थापाड्यांचे संमेलन : पत्रकार हेमंत जोशी
शोले चित्रपटात अमिताभ आणि धर्मेंद्र जेलर आसरानीला उल्लू बनविण्यासाठी मुद्दाम खबऱ्या केश्तो मुखर्जीच्या बाजूला उभे राहून काहीबाही एकमेकांच्या कानात पण केश्तोला ऐकू जाईल असे बोलतात, नेमके तेच घडते, केश्तो त्यांचे ऐकलेले बोलणे जसेच्या तसे आसरानीला जाऊन सांगतो आणि धमाल उडते. येथे माझ्यासमोर ३ एप्रिलचा लोकमत पडलाय, त्यातली एक बातमी वाचून लोकमत आणि अलीकडली अशी अनेक वृत्तपत्रे आणि त्यात छापून येणाऱ्या सततच्या बातम्या यांचा ताळमेळ त्या केश्तोशी जुळवून मोकळा झालो. अलीकडले अनेक वार्ताहर शोले मधल्या केश्तो मुखर्जीचे नेमके वंशज आहेत अशी माझी खात्री होत चाललीआहे. काहीही करून चमचमीत छापून आणायचे आणि स्वतःचे थोबाड फेमस करून सोडायचे या उथळ वृत्तीतून या अशा केश्तो छाप बातम्या लिहिणार्यांचे अलीकडे मोठे पेव फुटले आहे. मला आजही तो किस्सा आठवतो, जेव्हा कुठल्याशा दोघा वार्ताहरांनी वार्तांकन करतांना अगदी ठरवून त्यांच्या मित्राला सांगितले होते कि पुढल्या १-२ दिवसात मृणाल गोरे यांना कर्नाटक राज्याचे राज्यपाल म्हणून नेमणार आहेत. त्या दोघांनी हा किस्सा असा काही एकमेकांना ठासून सांगितला कि त्यांच्या शेजारी केश्तो च्या भूमिकेत वावरणाऱ्या त्यावेळेच्या नवाकाळ दैनिकाच्या वार्ताहराला तो किस्सा खरा वाटला आणि हे वार्ताहर मृणाल गोरे राज्यपाल म्हणून शपथ घेणार अशी बातमी त्यावेळेच्या सर्वाधिक खपाच्या नवाकाळ मध्ये फ्रंट पेजवर छापून मोकळे झाले….
लोकमत मधली, थोडी कळ सोसा, मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी देखील हि अशीच, केश्तो पद्धतीची. वार्ताहर लिहितो, उद्धव ठाकरे यांनी नाराज आमदारांना सबुरीचा सल्ला दिला असून ते लवकरच भाकरी फिरविणार आहेत म्हणजे काही मंत्र्यांना काढून नव्याने काहींना मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून घेणार आहेत अशी हि बातमी. मात्र उद्धव असे नाराज आमदारांना काहीही म्हणाले नाहीत किंवा ते त्यांच्या कोणत्याही मंत्र्यांना घरी पाठवून नव्याने काहींना संधी देणार असल्याची हि बातमी म्हणजे तद्दन अफवा आहे, असे अद्याप मातोश्रीवरून काहीही ठरलेले नाही, उद्धव यांना त्यांच्या जुन्या जाणत्या सेना नेत्यांना मंत्रिपदावरून अजिबात काढायचे नाही, मग ते सुभाष देसाई असोत कि रामदास कदम,
सुमार कामगिरीच्या कोणत्याही मंत्र्याला काढण्याचे उद्धव यांनी अजिबात ठरविल्याचे दूर दूर पर्यंत दिसत नाही….दैनिक लोकमत मधल्या या थापाड्या बातमीच्या भाषेवरून तरी असे दिसते कि हि बातमी रेटून थापा मारणाऱ्या आणि बिनदिक्कत सभयतेच्या गप्पा मारणाऱ्या एखाद्या मी बाई भोळा दिसणाऱ्या त्या वार्ताहराने सोडलेली पुडि आहे, असावी. आणि हि जर बातमी अति महत्वाकांक्षी असलेल्या त्या वार्ताहरानेच नक्की सोडलेली असेल तर त्यामागे भाजपा मधल्या त्यांच्या काही मित्रांचा कावा त्यामागे असावा असे दिसते, असे असावे. शिवसेनेत कायम कसे अस्थिर वातावरणनिर्माण करता येईल त्यावर अलीकडे त्या वार्ताहर मित्रपक्षाचा कटाक्ष असतो, त्याचाच हा भाग, हि सोडलेली पूडी….
नजीकच्या काळात विद्यमान मंत्र्यांना किंवा राज्यमंत्र्यांना हटवून, नव्याने सेनेच्या मंत्र्यांचा विस्तार किंवा फेरबदल करण्याचे अद्याप मातोश्रीवर अजिबात ठरलेले नसून, विविध वाहिन्यांनी आणि लोकमत सारख्या वृत्तपत्रांनी वाचकांच्या मनात गोंधळ आणि शिवसेनेत खळबळ माजविण्याचा दृष्टीने सोडलेली हि पूडी आहे, खमंग अशी थाप आहे. ३ एप्रिल च्या लोकमत दैनिकात छापून आलेली नेमकी बातमी तुम्हाला याच ठिकाणी वाचायला मिळेल….
जणू काही लोकमत मध्ये बातमी छापून लिहून आणणाऱ्या या वार्ताहराचे कानात उद्धव यांनी सांगितले आहे या थाटात ती बातमी लिहिण्यात आलेली आहे म्हणजे ग्रामीण भागातील आमदारांना मंत्री होण्याची संधी मिळेल, हे तो ज्या आत्मविश्वासाने लिहून मोकळा झालाय त्यावरून हेच वाटते कि स्वतः उद्धव यांनी त्याला मनातले जेठरविले आहे, सांगून मोकळे झालेले आहेत. लोकमत सारख्या मोठ्या खपाच्या दैनिकांनी अशा पुड्या सोडणाऱ्या, थापा ठोकणाऱ्या बातम्या सतत छापून उरली सुरली विश्वासहर्ता गमावू नये असे याक्षणी त्यांना मनापासून सांगावेसे वाटते….