मनातली खदखद : पत्रकार हेमंत जोशी
श्रावणातला प्रसन्न सोमवार…
नवरा बायको दोघेही सत्यनारायणाच्या
पूजेला बसलेले..
गुरुजी म्हणाले हाताला हात लावा,
प्रेमाने हात लावत बायकोने अगदी गंमतीने
सहज म्हणून विचारले,
आरती आठवते का…?
हो…खालच्या मजल्यावर राहायची,
ती गॅलरीत आली रे आली कि मी वरून एकटक
तिच्या…..
कारण ओढणी हा शब्द देखील तिला
ठाऊक नव्हता…
का, काय झाले तिचे….?
….
….
….
….
पूजे आधीच प्रसाद…!!
…
…
सत्यनारायण पूजेनंतर…
तुला प्रसाद आवडतो का,
नवऱ्याने विचारले.
समोरच्या गोखल्यांचा ना..
हो, आजही आवडतो,
आणि आधीही..
त्याचे त्याच आरतीशी जमले,
आणि मिस्टर टकलोबा,
माझ्या खडूस बापाने तुमच्याशी
लावून दिले…!!
बायको म्हणाली…
फार कमी जोडपी अशी असतात, ज्यांना आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत वाटत राहते कि त्यांचे एकमेकांशी नुकतेच लग्न झालेले आहे. बहुतेकांचे वर सांगितलेल्या चुटक्याप्रमाणे वाद असतात, वाद होत राहतात, सतत एकमेकांकडे एकतर संशयाने किंवा खुन्नस ठेवून एखादा शत्रू असल्यासारखे असंख्य जोडपे एकमेकांकडे पाहतात, संसार पार विस्कटलेला असतो…
येथे अतिशय वेगळ्या विषयावर मला काही सांगायचे आहे. जे तुमच्या आमच्या सर्वांच्या घरात हमखास घडते, नेमके तेच तुम्हाला सांगायचे आहे. मनातली खदखद, मळमळ, तळमळ तुमच्याकडे व्यक्त करायची आहे. विक्रांत आणि विनीत, माझी दोन्ही मुले दोन टोकाची, मोठा धाडसी, छोटा शांत, मोठ्याच्या मनातले पटकन कळते, विनीतच्या मनातले समजावून घ्यावे लागते. दोन्ही मुले स्वभावात दोन टोकाची, असामान्य, त्यामुळे येथपर्यंत व्यवसाय, पत्रकारिता आणि त्या दोघांनाही सांभाळतांना माझी झालेली ओढाताण, कुत्तरओढ मलाच ठाऊक, दोघांचाही ते विशिष्ट वय पार करेपर्यंत त्यांचे पाय घसरू नये, नको ते नाद व्यसने त्यांना लागू नयेत, त्याजकडे लक्ष देता देता मोठी कसरत करावी लागली. पण त्याचा नको तेवढा परिणाम झाला असा कि, त्या दोघांचे लग्न ठरवितांना, म्हणजे मला ठाऊक असूनही त्यांना सहजच विचारले, तुमचे कुठे काही असेल तर सांगा, म्हणजे पुढले पाऊल उचलता येईल. तुमचे लग्न तुम्ही पसंत केलेल्या मुलीशी रीतसर लावून देता येईल मात्र त्यावर ते दोघेही नाही म्हणाले आणि मी कपाळाला हात लावून घेतला कारण अलीकडे स्थळं बघून जोडी जमविणे, मोठ्या जिकरीचे काम, मात्र ११-१२ वर्षांपूर्वी विक्रांतला जे पहिलेच स्थळ सांगून आले, आम्ही पसंत केले आणि उरकून टाकले, पसंती माझी होती, डोळ्यात तेल घालून मी सारे बघितले आणि स्थळ पसंत केले, कारण मनासारखी पत्नी मिळाली नाही तर ज्याचे मन हळवे असते त्याला आयुष्यभर किती जबर किंमत मोजावी लागते, मी आमच्या घरातून अनुभवले होते, टच वुड, विक्रांत किंवा आमच्यावर गेल्या दहा बारा वर्षात पश्चातापाची वेळ आली नाही…
