अरेरे ! आवडते आदर्श तिन्ही शिक्षक लागोपाठ जगाआड : पत्रकार हेमंत जोशी
प्रत्येक हिंदूंच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व अर्थात आई वडिलांना गुरु आणि सद्गगुरु यांना असते, ज्या हिंदूंच्या आयुष्यात हे चार कस्पटासमान असतील तो हिंदू पोर नालायक निघाला असेच समजावे किंवा या चारपैकी जर एकालाही आपले अमुक एक मूल लवकरात लवकर या पृथ्वीवरून नष्ट व्हावे वाटते तेही मूल तद्दन नालायक जन्मले असे समजण्यास हरकत नसावी. आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे झळकणारा आनंद आणि समाधान. शाळा महाविद्यालयातून आपल्याला घडविणारे शिक्षक प्राध्यापक इतरांसाठी कदाचित सर्वसामान्य किंवा बिना ओळखीचे असू शकतात पण आपल्यासाठी ते खूप मोठे असतात जशी चांगल्या वर्तनाच्या मंडळींना सतत आई वडिलांची आठवण येत असते तीच त्यांची अवस्था गुरु आणि सद्गगुरु विषयी असते कारण आपल्या जडणघडणीत या चार व्यक्तींचा अत्यंत महत्वाचा सहभाग असतो. अलीकडे ८ जुलैला अशाच माझ्या आवडत्या शिक्षकांचे जळगाव जामोद या माझ्या गावातल्या माझ्या अतिशय आवडत्या गुरुजींचे श्री पंडितराव पुराणिक यांचे निधन झाले त्याआधी केवळ तीन महिन्यात श्रावण कपले आणि प्रकाश दुबे यांचेही असेच कोरोनात अडकून निधन झालेले असल्याने लागोपाठ हा तिसरा धक्का नक्की सहन करण्यापलीकडे ठरला. हे तिघेही जसे माझे अत्यंत आवडते शिक्षक होते तसे ते मला मित्रासारखे आणि मार्गदर्शक पण होते जसे माझे त्यांच्यावर अतोनात प्रेम होते तसे त्या तिघांचेही माझ्यावर पुत्रवत प्रेम होते त्यांना माझे प्रचंड कौतुक होते त्यांना माझा अभिमान होता जो त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवायचा त्यामुळे जरी मी त्यांच्यापासून राहायला येथे दूरवर मुंबईत होतो तरी जशी मला कायम आई वडिलांची आठवण येते तशी या तिघांचीही सतत दरदिवशी निदान एकदा तरी आठवण येत असे त्यामुळे या तिघांचे लागोपाठ देवाघरी जाणे मन अस्वस्थ सैरभैर झाले आहे मन यादिवसात कशातही लागत नाही. पुराणिक सरांच्या उदाहरण देऊन शिकवण्याची पद्धत मी आजही नेहमी लिखाणातून वापरतो. हे तिघेही माझे शिक्षक असूनही माझ्या लिखाणाला कायम दाद देणारे. एकदा पुराणिक सर म्हणाले तुझे लिखाण खूप छान पण अनेकदा तू अश्लील लिहितोस त्यावर मी म्हणालो, तुम्हाला अश्लील लिहिणारे आचार्य अत्रे आवडते मग माझ्या अश्लील लिखाणावर तुमचा आक्षेप का आणि मी त्यांना अत्रे यांचा तो विनोद सांगितला कि कर्नाटकातले बेळगाव समर्थक नेते एकदा अत्रे यांना म्हणाले कि बेळ हे सुरुवातीचे दोन शब्द कानडी त्यामुळे बेळगाव कर्नाटकातच हवे त्यावर हजरजबाबी आचार्य म्हणाले, असे असेल तर लंडन महाराष्ट्रात किंवा किमान हिंदुस्थानात तरी असायलाच हवे आणि त्यांच्या या उत्तरावर कानडी नेते आल्या पावली परतले. अर्थात माझ्या या किस्स्यावर सरांनी फोन खाली ठेवला. जसे बारामतीचे शरद पवार आणि धुळ्याचे रोहिदास पाटील नसते तर मला मुंबईत बस्तान बसविणे कठीण झाले असते तसे माझ्या आयुष्यात आई वडील सद्गगुरु कलावती देवी किंवा कपले पुराणिक दुबे यांच्यासारखे आदरणीय व पुत्रवत प्रेम करणारे हे असे गुरुजी शिक्षक नसते तर माझे हे आयुष्य मला कायम रिते रिते वाटले असते. जे माझे मत तेच साऱ्या हिंदूंचे असते म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात या मंडळींना नक्की देव्हार्यातच स्थान असावे असते अन्यथा आपण काहीतरी मोठी चूक करतो आहे हे समजून चालावे. पंडितराव पुराणिक सरांचे अनेक गुण मला आवडायचे, ते अत्यंत चतुर व व्यवहारी होते त्यामुळे त्यांनीही शून्यातून आमच्या गावात आणि त्यांच्या घरी विश्व निर्माण केले. सर्व श्री श्रावण कपले प्रकाश दुबे आणि पंडितराव पुराणिक या तिन्ही शिक्षकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी