महाराजांच्या थापा: पत्रकार हेमंत जोशी
आयुष्याच्या उत्तरार्धात आता राहून राहून वाईट वाटते कि आपण पत्रकार न होता इंदोरातल्या त्या वादग्रस्त भय्यू महाराजांसारखे बुवा व्हायला हवे होते, पैसे लुटता आले असते, भोवताली मस्त मस्त बायका भक्त म्हणून वावरल्या असत्या, केवळ अंधश्रद्धेतून देशातल्या थोरामोठ्यांनी माझी लायकी नसतांनाही पायावर लोटांगण घातले असते, मला देव मानले असते, आयुष्यात पदोपदी विकृत आनंद उपभोगता आला असता. येथे हे यासाठी लिहितोय कि व्हाट्सऍप वर सध्या एक क्लिप जाणूनबुजून भय्यू महाराजांच्या गोटातून फिरविला जातेय ज्यात एक लघु लेख टाकण्यात आलाय कि केवळ भय्यू महाराजांमुळेच कोविंदसाहेब उद्याचे राष्ट्रपती होताहेत, अर्थात माझ्यासारखे जे मोजके भय्यूमहाराज आत बाहेर विचित्र कसे, ओळखून आहेत, त्यांना ते वाचून, त्यांच्या तळपायाची आग आपोआप मस्तकात पोहोचते, किंवा ते वाचून त्यांना हसू येते, त्यांचे मनोरंजन होते, गम्मत वाटते. रागही येतो. विशेष म्हणजे तब्बल दोन चार फोटो त्या क्लिप मध्ये असे टाकण्यात आले आहेत जेथे कोविंदसाहेब भय्यू महाराजांच्या पायावर लोटांगण घालताहेत, ते फोटो भलेही खोटे नाहीत पण भय्यू महाराज अजिबात परमेश्वरी अवतार नाहीत हे ठाऊक नसल्याने कोविंद यांनी त्यांना हे असे देवपण बहाल केले आहेमी केले असावे….
विशेष म्हणजे जेव्हा मी हि क्लिप माझ्या नरिमन पॉईंट कार्यालयात बसून बघत होतो, माझ्यासमोर भेटायला आलेली आणि आता रस्त्यावर आलेली एक विधवा तरुण महिला उद्योजिका बसलेली होती, अश्रुपूर्ण प्रसंग म्हणजे ती मला पुराव्यांसहित हेच सांगायला आलेली होती कि गेल्या दोन चार वर्षात भय्यू महाराजांनी आणि त्यांच्या या राज्यातल्या नामवंत पण अतिशय दोन तीन लबाड भक्तांनी कसे करोडो रुपयांनी लुटले लुबाडले तिचा वेळ वाया घालविला, व्यवसाय वाढणे राहिले दूर, तिचा चांगला चालणारा व्यवसाय देखील तोट्यात आणल्या गेला. ते फोटो बघता बघता आणि तो लेख वाचता वाचता ती डोळ्यात अश्रू आणून मनापासून हेच म्हणाली, माझ्यासारखे बरबाद झालेले असे कितीतरी त्यांना हिम्मत दिल्या गेली तर जाहीर सांगतील, आम्ही कसे लुबाडल्या गेलो आहोत, आत्ता याक्षणी त्या महिलेने भय्यू महाराज विषयी अंगावर थरकाप आणणारे किस्से सांगणे मला शक्य नाही कारण आधी एक त्यासंदर्भात मोहीम राबविणे अत्यावश्यक आहे, सत्य एक दिवस नक्की तुमच्यासमोर आणणार आहे. मात्र भय्यू महाराजांचे श्रेष्ठत्व आणि कोविंद यांच्या हातून नकळत घडलेली ती चूक याविषयी जे काय महाराजांच्या गोटातून पसरविल्या गेले आहे, ते ऑफ द रेकॉर्ड मध्ये वाचायला विसरू नका. प्रत्येक सराईत गुन्हेगाराची गुन्हे करण्याची पद्धत ठरलेली असते त्यावरूनच पोलीस सराईत गुन्हेगाराने जर अमुक एखादा गुन्हा केलेला असेल तर त्याला म्हणजे त्या नेमक्या गुन्हेगाराला पकडून मोकळे होतात जसे तुमची पर्स जर लोकल ट्रेन मधून चोरीला गेलेली असेल आणि तुम्ही जर पोलिसांवर व्यवस्थित दबाव आणण्यात यशस्वी ठरला तर पुढल्या काही क्षणात ती पर्स तुमच्या ताब्यात जशीच्या तशी असते. येथे या ठिकाणी मी भय्यू महाराजांना सराईत गुन्हेगार म्हणणार नाही पण श्रीमंत भक्तांना बेवकूफ बनविण्याची त्यांची पद्धत इतकी हुबेहूब ठरलेली आहे कि जेव्हा केव्हा भय्यू महाराजांच्या सान्निध्यात आलेला एखादा श्रीमंत भक्त मला भेटतो, विशेष म्हणजे हि संख्या आत्ता याक्षणी किमान शंभराच्या वर आहे, त्या भेटलेल्या भक्तांनी माझ्यासमोर बोलायला सुरुवात केली कि त्यांच्या बाबतीत पुढे काय काय घडले आहे, मीच सांगून जेव्हा मोकळा होतो, ते भक्त नेमके हेच म्हणतात, बुवा तर तुम्ही व्हायला हवे होते, केवढे तंतोतंत भय्यू महाराज तुम्हाला ठाऊक आहेत, नक्की काहीतरी दैवी शक्ती तुमच्याकडे आहे, अर्थात असे अजिबात नाही, आम्ही पत्रकार पोलिसांसारखेच हि अशी लफडी शोधून काढतो, गुन्हे करण्याची पद्धत एकदा का आम्हा पत्रकारांच्या लक्षात आली कि आमचे पुढले काम अतिशय सोपे असते. सोपे होते. एवढेच सांगतो, या राज्यातल्या तमाम भक्तांच्या आता हे लक्षात आले आहे, भय्यू महाराज नेमके कसे, त्यांचे अवतार कार्य संपायला आता फार वेळ लागणार नाही…..
कोविंद साहेब माझ्यामुळेच राष्ट्रपती कसे होताहेत हे जे त्यांनी किंवा त्यांच्या गोटातून पसरविल्या गेले आहे, पसरविल्या जाते आहे, हॅमर केल्या जाते आहे, हे सुद्धा एखाद्या सराईत गुन्हेगारासारखे. एक उदाहरण सांगतो, अलीकडे पोलिसांनी त्या टोळक्याला हुसकावून लावले आहे पण पूर्वी व्ही टी स्टेशन समोर असलेल्या नृसिंह लॉजच्या दरवाज्यासमोर एक प्रकारचा हातचलाखीतून डब्बा नावाचा जुगार खेळल्या जायचा. एक माणूस तो जुगार डब्यातून मांडायचा आणि इतर सभोवताली त्याचीच पेरलेली चार पाच माणसे त्यावर पैसे लावायचे, पैसे जिंकताना ते जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करायचे, स्वाभाविकपणे इतरही मग त्यात सामील होऊन पैसे लावायचे आणि बरबाद झालेत कि हिरमुसल्या चेहऱ्याने तेथेवून ते बाहेर पडायचे, थोडक्यात संजय यादव सारखी आपलीच माणसे सभोवताली पेरून महाराजांनी हे जे काय उद्योग सुरु ठेवले आहेत, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण कि भय्यू महाराजांनी किमान यापुढे तरी असले भंपक उद्योग बंद करावेत, फसवणूक झाली कि माणूस पेटून उठतो, रस्त्यावर उतरतो, हे त्यांनी ध्यानात घ्यावे…..
मी बुवा बाबा किंवा संत नाही पण नाणीज चा लबाड नरेंद्र असो कि कि इंदोरातले श्रीमान भय्यू, एक ध्यानात ठेवा, आज तुमचा भलेही वक्त चांगला असेल पण दुसऱ्याच्या धनाचे अत्यंत खुबीने अपहरण करणे किंवा परस्त्री ला लुबाडणे, एखादीला फूस लावून बरबाद करणाऱ्या किंवा सभोवताली जमणाऱ्या मित्रांना भक्तांना सतत फसविणाऱ्या व्यक्तीचा वाईट नाश अटळ असतो, तुम्ही असले धंदे बंद करा, सामान्य भक्तांना असे फसविणे योग्य नाही…