विनीतच्या बाबतीत देखील तेच घडले, तो देश परदेशातून ज्या महाविद्यालयातून शिकला, विक्रांतप्रमाणे तेथेही सुंदर आणि श्रीमंत मुलींचा अक्षरश: खच पडलेला, नंतर तो ज्या व्यवसायात आला आहे, तेथे देखील सुंदर आणि श्रीमंत मुलींचा सतत भरणा, पण त्यानेही तेच सांगितले, नो अफेअर, तुम्ही पसंत कराल तिथे मी लग्न करून मोकळा होईल, पुन्हा कपाळावर हात, यावेळी मात्र मी त्याचे रीतसर मुंबई आणि पुण्यातल्या त्या दोन ब्राम्हण महिलांकडून चालविल्या जाणाऱ्या प्रसिद्ध विवाह मंडळात नाव नोंदविले, आणखीही दोन ठिकाणी त्याचे नाव नोंदविले होते, पण अनुभव अतिशय वाईट, थोडक्यात आपण जाहिरातींना भुलून अमुक एखाद्या विवाह मंडळात नाव नोंदवून मोकळे होतो पण भरमसाठ पैसे मोजूनही होते ती फसवणूक, तुम्ही सावध असावे, म्हणून येथे हे मुद्दाम नमूद केले आहे, कदाचित मी या अशा विवाह मंडळांवर काही दिवसात फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला कमी करणार नाही…
शेवटी मी माझ्या दांडेकर आणि कुलकर्णी आडनावे उद्योगपती मित्रांना विचारले, नाव कुठे नोंदवायला हवे, त्यांनी मग एका प्रसिद्ध अमराठी विवाह मंडळाचे नाव सांगितले, जेथे त्या दोघांचे जमले होते, मीही नाव नोंदविल्यानंतर पुढल्या केवळ महिन्याभरात त्या विवाह मंडळाने आमची नेमकी पसंती लक्षात घेऊन जी विविध जगभरातली स्थळे आमच्यासमोर मांडलीत, त्यावर कौतुक करावे तेवढे कमी, विशेष म्हणजे त्या अमराठी विवाह मंडळातला स्टाफ ज्या पद्धतीने फॉलो अप घ्यायचा ते तर आणखी खास होते, पैसे भरल्याचे समाधान वाटले कारण विवाह मंडळांचे पिक आलेले आहे आणि ते मोठी रक्कम प्रसंगी सामान्य कुटुंबांकडूनही वसूल करून मोकळे होतात पण हवी ती सेवा देताना करतात ती केवळ शुद्ध फसवणूक…
या अमराठी विवाह मंडळातून दरदिवशी अतिशय चांगली स्थळे येत होती पण माझी मोठी सून मुंबईतली, इच्छा होती नव्याने येणारी सून आमच्या विदर्भातली असावी, त्यांनी तेही काम माझ्यासाठी केले आणि मनासारखे स्थळ लगेच महिनाभरात चालून आले, जमलेही. वाचकहो, तुम्ही मात्र एक काम करा, हल्ली लग्न ठरवून करणे मोठ्या जिकिरीचे काम, तुमच्या मुलांना आता पासूनच सांगा, तुम्ही तुमचे ठरवून मोकळे व्हा रे बाबानू…
अर्थात, माझ्या मुलांच्या वैवाहिक आयुष्याचे मातेरे होऊ नये असे मला मनापासून वाटत होतेम्हणून मी डोळ्यात तेल घालून होतो कारण पती असो किंवा पत्नी, त्यातले एक कोणीही बिलंदर भांडखोर हलकट हेकट निघाले कि आपल्या आयुष्याचे मोठे नुकसान होते, तुमच्याकडे
कदाचित सगळे असते किंवा येते पण नसते ते सुखी वैवाहिक जीवन, ज्यामुळे तुम्ही भोगता ते फक्त आणि फक्त नर्कमय आयुष्य, अशावेळी तुमच्या डोळ्यातले आसवे थांबत नाहीत, ज्यांचे मन कठोर असते ते मात्र घटस्फोट घेऊन मोकळे होतात, पण ज्यांचे मन आपल्या मुलांमध्ये अडकलेले असते ते पोटच्या मुलांच्या सुखासाठी मग आयुष्यभर हे असे नर्कमय जीवन जगणे वेचणे पसंत करतात, त्यात मुले पुढे चांगली निघालेत तर ठीक, अन्यथा डोळ्यात असतात दाटतात ते केवळ दुख्खाश्रू…
पुरुष किंवा स्त्री, यापैकी कोणाच्याही वाटायला दुष्ट किंवा व्यसनी वृत्तीचे जोडीदार यायला नकोत, थोडक्यात जोडायला जोडा हवा, त्यावर डोळ्यात तेल घालून लग्न करतांना निर्णय घ्या. चांगला जोडीदार वाट्याला येणे हे मला वाटते मागच्या जन्मीचे पुण्य असेल तरच घडत असेल, जेथे नवरा बायकोत समन्वय नाही, एकमेकांना समजावून घेण्याची मानसिकता नाही किंवा पोटच्या मुलांसाठी त्याग कारण्याची वृत्ती नाही ते घर असते केवळ एक सांगाडा…