आत्ता आत्ता पर्यंत या देशात अगदी कायम सारे जोक्स चुटके विनोद सरदारजींच्याच नावाने खपविल्या जायचे. जी सरदार जमात अत्यंत पराक्रमी आहे, उत्तम व्यवसायिक आहे, जगभरातल्या कोणत्याही देशात पसरलेली असून तेथेही श्रीमंत व्यवसायिक म्हणून नोन आहे, जे सरदार अतिशय चांगल्या पद्धतीने जगभरात आणि पंजाबमध्ये अतिशय आधुनिक उत्तम शेती करून आसपासचा परिसर सुजलाम सुफलाम करून सोडतात, ज्यांचे अन्नदान त्यांच्या आसपास असणाऱ्यांना तृप्त करून सोडते, सारे चुटके जोक्स मात्र त्यांच्या नावाने सांगितल्या जायचे, त्यातून जणू हेच प्रतीत व्हायचे कि सरदारांना कवडीची अक्कल नसते जे वास्तव नसायचे. कायम आपल्यावर वाट्टेल ते चुटके सांगून मोठ्या प्रमाणावर आपली इमेज विनाकारण मालिन केल्या जाते बघून त्यांच्यातले कोणीतरी न्यायालयात गेले आणि कायद्याने बंदी आणल्या गेली कि सरदार जमातीवर आधारित चुटकुले सांगितल्या गेले तर तो प्रकार गुन्हा ठरेल. सरदारांचा विषय अशाप्रकारे संपत नाही तोच, अलिकडल्या काही वर्षात विशेषतः व्हाट्सअप किंवा फेसबुक प्रकार फोफावल्यानंतर जो तो मराठी माणूस
उठतो आणि पुण्यातल्या प्रामुख्याने तेथल्या ब्राम्हणांवर विविध चुटके जोक्स सांगून टाकून मोकळा होतो. वास्तविक पुण्यातला प्रत्येक घरातला प्रत्येक सदस्य अतिशय वेगळा, जो जग गाजवून मोकळा होतो पण पुणेकर म्हणजे विचित्र आणि विक्षिप्त असा समज करवून दिल्या जातो आणि जो उठतो तो त्यांची कधी कधी अतिशय खालच्या पातळीवरून थट्टा करून मोकळा होतो, वास्तविक पुणेकर आणि पुणेकर ब्राम्हण त्यांच्या क्षेत्रात बुद्धिमान आणि कमालीचे यशस्वी पण त्यांच्यावर टाकण्यात येणारे चुटके त्यांच्या हे हृदयाला भोक पडणारे असतात. महत्वाचे म्हणजे ज्या नेत्याने वास्तवात शून्यातून वैष्णव निर्माण केले त्या नेत्याची थट्टा विविध चारोळ्या टाकून केल्या जाते त्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची खिल्ली उडविण्यात येते…
या राज्यात गोखले असोत कि फुटाणे कितीतरी चारोळ्या करणारे सुप्रसिद्ध कवी आहेत किंवा होऊन गेलेत पण अलिकडल्या काही वर्षात त्या सर्वांची नांवे इतिहासजमा झाली आणि नाव झाले प्रसिद्धीला आणल्या गेले ते केवळ आणि केवळ रामदास आठवले यांना. वास्तविक आठवले यांचे स्थान अख्ख्या जगातील हिंदुस्थानी बौद्ध समाजात फार वरचे आहे, प्रथम क्रमांकावर आहे किंबहुना त्यांच्या स्वरूपात बौद्ध बांधव साक्षात बाबासाहेब बघतात, असे असतांना उठसुठ किंवा जो तो उठतो तो आठवले यांच्या नावाने चारोळ्या टाकून त्यांना थोडक्यात बावळटठरवून मोकळा होतो, हे असे का घडते त्यावर दस्तुरखुद्द आठवले यांनी देखील आत्मचिंतन करायला हवे आणि अमुक एका समाजाच्या आदर्श पुरुषावर बौद्ध नसलेल्या मंडळींनी वाट्टेल ते केवळ थट्टा म्हणून खपविणे, कितपत योग्य आहे, त्यावर देखील विचार व्हायला हवा, उद्या तुमच्या बापाची अशी कोणी उठसुठ थट्टा केली तर मला माहित आहे, थट्टा करणार्याचा तुम्ही गळा दाबून मोकळे व्हाल, मग रामदास आठवले दरवेळी टार्गेट का, त्यावर या समाजाने आणि आठवले यांनाही चिंतन नक्कीच करायला हवे, महत्वाचे म्हणजे दिवंगत बाबासाहेब भोसले जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून तर अगदी आत्त्ता आत्ता पर्यंत म्हणजे त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांच्यावर असेच विविध असंख्य जोक्स सांगून हा मुख्यमंत्री म्हणजे इंदिरा गांधी यांनी लादलेला जोकर असे त्यांच्या पक्षात आणि विरोधकांत त्यांना हिणविल्या जायचे, त्यामुळेच भोसले यांची राजकीय सत्तेतली कारकीर्द अल्पजीवी ठरली. उद्या आठवले यांचाही भोसले होऊ शकतो, ते व्हायला नको….
