युतीची झाली माती : पत्रकार हेमंत जोशी
सुरुवात त्यांनी केली म्हणजे भाजपा हा मित्र पक्ष असूनही त्यांच्यावर चिखलफेक करण्याचे मोठे काम सुरुवातीला संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लेखणीतून सामना दैनिकाने केले. प्रभावी नेते आणि चांगले मित्र जर विशेषतः उद्धव तसेच रश्मी आणि आदित्य ठाकरे यांच्या सभोवताली टिकले, वाढले, तर उद्धव यांचा राजकीय फायदा पण आपले तर राजकीय आणि आर्थिक नुकसान हमखास होईल कि, केवळ या भावनेतून मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत या दोघांनीही एकत्र येऊन मोठे कडबोळे उद्धव आणि त्यांच्या कुटुंबाभोवती उभे केले, मग सुरुवात झाली मातोश्री वरच्या राजकारणातल्या वजाबाकीची. नारायण राणेंपासून स्वयंभू आणि चौकडीचे न ऐकणारी सारी मंडळी एकतर बाहेर पडली किंवा त्यांचे मातोश्रीवर असलेले महत्व, अस्तित्व संपवण्यात आले. उद्धव यांच्याविरुद्ध तुरुंगाची भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरली म्हणून उद्धव यांनी आता मनापासून ठरविले आहे यापुढे युती नको, सत्तेत भाजपबरोबर जाणे, राहणे नको. पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत ते बोलले म्हणून युती नको, उद्धव यांनी ठरविले पण अमित शाह असोत कि थेट नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाचे इतर मान्यवर, इतिहासाची पाने जर उद्धव यांनी पडताळून बघितली तर त्यांच्या ते सहज लक्षात येईल कि त्यांनी, त्यांच्या संजय राऊत यांच्यासारख्या संधीसाधू नेत्यांनी किंवा सामनाया मुखपत्रातून दरदिवशी केबढया मोठ्या प्रमाणावर गरळ ओकण्यात आलेली आहे, हेच दिसेल कि एखादा अतिरेकी जसा बेछूट आणि बेधुंद गोळीबार करून माणसे ठार मारतो, मी भाजपाचा अजिबात कार्यकर्ता नाही, माझा कुठलाही पक्ष नाही पण तरीही सांगतो, भाजपा नेत्यांचे हृदय त्या प्रखर आणि जहाल एखाद्या अतिरेक्यासारखे शब्दातून जणू चराचरा कापण्याचे काम शिवसेनेकडून झाले, बेधुंद आरोप करण्यात आले, आजही ते सतत सुरु आहे. तरीही युती न तोडण्याची भूमिका भाजपाची आहे, होती. उद्धव यांना नेमके काय सांगायचे किंवा म्हणायचे आहे कि आम्ही वाट्टेल ते आणि भाजपाने ऐन निवडणूक प्रचारातही गांडू भूमिका घेऊन प्रचारात उतरायचे, मला वाटते जो तो हेच म्हणेल,
येथे भाजपाचे काहीही चुकलेले नाही. महत्वाचे म्हणजे उद्धव यांच्याकडून हे सारे यासाठीच वदवून घेतल्या जाते कि नार्वेकर राऊत देसाई बांदेकर इत्यादी मिलिंद आणि कंपूचे तेवढे महत्व मातोश्री वर टिकून राहावे….
