पवारांचे मित्र गोविंदरावांचा मृत्यू : पत्रकार हेमंत जोशी
मृत्यू अटळ आहे पण काही मृत्यू मनातून शेवटपर्यँत निघता निघत नाहीत ज्यांची मने हळवी असतात माझ्यासारखी, तयांना जवळच्या लोकांच्या जाण्याने हृदयाला जखम होते जी शेवटपर्यंत भरून येत नाही. माझ्या वडिलांचा मृत्यू होऊन जवळपास ३३ वर्षे उलटलीत त्याआधीही १३-१४ वर्षे मी घर सोडले होते तरीही त्यांची आठवण झाली नाही असा एकही दिवस जात नाही. पत्रकार धर्मेंद्र जोरे याच्या मुलास मी फारतर तो जाण्याच्या आधी एक दोनदा भेटलो असेल पण आजही या तरुणाच्या धर्मेंद्रच्या मुलाच्या जाण्याने मनापासून वाईट वाटते. धर्मवीर आनंद दिघे यांचे अकस्मात जाणे असेच अस्वस्थ करून सोडते. ज्यांनी हे जग सोडले आणि त्यांचे जाणे मला अस्वस्थ करून गेले अशी फारमोठी यादी त्यातलेच एक गोविंदराव आदिक. शरद पवारांचे मित्र पवार घराण्याशी शेवटच्या श्वासापर्यंत एकरूप असलेले पण पवारांनी मात्र नेहमीप्रमाणे राजकारणात त्यांना अस्वस्थ करून सोडले. गोविंदराव म्हणे राजकारणात ऍक्टिव्ह असलेल्या एकुलत्या एक मुलास अविनाश आणि श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा कन्येस अनुराधाला हमखास सांगायचे कि मला दिसतंय मी तुमचा फार दिवसांचा सोबती नाही पण माझ्यानंतर माझी जागा फक्त आणि फक्त शरदरावांना द्यायची त्यांच्याशी लॉयल्टी हेच तुमचे ब्रीद असावे काही मिळो अथवा न मिळो. अनुराधा तर तिकडे श्रीरामपूरला व्यस्त असतात मात्र अविनाश मला पवारांची बापासारखी सेवा करतांना दिसतो तसे कानावर पण येते….
दिवंगत, माझे लाडके रामराव आदिक अर्थमंत्री असतांना मंत्रालय सहाव्या माळ्यावरच्या कार्यालयातील अँटी चेंबर मध्ये एक दिवस त्यांच्या संगतीने जेवत होतो, लेखा आदिक पाठक पण तेथे होत्या आणि तेवढ्यात त्यांचे धाकले बंधू गोविंदराव आत आले, बोलतांना माझी पहिल्यांदा तेथे या रुबाबदार देखण्या गोविंदरावांशी रामरावजींनी ओळख करून दिली जी पुढे दृढ झाली त्यानंतर अनेकदा त्यांची भेट होत असे कारण राष्ट्रवादीच्या कार्यालयात गोविंदराव ठाण मांडून बसायचे, भावाच्या किंवा जिवलग मित्राच्या प्रेमापोटी म्हणजे शरद पवार यांच्यासाठी गोविंदरावांनी फार मोठे राजकीय भवितव्य असतांना देखील काँग्रेस सोडली होती आणि राज्यात खेड्यपाड्यातून राष्ट्रवादी उभी करण्यासाठी त्यांनी तेथे कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी करून सतत पायपीट सुरु ठेवली होती पण पवारांनी मात्र गोविंदराव आदिक यांचा प्रफुल्ल पटेल केला नाही याची आजही अनेकांना मला प्रत्येकाला मोठी खंत आहे, गोविंदरावावर मनापासून प्रेम करणाऱ्या गजानन देसाई सारख्या नेत्यांना तर पवारांच्या या अंतर राखण्याच्या स्वभावावर आजही मोठा राग आहे. हा लेख लिहीत असतांना गोविंदरावांना जाऊन