मोपालवारांवर गोटे २ : पत्रकार हेमंत जोशी
वर्हाडी भाषेत गोटे म्हणजे दगड. हा शब्द १९८६ मध्ये राज्यमंत्री असतांना येथे मुंबईच्या पत्रकारांसमोर डॉ. श्रीकांत जिचकार यांनी जेव्हा एका पत्रकार परिषदेत उच्चारला होता, पत्रकारांची त्यांच्यासमोरच हसून हसून मुरकुंडी वळली होती. सध्या हि गोटेफेक आमदार गोटे प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावर करताहेत म्हणून या लेखमालेला मथळा दिला, मोपालवारांवर गोटे…
पुन्हा हेच सांगतो, मोपलवार आणि गोटे या दोघांच्या चाललेल्या घनघोर युद्धात,माझ्यासारख्यांना म्हणजे पत्रकारांनीही पडण्याची गरज नाही, जेव्हा अनिल गोटे राधेश्याम मोपालवारंवार आरोप करतात तेव्हा त्या आरोपांना पुराव्यांसहित उत्तर मोपालवारांनी तयार करून ठेवलेले असते. कारण मोपालवारांजवळ बसून त्यांचा विश्वास संपादन करून प्रसंगी त्यांच्या घरी प्रवेश मिळवून जी माणसे अनिल गोटे यांना ढीगभर पुरावे आणून देण्याचे काम करतात, त्याचवेळी अनिल गोटे यांच्या संपर्कात असलेले देखील, गोटे पुढे काय करणार आहेत, ह्याची मोपालवारांना माहिती देऊन मोकळे होताहेत. त्यामुळे जे घडते आहे ते फक्त दुरून बघावे, फारतर दोन अश्रू डोळ्यात आणून यासाठी मोकळे व्हावे कि काळा पैसे कसे अराजक निर्माण करतो. काल एक मित्र म्हणाला, हेमंत तू नेत्यांविरुद्ध, पत्रकारांविरुद्ध किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील नामवंतांविरुद्ध लढा देतो, भीती वाटत नाही पण जेव्हा केव्हा तुझी अतिशय सुप्त पद्धतीने या राज्यातल्या काही खतरनाक अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई सुरु असते, संघर्ष सुरु असतो, भीती वाटते, हि माणसे तुझ्या जीवाचे काही बरे वाईट करतील म्हणून, मित्रहो, खरे आहे ते, पण मनातले सांगतो, हे असे वाईट अधिकारी जीवनातून उध्वस्त व्हावेत असे कधीही वाटत नाही उलट तुम्ही यातून बाहेर पडा किंवा त्यांनी या जीवघेण्या मिळकतीतून बाहेर पडावे म्हणून अक्षरश: जीवाचे रान करून मी त्यांच्या भेटीगाठी घेतो, त्यांना पोटतिडकीने समजावून सांगतो. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे, अलीकडे या काळ्या पैशांच्या लढाईतून एक अतिशय निंदनीय प्रकार घडतो आहे म्हणजे आपले बोलणे किंवा संभाषणाचे एकतर टेपिंग करून घेणे किंवा भेटीचे गुपचूप चित्रीकरण करून घेणे, हा प्रकार एवढी खतरनाक पत्रकारिता करून देखील एकदाही आम्ही उपयोगात आणलेला नाही, त्यामुळे हे कधी ध्यानीमनीही नसते कि आपले बोलणे किंवा संभाषण एखादा जतन करून ठेवणार आहे, अर्थात मला त्याची यासाठी भीती नसते कि एखाद्याला समजावून सांगतांना त्यात कुठलाही आर्थिक स्वार्थ नसतो, ब्लॅक मेलिंग करणे तर स्वप्नातही नसते, आमच्या आक्रमक पत्रकारितेला आमचे काही हितशत्रू आम्हाला ब्लॅक मेलर ठरविण्याचा प्रयत्न करतात, नंतर त्यांनाच पश्चाताप होतो कि असे हेमंत जोशी यांच्याबाबतीत काहीही नाही. कशासाठी दहशत किंवा दादागिरी किंवा ब्लॅक मेलिंग, चार चांगले मित्र पाठीशी उभे असलेत कि आपण आपोआप आर्थिक दृष्ट्या कणखरपणे उभे राहतो, असे मला याठिकाणी जर कोणी ब्लॅक मेल करत असेल तर त्यांना सांगणे आहे….