कोणीही वागण्यातून अतिरेक करू नये, आयुष्यात अतिरेकी किंवा माझ्यासारखा मीच अशी भूमिका घेणारे फारतर काही काळ आभाळाला हात टेकवू शकतात पण त्यांच्या आयुष्यातला हा यशस्वी काळ फार काळ टिकून राहूच शकत नाही. अलीकडे जो तो विचारतो, निखिल वागळे गेलेत कुठे, मला माहित आहे ते गेलेत कुठे, ते कुठेही गेले नाहीत मात्र त्यांच्या सततच्या आक्रस्ताळ्या स्वभावातून लोकांनीच त्यांना घरी बसवले. निखिल वागळे यांचा फार जुना इतिहास येथे या क्षणी मी उगाळत बसत नाही पण आयबीएन लोकमत वाहिनी हि निखिल वागळे यांच्यामुळे मोठी झाली, जगभरातल्या मराठींमध्ये पोहोचली आणि आयबीएन लोकमत वाहिनी मुळेच निखिल वागळे हेदेखील जगभरातल्या मराठी दर्शकांमध्ये पोहोचले, थोडक्यात ते दोघेही एक्मेकांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले मात्र दोघांचीही अवस्था बैलगाडीखालून चालणाऱ्या कुत्र्यासारखी झाली, वागळे यांना वाटत होते कि वाहिनी माझ्यामुळे मोठी आणि वाहिनीला वाटत होते वागळे आमच्यामुळे मोठे. थोडक्यात दोघांनाही यश पचविता आले नाही, दोघेही एकमेकांपासून दूर झाले आणि त्यांचा ग्राफ पुढल्या काही महिन्यातच अतिशय झपाट्याने खाली आला. महेश म्हात्रे यास निखिल यांचे स्थान घेता मिळविता आले नाही, वाहिनीवर ज्या पद्धतीने बोलावे लागते, प्रभाव पडावा लागतो, अनेक वर्षे उलटल्यानंतरही महेश म्हात्रे ती किमया साधू शकले नाही, हे अंतर जणू सत्येन कपू आणि अमिताभ बच्चन यापद्धतीने म्हात्रे आणि वागळे बाबतीत आयबीएन लोकमत वाहिनीवर घडले. म्हात्रे यांनी मेहनत घेतली, घेताहेत पण पत्रकारितेचा तो प्रभावी आक्रमक पिंड त्यांच्या अडखळत बोलण्यातून वाट्याला न आल्याने पूर्वीची ती लज्जत आता या वाहिनीवर उरलेली नाही किंबहुना यशाचा ग्राफ खाली आला, म्हात्रे यांनी वाईट वाटून घेऊ नये पण मनात आले ते नेमके सत्य याठिकाणी मी सांगून मोकळा झालो….
निखिल वागळे आयबीएन लोकमत मधून बाहेर पडल्यानंतर किंवा त्यांना तेथून बाहेर काढल्यानंतर त्यांनी त्यांच्या जुन्या सहकार्याला म्हणजे युवराज मोहिते नामक प्रोफेशनल पत्रकाराला हाताशी घेऊन ज्यांना मीडिया हाताशी धरून पैसे मिळविण्याचे साधन वाढवायचे होते अशा काही धूर्त व्यवसायिकांना हाताशी धरून विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे आपली तत्व बासनात गुंडाळून वाहिनीची जुळवाजुळव केली आणि महाराष्ट्र वन या मराठीतून बातम्या देणाऱ्या वाहिनीला जन्म दिला. पुढे ज्या मोहिते यांनी वागळे यांची सावलीसारखी साथ दिली त्याच मोहिते यांना अपमानित करून म्हणजे कपिल पाटील पद्धतीने मोहिते यांना वागळेंनी दूर केले, तिकडे व्यापारी वृत्तीचे मालक विरुद्ध निखिल वागळे हे वाट्टेल ते दरदिवशी बरळत सुटणारे या वाहिनीतले प्रमुख पात्र, दोघात जोरात संघर्ष सुरु झाला, नेमके तेच घडले, भूमिकेचा भंपक मुखवटा वागळे यांना भोवला आणि वन फाईन मॉर्निंग, वागळे यांना त्या वाहिनीतून काढण्यात आले. येथे वागळे हा मुद्दा यासाठी घेतला कि मातोश्रीवर नार्वेकर राऊत कॅम्पच्या वागण्याचा डावपेचांचा जो अतिरेक झाला तो संपविण्यासाठी जसे कंसाला संपविण्यासाठी कृष्णावतार जन्माला आला, येथे मी त्या व्यक्तीला साक्षात कृष्ण म्हणणार नाही पण तो आला आणि त्याने आपले स्थान चिकाटीने निर्माण केले, मातोश्रीवर अड्डा जमवून पिंगा घालणाऱ्या कंपूबिरूद्ध त्याने पुरून उरण्याचे जणू मनातून ठरविले आणि तो यशस्वी ठरला, वस्तुस्थितीला धरून नेमके सत्य उद्धव आणि कुटुंबाला स्पष्ट शब्दात सांगायचे त्याने ठरविले आणि तो भराभर यशस्वी ठरला.
होय! मी हे सारे त्या हर्षल प्रधान यांच्याविषयी नेमके येथे सांगतोय, पुढे आणखी विस्ताराने त्यावर लिहितोय. निखिल वागळे गेले काही
महिने अज्ञातवासात होते म्हणायला हरकत नाही, अलिकडल्या काही दिवसात आता ते पुन्हा चुटपुट भूमिकेतून दिसायला लागले आहे, बघूया त्यांचा पुन्हा अमिताभ होतो कि आलोक नाथ म्हणून ते निवृत्ती घेतात, सारे काही त्यांच्या स्वभावावर यापुढे अवलंबून असेल, मुखवटा आणि चेहरा वेगळा असला कि जे वागळे यांचे झाले तेच उद्या शिवसेना आणि मातोश्रीचे राजकीय नुकसान करणाऱ्यांचे होईल, काळ बदलत असतो….