जेवढ्या अधिक वेळ मी टवाळक्या करेल इतरांशी बोलत राहीन सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असेल अनेकांशी सतत चॅटिंग करेल फेसबुकवर असेल व्हॉट्सअप वर चॅटिंग करेल थोडक्यात जेवढा अधिक टाइम पास करेल ते माझ्या धंद्यासाठी फायद्याचे ठरेल किंवा ठरत आलेले आहे. पत्रकारिता क्षेत्रच असे आहे कि जेवढ्या ज्यादा ओळखी तेवढा अधिक फायदा जो मी कायम उचलत आलो आहे. पत्रकारिता हे ज्याला जमले त्याच्यासाठी मस्त क्षेत्र आहे. नाना प्रकारच्या माणसांशी याराना दोस्ताना तुम्हाला खूप आनंद देऊन जातो. विशेष म्हणजे आपल्या राज्यातली कोरोना महामारी येथल्या काही करंट्या दळभद्री लोकांमुळे काही केल्या अद्याप आटोक्यात आलेली नाही उलट आता कोरोना अधिक डेंजर होऊन बसला आहे, माणसाचे मरण त्यातून खूप स्वस्त झालेले आहे हे नक्की. एकमेकांना सांभाळून घेणे आणि सांभाळून ठेवणे हे या दिवसात ज्याला जमले तो खरा पुण्यवान असे माझं स्पष्ट मत आहे. पण आम्ही मराठी या अडचणीत देखील गैरफ़ायदे घ्यायला कचरत नाही अन्यथा सरकारी योजनांवर या दिवसात देखील डल्ला मारणारे डाका घालणारे राजकारणी आणि अधिकारी त्यांच्या मृत्यूनंतर नक्की थेट स्वर्गात पोहोचले असते पण असे अजिबात घडणार नाही कारण सरकारी मदतीवर ते सारे डाके घालून फडशा पाडून मोकळे होताहेत. काही प्रसंग तर या कोरोना महामारीत अंगाचा थरकाप उडवतात जसे माझ्या एका जवळच्या मित्राची नातलग तिला तीन तीन मुलंबाळं आणि पर्वा ती ऐन तारुण्यात विधवा झाली विशेष म्हणजे नवर्याच्या तेरवीलाच तिचा माझ्या या मित्राला फोन, माझ्यासाठी उद्यापासून जॉब बघ, नोकरी बघ. केवढा तिच्यावर हा दुर्धर प्रसंग, विशेष म्हणजे तिला नवरा हयात असतांना त्याने कधीही नोकरी करू दिलेली नाही त्यामुळे नेमके काय करावे कसे जगावे तीन तीन मुलांना घेऊन, तिला सुचेनासे झाले आहे. माझा हा प्रामाणिक मित्र आपल्या या नातलग बहिणीसाठी झगडतो आहे, योग्य मार्ग शोधतो आहे. रुना नावाची माझी एक मैत्रीण, ती आणि तिचा नवरा या कोरोना महामारीत त्यांच्या व्यवसायात रस्त्यावर आले असतांना देखील, अलीकडे मला भेटून म्हणते कशी, हेमंत मला एखाद्याने आर्थिक पाठबळ दिले तर दररोज सकाळी मी काही कुटुंबांना मोफत एकवेळचे जेवण देईन म्हणते. त्यावर, सुरुवातीला महिनाभर जेवण खर्च माझ्याकडून मी तिला म्हणालो तेव्हा ती मोठा भाऊ या नात्याने माझ्या पाया पडली. पण अशीही माणसे आहेत कि जी स्वतः प्रचंड अडचणीत असतांना देखील त्यांची इतरांसाठी धावून जाण्याची मनातून इच्छा आहे…
आपण सार्यांनीच या दिवसात या कठीण प्रसंगी एकमेकांसाठी धावून जायचे यायचे आहे तरच यातून बाहेर पडणे सहज शक्य होईल अन्यथा जवळपास ८० टक्के कुटुंब कोरोना महामारीत आर्थिक मानसिक संकटात सापडले आहेत त्या साऱ्यांना स्वतःचा जीव देखील नकोसा होण्याची मोठी शक्यता आहे. एकमेकांना सहकार्य करतांना मनात जर तुम्ही हेतू किंतु ठेवून मदतीला धावणार असला तर तुमच्यासारखे नीच तुम्हीच, मी म्हणेन. श्रीमती प्रिया शाह दादरला सावरकर जेथे वास्तव्याला होते त्या सावरकर सदन मध्ये त्या आपल्या तीन मुलांसहित राहतात. मुले उत्तम घडल्याने प्रिया यांनी त्या साठीला आल्या असतांना कायद्याची पदवी या वयात घेऊन आम्हा साऱ्यांना चकित केले. अलीकडे मुद्दाम त्यांच्या घरी गप्पा मारायला गेलो होतो. विशेष म्हणजे सावरकर सदन मध्ये ज्या डुप्लेक्स मध्ये शाह कुटुंब राहते ते घर त्यांनी दिवंगत दादा कोंडके यांच्या कडून विकत घेतले आहे. जेव्हा दादा गेले तेव्हा त्यांच्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी ४०० प्रॉपर्टीज होत्या पण त्यांच्यानंतर त्या मालमत्तेचे काय झाले कळलेले नाही. बघा आयुष्य कसे अस्थिर असते, एकदा का मुख्य माणूस गेला कि काही खरे नसते. प्रिया शहा मला सावरकर आणि कोंडके यांच्या कुटुंबातील गॉड आठवणी सांगतांना भूतकाळात मनापासून रमल्या होत्या. सावरकर सदन मध्ये आता सावरकरांच्या स्नुषा सुंदर विश्वास सावरकर राहतात त्या अत्यंत देखण्या म्हणून त्यांचे नाव देखील सुंदर असेच आहे. जे नेते बाहेर सावरकरांचे दाखले देऊन मते मिळवितात त्यांचे या सावरकर सदनाकडे ढुंकून देखील बघणे नसते ज्याचे शाह यांना मनापासून वाईट वाटते. दादा कोंडके यांनी जे लिहून ठेवले आहे तेच खरे आहे, कोंडके लिहितात, मला सारे काही दिले पण एकटेपण देखील दिले. पुढल्या जन्मी देवाने मला पैसा प्रसिद्धी यश काहीही दिले नाहीं तरी चालेले पण एकटेपण देऊन नये, माझी म्हणता येतील अशी माणसे मला द्यावीत. मित्रानो, सावरकर सदन मधून बाहेर पडतांना मला सुंदर सावरकर आणि दादा कोंडके सतत डोळ्यासमोर आले आणि आपोआप डोळ्यात पाणी तरळले. लोकांना सतत हसत ठेवणारे दादा आज मात्र त्यांच्या या आठवणी निघाल्या आणि रडू कोसळले…