खरे आहे ते, इतर कोणाशीही पंगा घेतांना कधी भीती मनाला शिवत नाही अगदी खतरनाक गुंडांविरुद्ध लढतांना देखील कधी भीती वाटली नाही पण शासकीय किंवा शासनातल्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढतांना त्याची पोहोच किती आणि कशी खतरनाक, याचा मी आधी बारकाईने अभ्यास करून ठेवतो, हे मात्र तितकेच खरे आहे. एक जुना किस्सा सांगतो, आत ते अधिकारी जिवंत नाहीत पण ते महाशय रामराव आदिक मंत्री असतांना त्यांच्या कार्यालयात होते, बाईलवेडे आणि भ्रष्ट देखील होते म्हणून मी एक दिवस त्यांच्याविरुद्ध लिहून मोकळा झालो, आश्चर्य म्हणजे मला त्यानंतर दोन तीन दिवसांनी एका गँगस्टरचा निरोप, त्यांच्याविरुद्ध लिखाण केले तर महागात पडेल, आधी मी ते ऐकून घेतले आणि तडक त्या अधिकाऱ्याला गाठले, म्हणालो, हरामखोरा, यानंतर जर हा प्रकार घडला तर थेट पत्रकार परिषद घेऊन मी मोकळा होईल आणि जे घडले ते आदिकांनाही सांगून मी मोकळा झालो, त्यानंतर अनेकदा त्या अधिकाऱ्यावर लिहिल्याने ते महाशय पुढे युती सरकार सत्तेत आल्यानंतर सहज शक्य असूनही ते कोणत्याही मंत्री आस्थापनेवर रुजू झाले नाहीत किंवा मी वारंवार लिहूनही कधी मला त्यांचा त्रास झाला नाही….
पत्रकारिता म्हणजे सतीचे वाण आहे, येथे तुमच्या बाबतीत काहीही घडू शकते, तुमची कोणतेही येणारे संकट झेलण्याची मानसिकता पाहिजे, ती आमच्या कुटुंबात आहे म्हणून आधी मी आमच्या बंधूंना पत्रकारितेत आणले नंतर पोटच्या पोराला. अलीकडे आमदार अनिल गोटे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन राधेश्याम मोपलवार आणि त्यांच्या कंपूविरुद्ध पुरावे त्याठिकाणी सादर केले, विशेष म्हणजे प्रिंट मीडियाने त्या गंभीर आरोपांची विशेष दाखल घेतली नाहीच पण वाहिन्यांनी तर हे प्रकरण हि परिषद पूर्णतः दुर्लक्षित केली. असे का घडले असावे, म्हणजे गोटे यांच्या पुराव्यांवर पत्रकारांचा विश्वास नाही कि हे पुरावे बाहेर पडू नयेत म्हणून गोटे ज्यांच्याविरुद्ध लढताहेत त्यांचे प्रयत्न कामाला आलेत, नेमके काय घडते आहे, घडले आहे, हेही समोर आले पाहिजे…
आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगतो, आपल्या या राज्यात भ्रष्ट मार्गाने पैसे मिळविण्याच्या शासनात दोन पद्धती ठरलेल्या आहेत त्यातली एक पद्धत अशी कि योजनामग ती कोणतीही असो, शासकीय फंड्स उपलब्ध झाले रे झाले कि त्या पैशांवर संबंधित साऱ्यांनी तुटून पडायचे आणि लुटून न्यायचे, गावित किंवा पाचपुते यांच्यासारखे नेते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार या अशा पद्धतीचा स्वीकार करणारे, पैसे खाण्याची दुसरी पद्धत एकदम खतरनाक आहे पण फारसे नुकसान करणारी नाही त्याला मी टी. चंद्रशेखर पद्धत म्हणतो, म्हणजे अमुक एक योजना आखायची, अमलात देखील आणायची पण त्या योजनेमागे विशिष्ट हेतू ठेवून संबंधितांनी अलोट संपत्ती मिळवून मोकळे व्हायचे, फार डोके खाजवू नका, स्पष्ट सांगायचे झाल्यास समृद्धी महामार्गाचे उदाहरण देतो, हि योजना एकदम कडक, मोठा विकास त्यातून साधल्या जाणार आहे पण हा महामार्ग बांधतांना दोन ऐवजी जो दहा रुपये खर्च होणार आहे त्यातून अनेकांचे आर्थिक भले होणार आहे, विशेष म्हणजे हा महामार्ग सुरु होण्यापूर्वी अतिशय नियोजनपूर्वक अनेक अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी, दलालांनी या मार्गाच्या आड येणाऱ्या जमिनी विकत घेऊन ठेवलेल्या आहेत, विशेष म्हणजे हे सारे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील अंधारात ठेवून हे घडले आहे, त्यांना जेव्हा हे कळले, नक्की त्यांनी कपाळावर हात मारून घेतला असावा.
पुढे यावर कधीतरी, आणखी बरेच काही…
पत्रकार हेमंत जोशी