महाराष्ट्र नवनिर्माण सेना : पत्रकार हेमंत जोशी
www.vikrantjoshi.com
सभोवताली जमलेल्या खुशमस्कऱ्यांनी तुम्ही डिट्टो बाळासाहेब आहेत, असे वारंवार चढवल्यामुळे राज ठाकरे त्या स्वप्नात दंग होऊन संपले कि आम्ही मराठी त्यांच्यात उद्याचे बाळासाहेब राजमध्ये बघितले आणि ते परीक्षेत न उतरल्यामुळे मराठींच्यामनातून उतरले, हे नेमके आधी समजावून घेणे आवश्यक वाटते. एक लहान मुलगी समुद्रात बुडतेय बघून काठावर लोकांची गर्दी जमली, आणि गर्दीने आपल्यातल्या एका हट्ट्याकट्ट्या तरुणाला शोधून त्याला चढवायला सुरुवात केली, तुम्ही उत्तम पोहणारे दिसता, तुमची शरीरयष्टी एखाद्या पैलवानाला लाजवेल अशी आहे, चेहऱ्यावरून तुम्ही मोठे परोपकारी आहेत असे वाटते, एक ना अनेक वाक्ये कानावर पडत असतांना त्या तरुणाने समुद्रात बुडणाऱ्या मुलीला मोठ्या हिम्मतीने समुद्राबाहेर काढले, लगेच लोकांनी त्याच्यासभोवताली घोळका करून त्याला असंख्य प्रश्नांनी भंडावून सोडले, तुम्ही कोण, तुम्ही कुठले, आधीही तुम्ही हे असे एखाद्याचे प्राण वाचवले आहेत का, तुम्ही नावाजलेले स्विमर आहेत का, असे एक ना अनेक प्रश्न, शेवटी तो तरुण अतिशय वैतागला आणि चिडून जमलेल्या गर्दीला तो म्हणाला, मी तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देतो, पण आधी हे सांगा, मला त्या पाण्यात ढकलले कोणी ? त्याने हा प्रश्न विचारताच, एका क्षणात जमलेली गर्दी पांगली, कारण त्या पैलवानाला पाण्यात ढकलणे एकट्या दुकट्याचे काम नव्हते, प्रत्येकाने गुपचूप गुपचूप जोर लावला होता….
राज ठाकरे यांचे नेमके हे असे त्या पैलवानासारखे झाले, मातोश्रीवरल्या गर्दीतले जे जे उद्धव यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते त्या सर्वांनी राज यांना मातोश्रीबाहेर ढकलत ढकलत आणले, आणि आपणच डिट्टो बाळासाहेब, असा पूर्णतः अपसमज जेव्हा राज यांचा झाला त्यांनी मग बाहेर उंच उडी घेतली पण नेम चुकला,त्यांच्याबरोबर उडी घेणारे त्यांचे बहुतेक सारेच सवंगडी जखमी झाले पण राज तर राजकारणातून आता कायमचे जायबंदी होतील, असे निदान आज तरी चित्र आहे….
आपण त्याला निमित्त झाले असे म्हणणे थोडेसे आगाऊपणाचे ठरेल, पण पोटच्या अतिशय लाडक्या मुलाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे यापुढे किमान काही वर्षे राज सक्रिय राजकारणात भाग घेतील असे वाटत नाही, तुमच्या ते लक्षात आले असेल, कोणी काहीही म्हणो पण हा अतिशय संवेदनशील नेता महापालिकेत मिळालेल्या मोठ्या अपयशाने नव्हे तर अमितच्या नाजूक प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनातून खचलेला आहे आणि यापुढे अमित खणखणीत बरा होईपर्यंत राज पुन्हा एकदा राजकारणातले फिनिक्स होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना भरारी घेईल निदान आजतरी असे कुठलेलंही चित्र स्पष्ट होत नाही. ऑफ द रेकॉर्ड सांगायचे झाल्यास, असाही एक सूर अलीकडे निघू लागलाय कि मनसेचे भाजपा किंवा शिवसेनेमध्ये विलीनीकरण करणे शक्य आहे का, जसे आमच्या लहानपणी रामसे आडनावाचे बंधू बी आणि सी ग्रेड चे हॉरर सिनेमे निर्माण करायचे, आज तेच म्हणजे मनसेचा रामसे झाला आहे, अगदीच बी आणि सी ग्रेडचे आणि तेही संख्यने अतिशय बोटावर मोजण्याएवढे नेते मनसेकडे शिल्लक आहेत, बाळा नांदगावकर यांना ए ग्रेडचा नेता म्हणून त्यांच्याकडे बोट दाखवणे म्हणजे एखाद्या सिनेमात अमिताभऐवजी वैभव मांगले यांची वर्णी लागण्यासारखे किंवा एखाद्या रशियन राजकुमारीने जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या प्रेमात पडण्यासारखे. अविनाश अभ्यंकर, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई इत्यादी राज यांच्यासोबत यारी दोस्ती निभावणाऱ्या दुसऱ्या रांगेतल्या नेत्यांच्या भरवशावर पुन्हा एकदा मनसेला आघाडीवर नेणे शक्य नाही त्यापेक्षा शिवसेना किंवा भाजपा मध्ये मनसेचे विलीनीकरण, हा प्रयोग तसा वाईट नाही पण दोन्हीकडे मनसेला सामावून घेण्याची निदान आजतरी मानसिकता नाही, जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक असल्याने शिवसेनेशी उघड पंगा, भाजपाला शक्य नसल्याने, मनसेतून हा सूर निघाल्यानंतर, भाजपने तात्काळ नकार दिल्याची माझी माहिती आहे आणि मनसैनिक सेनेत घेऊन फायदा होण्या पेक्षा डोकेदुखीच अधिक वाढ याची मोठी शक्यता असल्याने जरी उद्धव यांच्या मनात आजच्या राज विषयी सहानुभूती असली तरी ते मनसेला पोटात घेतील असे निदान आज तरी चित्र नाही आणि तिसरा कोणताही पर्याय मूड गमावून बसलेल्या राज ठाकरे यांच्या डोक्यात असेल असे आज तरी दिसत नाही. तुम्ही आता तुमचे बघा, असे उरलेल्या ज्याला त्याला सांगण्याची नामुष्की मनसे नेत्यावर येऊ नये हे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला वाटते. एखादा दैवी किंवा राजकीय चमत्कार घडला आणि राज यांचा फिनिक्स पक्षी झाला तर एक लक्षात ठेवा , मराठी आजही राज यांच्यात उद्याचा बाळासाहेब बघतात, पण केवळ दिसणे आणि बोलणे यावर कायमस्वरूपी विसंबून राहून उद्याचे बाळासाहेब होणे सहज शक्य नाही हे राज यांनी लक्षात घेऊन पुढे बाळासाहेबांचे सारे गुण जसेच्या तसे आत्मसात केले आणि ते लोकात उतरले तर ते साऱ्यांना मागे सोडून राज्यात नेत्यांमधले नंबर वन ठरणे नक्कीच त्यांना अवघड नाही पण आज हे असे म्हणणे म्हणजे भय्यू महाराजांनी विटाळ गेलेल्या बाईला, पुढल्या वर्षी तुला जुळे होईल सांगण्यासारखे. येथे राज ठाकरे हा विषय संपलेला आहे….
थोडेसे विषयांतर करतो, अचानक मिळालेल्या यशाने आणि नवश्रीमंतीने आज ज्या त्या भ्रष्टाचारी घरातले मानसिक संतुलन बिघडलेले आहे, अति महत्वाकांक्षेपोटी घराघरातील मराठी प्रमुख मनशांती गमावून बसला आहे, नेमके जे घडायला नको होते ते घडले आहे, आपण जे करतो ते पोटच्या मुलांना समजत नाही आणि आपण बाप मंडळी अचानक आलेल्या नवश्रीमंतीतून अक्षरश: पैसे उडवून मजा मारतो पण हे जवळून बघणारे पोटाची मुले पुढे वयात आल्या नंतर आपल्याही पुढे जातात, पेज थ्री होतात, व्यसनी होतात, म्हणून मुलगा कमी शिकला तरी चालेल, मुलगी कमी शिकली तरी चालेल पण ते व्यसनी होऊ नयेत असे तुम्हाला वाटत असेल तुम्हीही आधी विठ्ठलराव गाडगीळ व्हायला हवे म्हणजे पुढली पिढी आपोआप अनंत गाडगीळ म्हणून नाव काढेल. तुमच्या आमच्या घरात राहुल महाजन घडू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आम्ही सारेच देवेंद्र फडणवीस व्हायला हवे, वाईट सवयीपासून चार हात दूर असणे अत्यंत गरजेचे असते. एका शासकीय अधिकाऱ्याचे उध्वस्त झालेले घर, त्यावर पुढल्या भागात वाचा….