सहा वर्षे उलटली आहेत त्यानिमीत्ते माझ्या या आवडत्या नेत्याची मला प्रकर्षाने आठवण झाली आहे. गोविंदराव तुमची कायम आठवण येत असते. मनातले सांगतो, रामराव आदिक तर खऱ्या अर्थाने गोविंदराव यांचे मोठे बंधू आणि शरद पवार त्यांचे जवळचे मित्र जरी असले तरी गोविंदराव पवारांना कायम मोठ्या भावाचे स्थान देत आलेले पण गोविंदरावांचे दुर्दैव असे कि या दोघांनीही गोविंदरावांमधल्या अत्युच्च नेतृत्व गुणांना कायम दाबून ठेवले, हे दोघे मनापासून जर गोविंदरावांच्या मागे उभे ठाकले असते तर गोविंदराव होते त्यापेक्षा आणखी कितीतरी मोठे त्या राजकारणात झाले असते तरीही फार फार मोठ्या मनाच्या गोविंदरावांनी या दोघांविषयी सतत ममत्व बाळगले आणि कायम आदराने बघितले…
मनातून कायम शेवटपर्यंत विविध कारणांनी अस्वस्थ तरीही ते स्वभावाने अति शांत, ते देखणे व शिक्षित असल्याने कोणत्याही प्रांतात उतरले असते तरी यशस्वी ठरले असते. विशेष म्हणजे ते मोठे कामगार नेते होते तरीही आजच्या बहुतांश खादाड कामगार नेत्यांसारखे कामगार व मालक यांना लुटून श्रीमंत होणार्यातले नव्हते, कामगारांची मनोभावे सेवा करणे जणू त्यांच्या रक्तात होते. ते खूप मेहनती होते त्यांच्या या मेहनती वृत्तीमुळेच आधी काँग्रेस नंतर राष्ट्रवादी तळागाळात रुजली रुतली भिनली होती. ऋषी कपूर मुळे जसे रणधीर आणि राजीव दिसेनासे झाले होते ते तसे गोविंदरावांच्या बाबतीत कायम घडले म्हणजे कायम सत्तेत बसलेले शरद पवार आणि रामराव आदिक यांच्यापुढे व यांच्यामुळे राजकारणातले हे तेजस्वी नेतृत्व अखेरपर्यंत कायम झाकोळले गेले. माणूस मग तो जागतिक उंची गाठलेला असो कि सामान्य कार्यकर्ता किंवा साधा कामगार, रुबाबदार बोलके आश्वासक तेजस्वी गोविंदराव समोरच्याला क्षणात आपलेसे करून मोकळे व्हायचे. विशेष म्हणजे राजकारणात पैसा कमवायचा असतो किंवा कमवून जमवून ठेवायचा असतो हे त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी मध्ये कायम राहूनही कधी जमले नाही त्यांच्या ते मला वाटते फारसे कधी डोक्यातही आले नसावे पैसे कामवायच्या अनेक संधी असतांनाही. त्यांना ना शरद पवार रामराव आदिक यांच्या सत्तेत असण्याचा मत्सर होता ना इतर पुढे जाण्याचा. त्यांनी घरी आणि दारी अनेक दुख्खे संकटे बघितली भोगली पण त्यांच्या वागण्यावर कधीही ना घरात ना बाहेर कोणते बदल वा परिणाम जाणवले ते कुटुंबावर आणि बाहेरच्यांवर मनापासून प्रेम करणारे मोठ्या मनाचे पिता आणि नेते होते असे मला जाणवले. व्यवहार तर जवळपास त्यांना कधी जमलाच नाही त्यामुळे त्यांच्या भरवशावर सचिन अहिर सारखे कित्येक श्रीमंत आणि मोठे होत गेले, काहीतर त्यांना कायम फसवत गेले पण गोविंदराव शांत राहून संघटनेत रमत होते. ते आजही जेथे असतील तेथेही त्यांची इतरांसाठी धडपड सुरु असेल…