फाल्तुक फंडे भगिनी मुंडे : अंतिम भाग : पत्रकार हेमंत जोशी
एखाद्याचे सत्वाने आणि तत्वाने वागणे आपणा सर्वांना आकर्षित करते नाही का, १६ जुलैला माझ्या ओळखीतल्या एका उत्तम आयपीएस पोलीस अधिकाऱ्याचा वाढदिवस होता, मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला त्यांनी तो उचलला नाही म्हणून मेसेज केला, रात्री उशिरा त्यांचा रिप्लाय आला कि ते कार चालवत होते म्हणून त्यांनी त्यावेळी माझा फोन घेतला नाही आणि मला आश्चर्य याचे वाटले कि आजही असे अनेक चांगले सरकारी अधिकारी आहेत कि जे बऱ्यापैकी सत्वाला आणि तत्वाला जगतात म्हणजे हे महाशय मुंबईतल्या ट्राफिकचे एक प्रमुख, समजा त्यांनी कार चालवतांना फोन उचललाही असता तरी त्यांना अडवण्याची हिम्मत एकातही नसेल पण त्यांनी स्वतःच सत्व व तत्व सांभाळले, अशा छोट्या छोट्या घटनेतून अमुक एखाद्याची नेमकी वृत्ती लक्षात येत असते. नेमके हेच मला माझ्या दिवंगत जिवलग मित्राच्या कन्येला म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे यांना सांगायचे आहे कि आता त्यांचे बाबा हयात नसल्याने, संयमाने वागण्याची बोलण्याची फार मोठी जबाबदारी पंकजा आणि प्रितमवर येऊन पडलेली असतांना त्या दोघीही ज्या विचित्र पद्धतीने वागता बोलताहेत त्यातून त्यांचे फार मोठे राजकीय नुकसान नक्की होणार आहे. मोदी शाह नड्डा हे तिघेही पंकजा यांच्या मीडियाला सांगण्यानुसार त्यांचे नेते पण राज्यातल्या वडिलांच्या मित्रांना किंवा कट्टर फॉलोअर्स नेत्यांना असे फाट्यावर मारणे त्यांना उठसुठ अपमानित करणे अजिबात योग्य नाही, अशा घटनांची किमान भाजपामध्ये नकारात्मक दखल कायम घेतली जाते. स्वतःला पंकजा यांनी पांडव ठरविले पण त्याचवेळी त्यांनी पक्षातल्या, या राज्यातल्या नेत्यांना जे थेट कौरव म्हटले आहे याचा थेट व सरळ अर्थ त्यांनी चंद्रकांत पाटलांपासून तर आशिष शेलार देवेंद्र फडणवीस मंगलप्रभात लोढा सुधीर मुंनगंटीवार गिरीश महाजन भारती पवार रावसाहेब दानवे नितीन गडकरी इत्यादी महत्वाच्या मोठ्या नेत्यांना थेट कौरव ठरवून एकप्रकारे वडिलांच्या वयाच्या वडिलांच्या मित्रांचा किंवा त्यांच्या कट्टर अनुयायांचा मोठा अपमान केला आहे ज्याची मोठी नोंद भाजपाने नक्की घेतलेली आहे…
अर्थात पंकजा आणि प्रीतम यांच्या टीकेचा रोषाचा नाराजीचा अस्वस्थतेचा रागाचा प्रामुख्याने रोख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे असतो हे आता अजिबात लपून राहिलेले नाही आणि असे फडणवीस यांना अपमानित करणे टार्गेट करणे त्यांना भविष्यात नक्की राजकीय हानी पोहोचविणारी असल्याचे येथे सांगावेसे वाटते, जे एकनाथ खडसे यांनी केले तेच पंकजा प्रीतम करताहेत फक्त जी मोठी चूक खडसे यांनी केली म्हणजे राष्ट्रवादीत जाण्याची ती तशी चूक प्रीतम व पंकजा यांनी अलीकडे दिल्लीहून परतल्यावर नक्की टाळली आहे म्हणजे त्यांनी तूर्तास शिवसेनेत जाण्याचे म्हणाल तर पोस्टपोन केले आहे म्हणाल तर रद्द केले आहे जे त्या दोघींच्याही दृष्टीने नक्की चांगले घडलेले आहे कारण आपण भाजपा सोडल्यानंतर पुढल्या क्षणी धनंजय मुंडे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांना माझ्या गौप्य्स्फोटावरून किंवा धनंजय यांच्या संशयित हालचालीवरून नक्की कळले आणि हे घडले तर भाजपामध्ये कालांतराने धनंजय हे गोपीनाथजी यांची जागा घेतील आणि आपले शिवसेनेत जाऊन फारसे काही चांगले होईल असे नाही हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी भाजपा सोडण्याचा