अलीकडे एक मित्र त्याच्या गावातल्या शाळा मास्तर विषयी सांगत होता.
जेथे कमी तेथे आम्ही, अशी त्या मास्तरांविषयी आख्यायिका होती, हे
मास्तर कोणत्याही महत्वाच्या कामात गावकऱ्यांना हमखास आठवायचे,
मास्तरांना सारे सर्वठिकाणी समोर करायचे. मास्तर रागीट होते पण समाज
सेवा त्यांना मनापासून आवडायची, त्यांचा धाक एवढा प्रचंड होता कि एकदा
एका मुलाला अनेक घरगुती उपचार करूनही शौचाला होईना तसेच एका
बाईचे बाळंतपण अडले होते, गावात डॉक्टर आलेला नव्हता मग दोन्हीकडे
मास्तरांना समोर उभे केले, मास्तरांनी मिशा पिळताच ती बाई तर मोकळी
झालीच पण पोरानेही खंडीभर हागुन ठेवले…
अलीकडे म्हणजे मंत्री झाल्यानंतर श्रीमान शिक्षण मंत्र्यांवरच्या आयोजक म्हणून
जबाबदाऱ्या कमी झाल्या अन्यथा तावडे हे देखील भाजपमधले मास्तरच होते,
कमी तेथे तावडेंची हमी असे त्यामुळे अमुक एखादे निवडणूक मिशन किंवा गोपीनाथ
मुंडे यांनी 1995 च्या सुरुवातीला काढलेली रामटेक ते शिवतीर्थ अशी ती गाजलेली
रथयात्रा असो किंवा मुंबईच्या रेस कोर्स वर गाजलेले भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन
असो, अत्र तत्र सर्वत्र नियोजनाची संपूर्ण जबाबदारी असायची ती प्रामुख्याने विनोद
तावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर, सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई आणि
तावडे एकमेकांचे सखे आहेत, नितीन यांच्या भव्य कल्पकतेचा भाजपच्या जाहीर
कार्यक्रमात अधिवेशनात रथयात्रेच्या वेळी तावडे यांनी अतिशय खुबीने उपयोग
करून घेतला आणि अविस्मरणीय असे अनेक जाहीर देखावे व नियोजन तावडे यांनी
प्रत्येकवेळी यशस्वी करून दाखविले. मुंबईकरांना भाजपतर्फे 2004 मध्ये सतत तीन
दिवस भव्य शिवाजी पार्कवर जे गीतरामायण घडवून आणल्या गेले आणि तिन्ही
दिवस जमणाऱ्या चाळीस हजार श्रोत्यांनी तिकीट काढून विविध नामवंत गायकांच्या
तोंडून जो गीतरामायणाचा आनंद घेतला, अर्थात ते नियोजन आयोजन केले ते याच
विनोद तावडे यांनी आणि दरवर्षी न चुकता मुंबईत आयोजित केल्या जाणाऱ्या
कोकणातल्या आंबा महोत्सवाची कल्पना कोणाची, अर्थात नामदार विनोद तावडे
यांची त्यामुळेच मुंबईकरांना नेमके हापूस योग्य दरात चाखायला मिळतात, नेमके
आंबा फळ त्यांच्या हातात पडते, अन्यथा सांगतात रत्नागिरीचा हापूस आणि आंबा
असतो जवळच्या अलिबाग मधला….
याआधी जो पंढरपूर वारीचा मी उल्लेख केला तेही असेच भव्यदिव्य म्हणजे सतत
दोन दिवस स्वतःच्या संगतीने स्वतःच्या जबाबदारीवर तावडे आणि कंपू अतिशय
वृद्ध पुरुष आणि महिलांनाही पंढरपूरच्या वारीला घेऊन जायचे आणि त्यांच्या संगतीत
राहून वारीतही सामील व्हायचे त्यामुळे वृद्धांना पोटचा पोरगा काळजी घेतोय, ते असे
बोलून दाखवायचे, काय सांगू तुम्हाला तावडेंना साक्षात देवदूत मानून अनेक वृद्ध
त्यांचे जेव्हा पाय पकडायला यायचे, ते दृश्य बघणार्यांच्या डोळ्यात त्याक्षणी आनंदाश्रू
तरळायचे. मुंबई अध्यक्ष म्हणून आमदार आशिष शेलार यांनी अख्खी मुंबई दणाणून
सोडली आहे किंवा भाजप सत्तेत येण्यापूर्वी उभे राज्य दणाणून सोडले ते याआधीच्या
तरुण उत्साही प्रदेशाध्यक्षांनी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण हेच विनोद
तावडे मुंबई अध्यक्ष असतांना त्यांनी जो विक्रम केला होता त्याकडे कानाडोळा करणे
भाजपाला परवडणारे नाही, याच तावडे यांनी मुंबई महापालिकेत भाजपचे सर्वाधिक
नगरसेवक निवडून आणण्याचा त्यांच्या पक्षात विक्रम केला होता, मुंबई महापालिका
निवडणूक तोंडावर आहे, भाजप आणि शेलारांनी निवडणुकीचे संयोजन आणि नियोजन
विनोद तावडे यांच्याकडे सोपवल्यास पुन्हा एकदा पूर्वीसारखी काँग्रेस फोडून आणि सेनेला
संगतीने घेऊन तावडे पुढला महापौर भाजपचा बसवून मोकळे होतील…
केवळ अकरावीत असल्यापासून म्हणजे वयाच्या जेमतेम 16-17 व्या वर्षांपासून
विनोदजी भाजपाप्रणित विद्यार्थी संघटनेत काम करणारे, आणि टोपी न बदलणारे, अन्याय
झाला तरी केवळ भाजपमय झालेले नेते. मित्रहो, तुम्हाला, फार कमी मंडळींना हे माहित
असावे कि संघटनेत काम कसे करावे किंवा विद्यार्थी संघटना कशी बांधावी हे नेमके
समजावून सांगण्यासाठी आणि दिल्लीतील विद्यार्थी संघटना मजबूत करण्यासाठी
1989-90 दरम्यान तावडे यांना भाजप नेत्यांनी मुद्दाम दिल्लीत मुक्कामाला ठेवून घेतले
होते, आजही त्यांचा त्यादरम्यान तयार झालेला फॅन क्लब त्यांचे आदराने नाव घेतो,
तावडे यांनी तेथेही दाखवलेली कामांची चुणूक, त्या सर्वांना तावडेंनी सतत आठवण होते.
मला वाटते संघटन कौशल्य, पक्ष बांधणी, कार्यकर्ते जोडण्याची किमया, पक्ष वाढीचे
नेमके ज्ञान, सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा स्वभाव, त्यातून तावडे यांनी आपल्यातल्या
कणखर नेतृत्वाचा उपयोग स्वतःसाठी करवून घेतला, त्यांनी आवश्यकता नसतांनाही
म्हणजे विधान परिषदेवर चिकटून राहणे सहज शक्य असतांनाही त्यांनी फडणवीस,
आशिष शेलार किंवा आमदार अतुल भातखळकर इत्यादी बोटावर मोजता येतील अशा
तरुण नेत्यांसारखी रिस्क घेतली आणि थेट विधानसभा लढवून त्यांनी आमदारकी
जिंकली, कौतुक करावे तेवढे कमी, हे सारे विधान सभेत थेट पोहोचले….