मंत्रालयातील माहिती आणि जनसंपर्क कार्यलयाशी तसा माझा ५ वर्षांपासून संबंध. पत्रकारितेला जेव्हा सुरुवात केली, मंत्रालयात जेव्हापासून यायला लागलो तेव्हापासून पत्रकारांसाठी “मंत्रालयातील मार्गदर्शक केंद्र” असलेल्या या कार्यालयाच्या सतत संपर्क आहे. आम्हा पत्रकारांना लागणारे अनेक रेफरन्सेस, माहिती, वाहने, प्रेस कॉन्फरन्सच्या वेळा सगळेच इथूनच कळायचे. सतत हसतमुख, सगळ्यांना मदत करण्याच्या भावनेने अक्षरशः प्रत्येक पत्रकाराला आपलेसे वाटणाऱ्या, निवृत्त श्रद्धा खारकर-बेलसरे या खात्यातील माझ्या सर्वात आवडणाऱ्या अधिकारी. श्रद्धाताईंकडे दिवसभर जेष्ठ आणि दिग्गज पत्रकारांची चहलपहल असायची. मी नवीन असल्यामुळे मला तर त्यांनी हेमंतचा मुलगा म्हणून कधीच वागवले नाही. “तू एक स्वंतंत्र पत्रकार आहेस, काहीपण मदत लागली तर निश्चितच मला सांग, आणि कधीही गप्पा मारायला येत जा” , हा त्यांचा मला दिलेला पहिला सल्ला! पण तुम्हाला आज ताईंचा आणखी एक ‘ऑफ द रेकॉर्ड’ किस्सा सांगतो. मंत्रालयात दोन दिग्गज पत्रकार नेहमी भांडायचे. दोघांमध्ये विस्तवही जात नव्हता. एक “अतुल्य” पत्रकार मंत्रालयावर, खास करून गृहमंत्र्यांवर पकड जमवायचा. दुसऱ्या पत्रकाराला हे कधीही आवडत नसे. ते सारखे त्याला सावध करायचे. पण हा ऐकण्याच्या पलीकडे होता. दोघेही मोठ्या दैनिकाचे. गम्मत म्हणजे हे दोघेही पत्रकार एकदा मी ताईंकडे गेलो असताना अगदी माझ्यासमोरच भांडले. पण ताईंचा स्वभाव बघा, दोघेही आज जिवलग मित्र.अस लोक सांगतात की श्रद्धाताइनेच या दोघांमधील भांडणे आणि दुरावा मिटवला. अशा आमच्या प्रेमळ ताईंना आम्ही आज मिस करतो . असो. एडिसन सारखे दिसणारे प्रल्हाद जाधव यांनीसुध्दा या कार्यालयात भरपूर सेवा दिली. तेही आता निवृत्त झाले आहेत. तुम्हाला सांगतो, खास करून पत्रकारांना माहित असेल, या दोघाही संचालकांचा स्टाफ यांचाचसारखा हसतमुख. कधीही तुमच्याशी उद्धट बोलणार नाही, तुमचा निरोप अगदी नक्की देणार! अलीकडे बातमी होती की प्रल्हादजींना “सल्लगार” म्हणून शासन परत बोलावणार आहे. पण तसे काही घडले नाही. जिल्हा माहिती अधिकारी वर्षा अंधळे यांना तर मी कधीच विसरणार नाही. वर्षाताई मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडे काही काळ पीआरओ म्हणून होत्या. पृथ्वी बाबांनी अगदी मोजके ७ ते ८ पत्रकांराना सह्याद्री अतिथीगृहावर गप्पा मारण्यासाठी बोलावले होते. त्यात वर्षा ताईंनी माझे आणि चैतन्य मारपकवारचे नाव सुचवले होते. आम्ही पत्रकारितेत जेमतेम वर्षभर जुने. आणि थेट मुख्यमंत्र्यांसोबत गप्पा!
आजही आमचे मानकर साहेब, युवराज ठाकुर, जादिश मोरे, महाले, अशी काही अफलातून माणसे या कार्यालात अप्रतिम काम करताना दिसतात. महाराष्ट्रातसुद्धा इतर ठिकाणी रवि गीते, गणेश मुळे, दयानंद कांबळे इत्यादी लोक आपले देहभान विसरून कामे करत असतात. माझा एवढा मोठा मित्र संग्रह असताना देखील, या खात्याच्या सचिव किंवा महासंचालकांशी कधीही संबंध आला नाही. मात्र जर सनदी अधिकारी आणि माजी महासंचालक प्रमोद नलावडे सर, आताचे चंद्रशेखर ओक, सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांचे नावे नाही घेतली नाहीत तर लेख पूर्ण होणार नाही. हे सगळे अगदी टीपटॉप! हे सनदी अधिकारी एकदम कड़क पण त्यांची कोणी निंदा करताना दिसत नाही, किंवा ऐकू येत नाही, म्हणजे हे तिघेही चोखपणे काम करत होते आणि आहेत असा अंदाज बांधता येईल.
मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या काही मंत्र्यांनी बाहेरचे पीआरओ ठेवून आपल्या शासनाच्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांवर अन्याय केला होता. माझ्याच ब्लॉग २ मध्ये महिन्यापूर्वी त्याबद्दल सविस्तर लिहिले होते. मग अशा खात्यावर कधीही संकट आली तरी आम्ही पत्रकार यांचाकरिता कसे धावून जातो, हे तुम्हाला लक्षात येईल.
आता श्रद्धाताई निवृत्त झाल्यामुळे, त्यांच्या जागेवर श्रीयुत देवेंद्र भुजबळ आणि जाधव यांच्या जागेवर प्रमोट होऊन श्रीयुत मानकर आलेले आहेत. दोघेही आप-आपल्या कामात सुपर्ब! काल सहजच देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेला लेख हातात आला. माहिती खात्याचे “स्वच्छ कार्यालय, सुंदर कार्यालय” अभियान असा हा लेख आहे. एका चांगल्या खात्याकडूनच असा लेख आणि हा विचार येईल ही अपेक्षा खरी उतरली. खाली तश्याचा तसा पोस्ट करत आहे . कृपया हा लेख आवर्जून वाचावा. जर या लेखाप्रमाणे इतर खाती देखील वागली, तर परिस्थिती अनुकूल व्हायला वेळ लागणार नाही.
माहिती खात्याचे ”स्वच्छ
कार्यालय, सुंदर कार्यालय” अभियान
–देवेंद्रभुजबळ
संचालक (माहिती)(प्रशासन)
राज्याचे
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दि. 31 ऑक्टोबर, 2014 रोजी मुख्यमंत्री
पदाची सुत्रे हाती घेतली. यानंतर त्यांनी
अत्यंत मुलभूत व लोकाभिमुख निर्णय, योजना, उपक्रम, कार्यक्रम हाती घेतल्याने
प्रशासनात व राज्यात नवचैतन्याचे वारे वाहू लागले. सुदैवाने माहिती खातेही मा. मुख्यमंत्री
महोदयांकडेच असल्यामुळे खात्याला नवीन वाहने, नवीन टिव्ही कॅमेरे लॅपटॉप, संगणक
यंत्रणा, रिक्त पदे भरणे, तीन वर्षाच्या प्रलंबित पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण
विभागीय व राज्य अधिस्वीकृती समित्यांची गठण, आदी बाबी संपन्न झाल्या.
अत्याधुनिक
साधनसामुग्री बरोबरच मनुष्यबळ बदलत्या तंत्रज्ञानानुसार सक्षम होणेही आवश्यक
आहे. हे ओळखून माहिती खात्याच्या सचिव
श्रीमती मनिषा म्हैसकर-पाटणकर यांचे सातत्याने मार्गदर्शन आणि महासंचालक श्री.
चंद्रशेखर ओक यांचे सातत्याचे प्रोत्साहन यामुळे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
आणि महासंचालनालयाच्या अधिनस्त कार्यालये गतिमानतेने काम करु लागली आहेत.
राज्य शासनाने स्वच्छ
महाराष्ट्र अभियान हाती घेतले आहे. या
अनुषंगाने माहिती खाते ‘स्वच्छ कार्यालय, सुंदर कार्यालय’ हे अभियान राबवित
आहे.(1) कार्यालय व कार्यालयातील परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे (2) प्रशासन पारदर्शक,
कार्यक्षम व लोकाभिमुख करणे (3) सुसंवाद, सहकार्य, समन्वयाचे वातावरण ठेवणे (4) सौहार्दाचे
संबंध प्रस्थापित करणे (5) प्रसिद्धीसाठी कार्यतत्परता अशी या अभियानाची पंचसूत्री
आहे.
1) कार्यालय व
कार्यालयातील परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे.
1) प्रत्येक
शासकीय कार्यालयातील कार्यालयीन जागा ही नीटनेटकी व सुटसुटीत ठेवण्यात यावी. कार्यालयातील छन्नमार्ग (पॅसेज) तसेच पाय-यांवर
स्वच्छता राखून सदर मार्गात कोणतेही कार्यालयीन वस्तू/दस्ताऐवज/कपाट ठेवू
नये. तसेच कार्यालयातील जागेत पोषक
वातावरण निर्माण करण्यासाठी नस्ती/ऑफिस फाईल्स/कागदपत्रे इत्यादी सुयोग्य पद्धतीने
ठेवण्यात यावीत.
2) कार्यालयीन
तसेच कार्यालय परिसर जसे स्वच्छतागृहे, लिफ्ट इत्यादी जागा नेहमीच स्वच्छ व टापटीप
राहील, याची दक्षता घेण्यात यावी.
त्याचबरोबर कार्यालयाच्या लगतच्या बाहेरील जागा उदा. पार्किंग लॉट,
कार्यालयातील येण्या-जाण्याचा मार्ग इत्यादी ठिकाणी देखील तशीच स्वच्छता राखण्यात
यावी.
3) कार्यालय
तसेच कार्यालय परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी विनावापरातील
वाहने/फर्निचर/इलेक्ट्रॉनिक्स व विद्यूत उपकरणे इत्यादी जड वस्तू यांची
जाणीवपूर्वक विहित कार्यपद्धतीचा अवलंब करुन विल्हेवाट लावण्यात यावी.
4) कार्यालयीन
अभिलेख तसेच दस्ताऐवजांची रितसर नींदणी करण्यात यावी.
वरील
सुचनांच्या आधारे प्रत्येक कार्यालयाने कार्यालयीन स्वच्छता अभियान तातडीने सुरु
करावे. तसेच, कार्यालय व परिसरातील
स्वच्छता राखण्यात सातत्य राहावे, याकरिता असे अभियान राबविताना त्यात
कार्यालयातील सर्वांचा सहभाग सुनिश्चित करावा, जेणेकरुन स्वच्छता राखणे ही सामुहिक
जबाबदारी असल्याचे ठसविले जावून त्यामुळे शासकीय कार्यालयाची प्रतिमा उंचावली
जाईल.
5) स्वच्छता
राखणे ही नियमित स्वरुपाची बाब असल्याने त्यात सातत्य ठेवणे अत्यंत गरजेचे
आहे. त्यामुळे, कार्यालय व परिसरातील
स्वच्छतेचा स्तर हा कायम उच्च राहील याकरिता नियमित तपासणी करण्यात यावी.
2) प्रशासन पारदर्शक,
कार्यक्षम व लोकाभिमुख करणे.
1) शासनाने
नुकत्याच जाहीर केलेल्या सेवा हमी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे
जातीने लक्ष द्यावे.
2) माहितीचा
अधिकार अधिनियमानुसार जी माहिती स्वेच्छेने प्रकट करणे बंधनकारक आहे, अशी माहिती
वेळोवेळी अद्ययावत करुन ती प्रकट करीत जावी तसेच माहितीच्या अधिकारात प्राप्त
झालेल्या अर्जानुसार वेळीच व समाधानकारक माहिती दिली जाईल, याची दक्षता घ्यावी.
3) अधिकारी,
कर्मचारी, वृत्तपत्रे, अन्य संस्था, व्यक्ती यांची देयके प्रलंबित न राहता ती
तत्परतेने अदा होत राहतील याची दक्षता घ्यावी.
4) मुख्यालयाने
मागितलेली माहिती, मा. लोकप्रतिनीधी यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या व अन्य पत्रांची सत्वर दखल घेऊन योग्य ती
कार्यवाही करीत जावी.
5) कार्यालये
अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करीत जावे.
3) सुसंवाद, सहकार्य
आणि समन्वयाचे वातावरण ठेवणे.
1) जिल्ह्यात
दौऱ्यावर येणाऱ्या मा. मंत्री महोदय, वरिष्ठ अधिकारी यांना जिल्ह्यातील महत्वाच्या
घटनांची, घडामोडींची कात्रणे समक्ष भेटून द्यावी व जिल्ह्यातील परिस्थिती त्यांना
थोडक्यात अवगत करावी.
2) कार्यालयातील
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपापसात तसेच संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींशी
सौजन्याने वागून-बोलून सुसंवाद, सहकार्य आणि समन्वयाचे संबंध ठेवावे.
3) आपल्या
कार्यालयाच्या नावात माहिती कार्यालय असा उल्लेख असल्याने कार्यालयाशी संबंधीत
नसलेल्या बाबींचीही माहिती घेण्यासाठी अनेकदा नागरिक माहिती विचारण्यासाठी येतात.
अशा नागरिकांना त्यांना हवी असलेली माहिती कुठे उपलब्ध होईल याचे सौजन्यपूर्ण
मार्गदर्शन करावे.
4) कार्यालयातील
अधिकारी किंवा कर्मचारी अडीअडचणीच्या प्रसंगात सापडल्यास उदा. आजारपण, अपघात अशा
प्रसंगी कार्यालयातील अन्य अधिकारी आणि कर्मचारी यांनी संबंधीत
अधिकारी/कर्मचाऱ्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून अधिकाधिक सहकार्य
करावे.
5) ऐनवेळी
पत्रकार, अन्य अधिकारी यांच्याकडून शासकीय विश्रामगृहाची तसेच वेळ प्रसंगी वाहनाची
सुद्धा मागणी करण्यात येते. अशा प्रसंगी
त्यांना यथायोग्य सहकार्य करावे.
4) सौहार्दाचे संबंध
प्रस्थापित करणे.
1) आपल्या
कार्यक्षेत्रात आपल्या कामकाजाच्या स्वरुपामुळे आपला दैनंदिन वृत्तांकन करणाऱ्या
पत्रकारांशी, वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधीशी, कॅमेरामन, छायाचित्रकार यांच्याशी
सतत संबंध येत असतो. या सर्वांशी
सौहार्दाचे संबंध ठेवावेत.
2) आपल्या
कार्यक्षेत्रातील, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उदा. मा.लोकप्रतिनिधी, लेखक,
कवी, चित्रकार, शिल्पकार, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादी व्यक्तींशी देखील
सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करावेत.
3) महासंचालनालयास
लोकराज्य, महान्यूज तसेच वृत्त शाखेसाठी वेळोवळी विविध विषयावरील लेखनाची आवश्यकता
भासते. त्यामुळे विविध विषयावर लेखन
करणारे तज्ञ व्यक्ती, प्राध्यापक, शिक्षक, स्तंभलेखक यांच्याशी देखील सौहार्दाचे
संबंध प्रस्थापित करावेत.
4) जिल्ह्यात
वेळोवळी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उदा. चित्रपट कलावंत, नाट्य कलावंत,
सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक इत्यादी भेटी देत असतात. त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशीही सौहार्दाचे
संबंध प्रस्थापित करावेत.
5) जिल्ह्यातील
वैशिष्ट्यपूर्ण, यशस्वी झालेली योजना, उपक्रम पाहण्यासाठी व त्यावर लेखन
करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील स्तंभलेखकांना जिल्ह्यात स्वत:हून निमंत्रित
करुन त्यावर आधारित लेखन, छायाचित्रण करुन घ्यावे.
5) प्रसिद्धीसाठी कार्यतत्परता
1) प्रसिद्धी
हा महासंचालनालयाच्या कामकाजाचा गाभा असून शासनाचे निर्णय, योजना, उपक्रम,
कार्यक्रम अधिकाधिक गतिमानतेने सर्व प्रसार माध्यमांद्वारे, सोशल
मिडियाद्वारे नागरिकांपर्यंत पोहचविण्यास
प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने कार्यतत्पर राहावे.
2) कार्यालयातील
वाहने, स्टिल व दूरदर्शन कॅमेरे, संगणक यंत्रणा सतत सुस्थितीत राहिल, याची दक्षता
घ्यावी.
3) काही
प्रसंगी एकाच वेळेस अधिक कार्यक्रम आल्यास तसेच जिल्ह्यातील विविध विकास कामे,
यशोकथा, योजना इत्यादींच्या प्रभावी प्रसिद्धीसाठी जिल्ह्यातील आकाशवाणी, दूरदर्शन
आणि अन्य प्रतिथयश, स्ट्रिंजर्स यांचे सहाय्य घ्यावे. त्यांच्याकडून कवरेजबरोबर संबंधित वृत्त/यशोकथा
देखील घेत जावी. सदरचे चित्रण व बातमी
अथवा यशोकथा संबंधित अधिकाऱ्यांनी तपासून ती प्रसारित करावी. यासाठी त्यांना
सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. माजम-1096/1692/(प्र.क्र.317/96)/34,दि.
6 एप्रिल, 1999 नुसार स्ट्रिंजर्सना मानधन अदा करावे.
4) विविध
कार्यालयांमार्फत विविध योजना, उपक्रम राबविण्यात येतात. अशा कार्यालयांचे
कार्यालय प्रमुख आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यात नियमित संवाद घडवून
आणावा.
5) प्रसिद्ध
झालेल्या वृत्तांची कात्रणे, संबंधित मा. मंत्री, अधिकारी, अन्य कार्यालये यांना
वेळीच सुबकरित्या सादर करण्याची दक्षता घेत जावी.
उपरोक्त
सूचनांचा अवलंब करुन आपली, आपल्या कार्यालयाची व शासनाची प्रतिमा अधिकाधिक उज्वल
होत राहिल यासाठी माहिती कार्यालयाने हिरिरीने कार्य करावे, जेणेकरुन शासनाने नाक,
कान, डोळे अशी प्रतिमा असलेली माहिती कार्यालये अनेक लोकाभिमुख, कार्यक्षम होऊन
लोकोपयोगी ठरतील, अशी अपेक्षा आहे.