विचार तूर्तास सोडला आहे पण जर त्यांना यापुढे भाजपामध्ये सन्मानाने राहायचे असेल तर उठसुठ देवेंद्र किंवा तत्सम नेत्यांना कौरव ठरवून नक्की भले होणारे नाही कारण देवेंद्र स्वतःच्या मनाने असले एखाद्याला पक्षातून संपविण्याचे कोणतेही कारस्थान करीत नाहीत फक्त ते अशा पद्धतीच्या नेत्यांचे पुरावे श्रेष्ठींकडे म्हणजे मोदी शाह नड्डा यांच्याकडे सादर करतात त्यानंतर ते तिघे पक्षाला हानी पोहोचविणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून मोकळे होतात.विजय नीतिमत्तेचा होईल असे पंकजा म्हणतात तेव्हा मोठ्यांदा हसायला येते कारण मंत्री असतांना त्यांनी केलेल्या आर्थिक गडबडी किंवा प्रीतम यांच्या बाबतीत म्हणजे या दोघी शिवसेनेत येणार असल्याचे कानावर पडल्यापासून अस्वस्थ झालेले एकनाथ शिंदे हे मुंडे भगिनींच्या नीतिमत्तेवर किंवा पंकजा यांच्या पतीच्या नेमक्या वागण्यावर भाष्य करून जेव्हा मोकळे होतील तेव्हा तीन बोटे स्वतःकडे असलेल्या पंकजा यांची मोठी पंचाईत होईल…
बेधुंद बोलणे वागणे आता भाजपामध्ये कोणाही नेत्याला नक्की परवडणारे आणि मोदी यांना अजिबात आवडणारे नाही, भाजपा म्हणजे राष्ट्रवादी नव्हे जेथे नेत्यांचे भ्रष्टाचार व गुंडगिरी हे शिष्टाचार म्हणून बघितले किंवा पाळले जातात कारण पवारांच्या राजकीय निवृत्तीनंतर राष्ट्रवादी संपणार आहे आणि भाजपा व काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष नक्की जिवंत राहणार आहेत कायम टिकणार आहेत म्हणून ज्या पक्षाचे नाना पटोले या राज्यात नेतृत्व करतात पक्षाचे अस्तित्व कायम टिकवण्यासाठी ते अल्प आयुष्यमान असलेल्या राष्ट्रवादीवर तुटून पडतात. नेता मग तो राज्यात किंवा त्याच्या परिसरात कितीही बलवान किंवा लोकप्रिय असला तरी अमुक एखादा नेता सतत वागण्या बोलण्यातून चुकत असेल तर नेता मग तो एकनाथ खडसे असो अथवा केंद्रीय मंत्री मंडळातून डच्चू मिळालेले संजय धोत्रे असोत, शाह मोदी नड्डा योग्य संधी साधून अशा नेत्यांना क्षणार्धात हवेतून जमिनीवर आणतात. राज्यातल्या प्रभावी आक्रमक वंजारा समाजावर ढिली होत चाललेली पकड किंवा विधान सभेला झालेला पराभव, भाजप मधले डळमळीत झालेले स्थान आणि त्याचवेळी समाजात राज्यात मतदारसंघात फार पुढे निघून गेलेले धनंजय मुंडे यांच्याशी असलेला थेट सामना, वास्तविक अत्यंत शांत डोक्याने मुंडे भगिनींनी त्यावर उपाय शोधणे गरजेचे असतांना किंवा ज्यांना त्या भावासारखे बघतात त्याच देवेंद्र फडणवीस यांचा आधी विश्वास संपादन करून त्यानंतर त्यांचे सतत सहकार्य घेऊन विस्कटलेली सर्वस्वी घडी आधी नीट बसविणे पंकजा आणि प्रीतम दोघींच्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाचे ठरणार आहे शिवाय कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याचा राहुल महाजन होणार नाही याची देखील त्यांना डोळ्यात तेल घालून काळजी घेणे गरजेचे ठरणार आहे, अन्यथा पुढला राजकीय काळ व वाटचाल फार यशाची असेल ठरेल असे निदान मला तरी वाटत नाही. सत्तेची आणि खुर्चीची लालसा नसणारे निदान भाजपामधले नेते असे अस्वस्थ होऊन वायफळ बडबड करून स्वतःचा एकनाथ खडसे करवून घेत नसतात पंकजा, आमचा तुमच्यासाठी तुम्ही जवळच्या मित्राची कन्या असल्याने मनापासून जीव तुटतो म्हणून हे स्पष्टपणे लिहितोंय, कृपया आमच्या लिखाणाचा नकारात्मक अर्थ न काढता त्यावर सकारात्मक विचार करावा आणि शांतपणे कामाला पुन्हा एकदा जुंपून घ्यावे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी