वभाव प्रत्यक्षात संदीप यांना बघितले तर तुम्हाला तसे अजिबात वाटणारही नाही कि किरकोळ शरीरयष्टीचा संदीप वेळ आली कि राज यांचा हनुमंत होऊन थेट रावणाला आव्हान देऊन मोकळा होतो भल्याभल्या विरोधकांच्या नाकात दम आणतो. मित्रहो, दादरमध्ये राहून मनसेचा प्रसंगी एकट्याने किंवा चिल्यापिल्यांना घेऊन किल्ला लढविणे कसे व किती कठीण काम आहे हे त्या दादर परिसरात राहिल्याशिवाय कळत नाही पण एकेक दिग्गज जेव्हा राज ठाकरेंना सोडून जात होते तेव्हापासून तर आजतागायत सतत संदीप कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता राज यांनी केलेला हुकूम एक हनुमंत या नात्याने शिरसावंद्य मानून लढाई लढा आंदोलन मग ते कितीही अडचणीचे अशक्य असले तरी मोहिमेवर निघतात सोपविलेली जबाबदारी पार पाडून मोकळे होतात अगदी मनसेचा प्रसंगी प्रवक्ता म्हणूनही ठिकठिकाणी बुद्धिमान बोलक्या विरोधकांच्या नाकात दम आणतात आरे ला कारे ने तेथल्या तेथे जीवाची पर्वा न करता संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले नाही असे कधी घडलेच नाही त्यामुळे तुरुंगात जाणे असो अथवा हाती दगड घेऊन रस्त्यावर थेट उतरणे असो संदीप कायम आघाडीवर असतात कधी कधी तर असे वाटते संदीप आणि राज हे दोघेच अख्य्या विरोधकांना पुरून उरतात. आजही आणि आधीही दूरदूरपर्यंत मनसे सत्तेच्या जवळ नाही सतत फक्त आणि फक्त संघर्ष करते आहे आणि या खडतर कालखंडात देखील राज व मनसेच्या पाठीशी जीवाची काळजी न घेता कायम लढा देणार्या संदीप देशपांडे नावाच्या या जिगरबाज नेत्याला मनापासून सलाम…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी