कॉफी शॉप्स : पत्रकार हेमंत जोशी
पत्रकारिता आणि कॉफी ह्या दोन गोष्टी माझ्या जीवनाच्या अविभाज्य अंग आहेत असे अलीकडे मला वाटायला लागले आहे, अमुक एखाद्याने सांगितले कि चल, तुझी दीपक पदुकोनशी भेट घालवून देतो, कदाचित मी जाण्याचे टाळेल पण दीपिकाच्या घरी उत्तम कॉफी प्यायला मिळते, मला सांगितले तर माझे लग्न जरी असले तरी ते बाजूला ठेवून मी दीपिकाच्या घराकडे झपाझप पावले टाकायला सुरुवात करेल. याचा अर्थ मी दिवसभर फक्त कॉफी ढोसतो असे नाही, दिवसातून केवळ एकदा तीही स्ट्रॉंग आणि अतिशय गरम कपचिनो कॉफी घेतो. माझ्या घरी किंवा नरिमन पॉईंटच्या ऑफिस मध्ये जे येतात त्यांना ठाऊक आहे या दोन्ही ठिकाणी जगातली उत्तमोत्तम कॉफी हमखास प्यायला मिळते…
सौंदर्य प्रसाधन विक्रीतले एक जगप्रसिद्ध नाव म्हणजे रेखा चौधरी, अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या त्या भगिनी आहेत आणि रेखा माझी अतिशय चांगली मैत्रीण जणू माझ्या कुटुंबातली एक सदस्य आहे. नरिमन पॉईंट ऑफिसच्या ओपनिंगला रेखा आणि तिचे ऍमस्टरडॅम मधले एक भागीदार जे. सी कपूर आले होते. येतांना मोठ्या मनाच्या कपूर यांनी माझ्यासाठी चक्क ऍमस्टरडॅमवरून अतिशय महागडे असे कॉफी मशीन आणले, मला गिफ्ट केले, या मशीन मधून वेगवेगळ्या टेस्ट च्या कॉफी बाहेर पडतात, कॉफी लव्हर्स खुश होतात, थँक्स मिस्टर जेसी आणि स्टायलिश लेडी रेखा….
मुंबईत चांगले कॉफी शॉप्स कोणते, असे अनेक मला सतत कायम विचारतात. म्हणून येथे नेमके सांगतो. मुंबईत दर्जेदार कॉफी प्रकार मिळण्याचे उत्तम शॉप्स म्हणजे नरिमन पॉईंट मधले पंचतारांकित ओबेरॉय हॉटेल, नॉट ट्रायडंट आणि विविध मोक्याच्या ठिकाणी असलेला ऑस्ट्रेलियन ब्रँड, कॉफी बाय डी बेला, त्याशिवाय उद्योजक जयंत म्हैसकर यांच्या मालकीचे अरोमाज आणि कॉफी बीन्स अँड टी लीफ असे अगदी बोटावर मोजण्याएवढे दर्जेदार कॉफी मिळण्याची ठिकाणं मुंबईत आहेत, कॉफी घेतल्यानंतर जर तुम्हाला पित्ताचा त्रास सुरु होत असेल तर असे कॉफी शॉप्स शरीराला घातक आहेत, असे मी ठामपणे सांगू शकतो….
कोणत्याही कॉफी शॉप्सचा दर्जा तेथे वापरल्या जाणाऱ्या बीन्स, कॉफी तयार करण्याचे मशीन, दुधाचा दर्जा आणि कॉफी करणारा बरिस्ता यावर सारे ठरत असते. मुंबईत अनेक कॉफी शॉप्स आहेत पण बहुतेक ठिकाणी अगदी जागतिक दर्जा प्राप्त झालेल्या कॉफी शॉप्स मध्ये देखील अति प्रॉफिटच्या मागे लागल्याने हि मंडळी स्वस्तमिळणारे भारतीय कॉफी बीन्स उपयोगात आणतात आणि नाव मोठे लक्षण खोटे, असे ते त्या ठिकाणी घडते. विशेषतः पाश्चिमात्य आणि आफ्रिकन देशात तयार होणाऱ्या बीन्स आणि भारतीय बीन्स यामध्ये जर मला कोणी फरक काय आहे विचारले तर एका शब्दात सांगता येईल कि गावठी आंबा आणि देवगड-रत्नागिरीचा आंबा यात जो फरक असतो तो हुबेहूब प्रकार कॉफी बीन्सच्या बाबतीतही….
आम्ही मुंबई पुण्यातले अगदी अलिकडल्या दहा वर्षात कॉफी शॉप्स मध्ये जाऊन बसायला लागलेलो आहोत त्यामुळे नेमकी चांगली कॉफी कोणती, आमच्या ते सहज लक्षात येत नाही, जे जगभर प्रवास करतात त्यांना तो नेमका फरक कळतो पण असे फार थोडे आहेत त्यामुळे ग्राहकांना च्यू बनविण्याचा प्रकार आपल्याकडल्या कॉफी शॉप्स मध्ये मोठ्या प्रमाणावर कायम घडतो. कॉफी शॉप्स मध्ये ज्या बीन्स वापरल्या जातात त्यातल्या भारतीय बीन्स फारतर २००-२५० रुपये किलोने उपलब्ध असतात आणि ज्या दर्जेदार बीन्स आयात कराव्या लागतात त्या बीन्स साधारणतः १२०० रुपये किलोने त्यांना पडतात म्हणून बहुतेक कॉफी शॉप्स मधून हेराफेरी केल्या जाते, जे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक ठरते. बहुतेक कॉफी शॉप्स अव्वाच्या सव्वा पैसे आकारूनही जेव्हा दर्जाहीन कॉफीज ग्राहकांना उपलब्ध करून देतात, मनाला अशावेळी हेच वाटते, आम्ही कधीतरी सुधारणार आहोत किंवा नाही….?
अव्वाच्या सव्वा पैसे तर तुम्ही घेत आहातच, किमान दर्जेदार माल तर ग्राहकांना उपलब्ध करून द्या, दुर्दैवाने ते घडत नाही, मी या ठिकाणी नाव सांगत नाही पण एका अतिशय बड्या भारतीय उद्योजकाने येथे भारतात एक जगप्रसिद्ध कॉफी ब्रँड आणून, मुंबई किंवा महानगरातल्या नाक्या नाक्यावर ते शॉप्स उघडलेले आहेत पण त्या शॉप्स मध्ये ओरिजिनल बीन्स न वापरता त्या उद्योजकाच्या फार्म्स मध्ये उगवण्यात येणारे स्वस्तातले बीन्स जेव्हा हमखास वापरल्या जातात, तळपायाची आग मस्तकात पोहोचते त्याचवेळी ओबेरॉय किंवा कॉफी बाय डी बेला सारख्या गिन्याचुन्या शॉप्स मधून ओरिजिनल स्टफ उपलब्ध असतो, अशा ठिकाणी कॉफी घेण्याचा आनंद वेगळाच असतो. अर्थात ओबेरॉय मध्ये कॉफी घेणे नक्कीच फक्त आणि फक्त श्रीमंत माणसाचे काम असल्याने, तुम्ही आम्ही केवळ ऐकण्याचे काम करावे….