वर जे मुद्दे यासाठी घेतले कि अलीकडे ज्याक्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली, त्या क्षणापासून अतिशय असुरी आनंदातून जो तो उठतो आणि फक्त आणि फक्त शरद पवारांची थट्टा किंवा टिंगल टवाळी करून मोकळा होतो, असुरी आनंदातून जे जोक्स किंवा जी खिल्ली उडविल्या गेली ती केवळ शरद पवार यांची, वास्तविक अलिकडल्या काळात म्हणजे १९७५ नंतर या राज्यात कितीतरी नेते किंवा मंत्री वाममार्गाने पैसे मिळवून श्रीमंत झाले पण ज्याचे त्याचे टार्गेट केवळ शरद पवार हेच का, त्यावर इतर कोणीही विचारमंथन करण्याची गरज नाही, विचारमंथन करायचेच असेल तर ते शरद पवार यांनी आणि त्यांच्या कंपूने करायला हवे, पवार यांचे हे आजवरचे सर्वात मोठे अपयश आहे कि जोतो उठतो आणि असुरी आनंद झाल्यागत शरद पवारांवर चुटके टाकून म्हणजे जोक सांगून किंवा कार्टून टाकून मोकळा होतो, मला वाटते त्यात शरद पवार हे केवळ एक प्रतीक आहेत, लोकांना वाटते कि पवार आणि कंपू मोदी यांच्या भूमिकेमुळे, निर्णयामुळे मस्तपैकी रस्त्यावर आले आहेत, आणि हा मेसेज जो पसरलाय तेच पवारांचे फार मोठे अपयश आहे, त्यांनी वर जाण्याआधी जर हा लागलेला डाग पुसून टाकला तर आम्हा पवारांच्या चाहत्यांना मनापासून मनस्वी आनंद होईल. आणि पवारांना काहीही अशक्य नाही फक्त त्यांनी त्यांच्या बगलबच्चाना बोलावून सांगायला हवे, सत्ता मिळो अथवा न मिळो पण पैसे खाऊ नका, स्वतःचा तटकरे किंवा अजितदादा करवून घेऊ नका…
पत्रकारितेतून मला मिळालेले यश बघून माझ्या सहकारी मित्रांनी हेच पसरविले होते कि मी पित्तपत्रकारिता करून पैसे मिळतोय पण शपथेवर सांगतो, मी अशी पत्रकारिता कधीही केली नाही कि तुझे अमुक लफडे माझ्याकडे आले आहे, छापायचे नसेल तर पैसे दे, म्हणून मी या क्षेत्रात तग धरून उभा आहे आणि या अशा संशयातून अनेकांनी माझ्याकडे सुरुवातीला बघितले पण ते सारे जेव्हा माझ्या जवळून सान्निध्यात आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले, माझी पत्रकारिता ती तशी नाही, मी बिनधास्त लढतो मग दुखावल्या गेलेले वाट्टेल ते पसरवून मोकळे होतात, बदनामीची चिंता न करता माणसाने लढायचे असते, ढोंग केले कि माणसाचा निखिल वागळे होतो….