तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या भावाविषयी म्हणजे त्यांच्या काका विषयी नेमके काय भरवता त्यावर काका पुतण्यांचे, पुतणे वयाने सज्ञान मोठे झाल्यानंतर, पुतणे वयात आल्यानंतर नेमके नाते ठरते, अनेकदा काय होते आपण मुलांना नातेवाईकांविषयी नको नको ते विनाकारण सांगतो, त्यांचे कान भरतो पण मुले मोठी झाल्यानंतर त्यांना नेमके कळते, मायबाप वाईट कि नातेवाईक करंटे…
मी हे कधीही केले नाही तुम्हीही ते करू नका म्हणजे आपल्या सख्ख्या नातेवाईंविषयी पोटच्या मुलांना कधीही वाईट किंवा जाणून बुजून भलते सलते सांगू नका, केवळ नातेवाईकांना तोडण्याच्या उद्देशाने मुलांना नको ते सांगत सुटलात, भविष्यात हे असे कान भरणे उपयोगी ठरत नाही, मुले तुमच्याच तोंडात शेण भरून मोकळे होतात. तुमच्या मुलांना अनुभवातून नेमके कळायला हवे कोणता नातेवाईक कसा आहे ते….
अनेक आया मुलांना त्यांच्या बापाविषयी भलते सलते बसता उठता नको नको ते सांगत असतात, त्यातून शून्य परिणाम साधल्या जातो जर बाप खरोखरी वाईट चालीरितींचा नसेल तर आणि मुले मोठी झाल्यावर बापा विषयी वाईट सांगणाऱ्या आईचीच नफरत करायला लागतात. जसे लिखाण म्हणजे केवळ स्टेनोग्राफी नव्हे तसे नाते म्हणजे उठसुठ जबरदस्तीने विविध गोऱ्यागोमट्या मुलींसंगे फोटो काढून तो फेसबुकवर टाकणे नव्हे. थोडेसे विषयांतर करतो, अमुक एखाद्या मित्राशी वाईटपणा आला किंवा थोडेफार वित्तुष्ट आले किंवा अमुक एखाद्याचे विचार आपल्याला विसंगत वाटले, मनाला पटले नाहीत कि आपण त्याला अनफ्रेंड करतो, थोडक्यात अमुक एखादे वर्षानुवर्षे जपलेले नाते आपण क्षणात तोडून मोकळे होतो, असे होता कामा नये, गैरसमज चर्चेतून अगदी सहज दूर होऊन पुन्हा पूर्वीचे नाते निर्माण होऊ शकते, मी माझ्या आयुष्यात कधीही समोरचा लहान असो कि मोठा, आपणहून बोलणे बंद केले नाही, उलट प्रसंगी लहान होऊन, खोटा अभिमान बाजूला ठेवून स्वतः अबोला धरणाऱ्या व्यक्तीशी नातेवाईकांशी पुन्हा पूर्वीचे
संबंध जुळविण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या मोठ्या बहिणीशी एकदा कुठल्याशा क्षुल्लक कारणावरून माझे संबंध बिघडले आणि आमचा अबोला झाला, चूक माझी अधिक होती पण बहिणीचे मन मोठे, ती एकदा आपणहून माझ्याशी बोलली आन तुटलेले नाते पुन्हा जुळले, इतके कि आता आम्ही सारी बहीण भावंडे तिच्याकडे केवळ आमची आई म्हणून बघतो…
या राज्यातले राजकारणातले काका पुतणे आणि त्यांची भांडणे, असा या लेखाचा विषय आहे. राजकारणात असलेले काका पुतणे भांडले आणि दोघांचेही राजकीय फायदे झाले असे कधी घडले नाही, भांडणातून फायदा झाला असे कधी घडत नाही, केवळ होते ते आयुष्याचे अतोनात नुकसान….परवा पुसदच्या नाईक घराण्यात काका पुतणे म्हणे वेगळे झाले आणि पुतण्या निलय नाईक राष्ट्रवादीतून कोलांटी उडी घेत भाजपमध्ये सामील झाला. कधी कधी आम्ही पत्रकार देखील नको त्या व्यक्तींना विनाकारण मोठे करतो, महत्व देतो अशी माझी खात्री आहे. राजकारणात संपलेल्या निलय नाईक यांना मीडिया आणि भाजपने विनाकारण का मोठे केले, हसू येणारे कोडे मला पडले. केवळ निलयविषयी असूया आहे म्हणून मी त्याला ‘ राजकारणातून संपलेला नेता ‘ म्हटले
आहे असे अजिबात नाही, मी आणि निलय गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत पण नेमके सत्य लिहिण्याचा माझा स्वभाव, म्हणून आहे ती वस्तुस्थिती येथे सांगितली, सांगणार आहे. आणि तसेही निलय आणि त्यांचे काका मनोहर नाईक कधीच एकत्र नव्हते, त्यांच्यात कायम राजकीय वित्तुष्ट होते. निलय यांचे दिवंगत वडील मधुकर, सुधाकर आणि मनोहर असे तिघे सख्खे भाऊ, त्यांचे काका होते वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे जनक आणि या राज्याचे सतत 11 वर्षे मुख्यमंत्रीपद उपभोगले महनीय काँग्रेस नेते. जोपर्यंत सुधाकरराव नाईक हयात होते, निलयचे मनोहर आणि सुधाकर या दोन्ही काकांशी जवळीक होती, संबंध बरे होते पण हे संबंध फार काळ टिकणार नाहीत, माझ्यासारखे जे नाईक घराण्याला जवळून बघत होते, त्यांच्या ते तेव्हाच लक्षात आले होते, संबंध बिघडवून निलय यास राजकारणात नक्की मोठे होता आले असते पण सामान्यांना घेऊन चालण्याचा निलय यांचा स्वभाव नाही आणि मनोहर नाईक म्हणजे खिशे उपडे करेपर्यंत लोकांना कायम मदत करीत आलेले जनमान्य आणि यवतमाळ पुसद परिसरातले अगदी सर्वांचे अतिशय लाडके लोकप्रिय नेते, हे दोघे काका पुतणे असूनही टोकाचा स्वभाव असणारे नेते. तसेही निलय हे स्वयंघोषित नेते आणि मनोहर नाईक ह्यांना लोकांनी सन्मान देऊन त्यांना नेतृत्व बहाल केले, त्यामुळे निलय यांना पक्षात घेऊन भाजपा नेत्यांनी मोठी बाजी मारली असे अजिबात नाही याउलट भाजपा नेत्यांचा हा अतिशय अपरिपकव निर्णय, असेच या प्रसंगाचे केवळ वर्णन करता येईल आणि ज्याने निलय यांना भाजप मध्ये आणले तो एक मूर्ख म्हणावा, असे म्हटल्यास त्यात वावगे ठरू नये….
क्रमश: