चोरावर मोर : पत्रकार हेमंत जोशी
अलीकडे अचानक शाळेत पाठ केलेल्या अनेक म्हणी आठवल्या, मी नाही त्यातली कडी लावा आतली, लोकांसंगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण, स्वतःचे ठेवावे झाकून दुसऱ्याचे पाहावे वाकून, स्वतःची खरकटी दुसऱ्याची धुवायला निघाला, अशा अनेक म्हणी आठवल्या, निमित्त होते भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचे अलीकडे मूग गिळून बसणं किंवा हाताची घडी आणि तोंडात बोळा, पद्धतीने वागणे त्यांच्या या गुमान बसण्यावर अनेक अतिशय तिखट प्रतिक्रियाही प्रसिद्धी माध्यमातून उमटल्या आहेत, हेच कि भाजपा आणि सेना मंत्र्यांवर जे पुराव्याला धरून आरोप होताहेत, या प्रकारावर सोमय्या एखाद्या जादूगारासारखे कुठे गायब आहेत…
अशावेळी आम्ही जे करतो ते सोमय्या यांनीही करायला हवे किंवा यापूर्वीच करायला हवे होते, माझ्याकडे देखील दरदिवशी भ्रष्टाचाराची, व्यभिचाराची विविध प्रकाराने येऊन पडतात, त्या सर्वांवर लिहिणे शक्य नसते, भ्रष्टाचाराची कीड एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागलेली आहे कि आपल्या भोवताली वावरणारे शेकडा ९०% माणसे हमखास भ्रष्ट लबाड हलकट राज्यबुडवे असतात, त्या साऱ्यांविरुद्ध लेखणी उपसणे शक्य नसते अशावेळी मी एक करतो, ज्यांच्याविरुद्ध गंभीर पुरावे हाती पडतात, त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगतो, अगदी कडक शब्दात सांगतो, असे वागू नका, या पद्धतीच्या चुका टाळा, एक दोन तीन वेळा सांगूनही जर ते तसेच वागत राहिले तर मात्र एकतर मी स्वतः लिहून मोकळा होतो किंवा ज्यांच्या लिहिण्याने समाज ढवळून निघतो किंवा माहितीचा अधिकार वापरणारे जे शिस्तीचे आहेत, तोड्या करणारे नाहीत अशा मित्रांना ते पुरावे देऊन मोकळा होतो. अगदी अलीकडे मी विनोद तावडेंना भेटून सांगितले कि शार्दूल नावाचा एक भामटा पोलिसांच्या संरक्षणात आणि तुमच्या नावाचे व्हिसीटींग कार्ड वापरून, तुमचे, मुख्यमंत्री कार्यालयातील एका बड्या हस्तीचे नाव वापरून लोकांना आर्थिक फसवून मोकळा होतो, आता हे असे मी फारतर आणखी चार दोन वेळा तावडे यांना सांगून मोकळा होईल पण हा शार्दूल किंवा असे शार्दूल जर सतत त्यांच्या नावाने दुकान उघडून बसले असतील तर मन कठोर ठेवून आणि व्यक्तिगत संबंध बाजूला ठेवून पत्रकारितेचा बडगा उगारणे गरजेचे आवश्यक असते, सतत मुलाहिजा ठेवता येत नाही….
प्रकाश मेहतांच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेकदा हतबल ठरले आहेत. आज जे तुम्ही बोंबा मारून मोकळे होताहेत कि दस्तुरखुद्द प्रकाश मेहता बांधकाम व्यावसायिक असतांना त्यांच्याकडे फडणवीस यांनी गृहनिर्माण खाते का म्हणून दिले म्हणजे चोराच्या हाती तिजोरीच्या किल्ल्या का सोपविल्या, तुम्हाला असे वाटते का कि आपणहून फडणवीस यांनी ते सोपविले असेल, नो, असे त्यावेळी अजिबात घडले नाही, प्रकाश मेहता किंवा चंद्रकांत पाटलांकडे कोणती खाती सोपवायची हे अतिशय स्पष्ट शब्दात त्यांच्या अध्यक्षांनी म्हणजे अमित शाह यांनी सूचना दिल्याने चोराच्या हाती किल्ल्या म्हणजे प्रकाश मेहता यांना गृहनिर्माण खाते आणि रायगडचे पालकमंत्री पद सोपविणे फडणवीसांना भाग पडले….
आणखी एक गम्मत सांगतो, जेव्हा तडकाफडकी ठाण्याच्या जिल्हाधिकारी पदावरून कडक शिस्तीच्या अश्विनी जोशी यांना हटवून तेथे अत्यंत वादग्रस्त अशा डॉ. महेंद्र कल्याणकर यांना बसविले गेले, मला कळले कि हे काम मुख्यमंत्री दरबारी ठाण मांडून प्रकाश मेहता यांनी करवून घेतले, त्यांना त्यात अर्थमंत्र्यांनी म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांनी साथ दिल्याचे समजले, मेहता मुळातच हलकट माणूस त्याच्याशी भांडून उपयोगाचे ठरले नसते पण फडणवीस आणि मुनगंटीवार या दोन सुसंस्कारी पारदर्शी नेत्यांशी मात्र मी कडाकडा भांडलो, मुनगंटीवार म्हणाले, मेहतांचा आग्रह होता आणि कल्याणकर नावाची डोकेदुखी मला चंद्रपुरात ठेवायची नव्हती, म्हणून मी मेहतांच्या आग्रहावर री ओढली. एखाद्या जिल्हाधिकाऱ्यावर मी थेट आरोप तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याची चड्डी आतून केवढी आणि किती फाटकी मला तंतोतंत माहित असते, अन्यथा प्रशासकीय अधिकारी हे पद तसे आमच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेले आहे पण जेव्हा या पदाचा अतिरेक करणारे समोर येतात तेव्हा असे शंभर कल्याणकर समोर लढायला आलेत तरी भीती वाटत नाही. जरा मला उसंत मिळू द्या, ठाणे जिल्हाधिकारी म्हणून कल्याणकर यांनी करून ठेवलेले प्रताप, नक्की मांडून एक दिवस मोकळा होईल….
आता एक गम्मत बघा फडणवीस मंत्री मंडळातली, जसे प्रकाश मेहता बांधकाम व्यवसायिक असतांना त्यांना गृहनिर्माण खाते देण्यात आले तेच नागपुरातल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतीतही घडले, ते देखील मंत्री होण्यापूर्वी वीज महामंडळातले बडे कंत्राटदार होते पण मंत्री झाल्यानंतर मेहता यांनी आपल्या खात्याचा जो दुरुपयोग करून स्वतःला आणि सरकारला खड्ड्यात घातले ते बावनकुळे यांच्या बाबतीत अजिबात घडलेले नाही उलट वीज खाते नेमके कसे, तेथले कोण साव आणि कोण चोर, बांधकाम खात्याचा कारभार बावनकुळे यांना तंतोतंत माहित असल्याने ते मंत्री झाल्यावर मेहतांसारखे भ्रष्ट आणि हलकट ठरले नाहीत उलट ते ठरले आहेत वीज खात्यातल्या बदमाशांचे कर्दनकाळ. ज्या पद्धतीने बावनकुळे या खात्यातील बदमाश मंडळींना उभे आडवे घेतात बघून कधी कधी वाटते एखादा तेथे काम करणारा जागच्या जागी मुतून मोकळा व्हावयाचा. मी सांगतो, जसे अमित शाह यांच्या सांगण्यावरून त्या प्रकाश मेहता यांना मुख्यमंत्र्यांनी अनिच्छेने गृहनिर्माण खाते सोपविले होते तेच या बावनकुळे यांच्या बाबतीतही घडले होते म्हणजे नितीन गडकरी यांच्या आग्रहावरून मोठ्या अनिच्छेने मुख्यमंत्र्यांनी बावनकुळे यांना आधी मंत्री केले वरून वीज खाते दिले पण पुढल्या काही दिवसातच फडणवीस यासाठी खुश झालेत कि बावनकुळे हे नागपूरचे पालकमंत्री आणि वीज खात्याचे मंत्री म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळातले अतिशय यशस्वी मंत्री म्हणून पुढे आले, खरी गम्मत पुढे आहे जेव्हा एकनाथ खडसे मंत्री म्हणून पायउतार झाले त्यानंतर त्यांच्याकडले अतिशय वादग्रस्त ठरलेले उत्पादन शुल्क खाते मुख्यमंत्र्यांनी आपणहून बावनकुळे यांच्याकडे सोपविले, विशेष म्हणजे बावनकुळे मुख्यमंत्र्यांना म्हणाले, भाऊ, हे खाते वठणीवर आणायचे असेल तर आयुक्त म्हणून मला तुकाराम मुंडे यांच्यासारखा अधिकारी द्या, फडणवीसांनी आपल्या या बेधडक मंत्र्यांचे आधी कौतुक केले आणि तातडीने महा धडकेबाज अश्विनी जोशी यांची त्याठिकाणी नियुक्ती केली. महत्वाचे म्हणजे एकनाथ खडसे यांचे मंत्रिपद ज्या चार दोन गंभीर कारणांनी गेले त्यात उत्पादन शुल्क हेही एक खाते होते, स्वतः अमित शाह यांनी अतिशय तातडीने मुख्यमंत्र्यांना सांगतिले होते कि खडसे यांच्याकडले हे राज्य उत्पादन खाते त्वरित काढून घ्या पण ती वेळ आली नाही, पुढल्याच काही दिवसात खडसे यांना भूखंड घोटाळ्यावरून घरी जावे लागले….
मला वाटते, मंत्री होण्यापूर्वी ज्या खात्याचा अमुक एखाद्याला अनुभव असतो त्याजकडे तमुक एक खाते सोपवायला हरकत नसावी पण आपली म्हणजे भारतीयांची मानसिकता अतिशय भ्रष्ट असल्याने आपण अनुभवाचा दुरुपयोग करतो म्हणजे शिक्षण सम्राट पतंगराव कदम यांच्याकडे जेव्हा शिक्षण खात्याची जबाबदारी येते त्यानंतर ते राज्याचे नव्हे तर स्वतःच्या शैक्षणिक संस्थांचे भले करून मोकळे होतात…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी