राऊतांचे सामनायन : पत्रकार हेमंत जोशी
संजय राऊत उद्या कोणालाही काहीही म्हणून मोकळे होतील, त्यांच्या हाती लेखणीही आहे आणि वृत्तपत्र देखील..जैन मुनींना ते देशद्रोही झाकीर नाईक म्हणून मोकळे झाले, उद्या ते खुश होऊन डहाळे यांना डोहाळे म्हणतील, मित्रवर्य शरद पवारांना संत तुकारामाची उपमा देऊन मोकळे होतील, आशिष शेलार यांना सुशांत शेलार किंवा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना संत गोरा कुंभाराची उपमा देतील.उद्या ते पत्रकार अनिकेत जोशी यास आधुनिक दारासिंग ठरवून मोकळे होतील आणि राज्यमंत्री संजय राठोड यास म्हणतील, केवढा सुकलास रे…
एक मान्य कि शिवसेनेची, थेट उद्धव ठाकरे यांची चारही बाजूंनी राजकीय कोंडी भाजपा करते आहे पण सेनेसारखा आक्रमक आणि सतत मराठी माणसांसाठी झगडणारा प्रादेशिक पक्ष, अन्य कुठल्याही राजकीय पक्षाची कितीही मोठी लाट आली तरी संपणारा नाही पण उठता बसता सेनानेते या असल्या उथळ बोलण्यातून किंवा लिखाणातून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेऊ लागले तर मात्र सेनेचे खाली येणे, कदाचित इतिहास जमा होणे सहज शक्य होऊ शकते…
एखाद्या जैन मुनीने संताप व्यक्त करणे म्हणजे मानसी नाईक या अभिनेत्रीने अभिनयही करण्यासारखे किंवा प्रशासकीय अधिकारी किरण कुरुंदकर यांनी नोकरी सोडून चार्ली चॅप्लिनच्या भूमिकेत शिरण्यासारखे किंवा निखिल वागळे यांनी दररोज सकाळी संघ शाखेवर जाण्यासारखे पण हे असे घडले आहे, जैन मुनी सूर्यासागरजी देखील संजय राऊत आणि शिवसेनेवर आग आग ओकले आहेत, एरवी मिच्छामी डुक्कडम म्हणणारे म्हणजे काही चुकीचे घडले असेल तर माफ करा म्हणणारे सारेच्या सारे जैन संजय राऊत यांच्यावर कमालीचे चिडले आहेत, राज्याच्या दृष्टीने केवळ एका क्षुल्लक ठरलेल्या मीरा भायंदर पालिका निवडणुकीत यश मिळाले नाही किंवा ते मनी आणि मुनींच्या भरवशावर भाजपा ने तुमच्यापासून यश खेचून नेले म्हणून एखाद्या मुनीला तुम्ही थेट पाकिस्थानी विचारांच्या झाकीर नाईक याच्या म्हणजे देशद्रोहाच्या रांगेत आणून ठेवता, त्यामुळे हे घडले एरवी तोंडाला पट्टी बांधून रस्त्याने फिरणारे जाईन मुनी देखील आग ओकून मोकळे झाले, जहाल स्टेटमेंट देऊन त्यांनी राऊतांचे वस्त्रहरण केले…
आम्ही जी संजय राऊत यांच्या संदर्भात व्हिडीओ क्लिप ऐकली आहे, विशेष म्हणजे त्यात सूर्यासागरजी चक्क मराठीत आगपाखड करून मोकळे झाले आहेत, अमुक एखाद्याची माय बहीण काढणे कसे असते, हे बघायचे ऐकायचे असेल तर दूर कुठेही जाणे नाही, सूर्यासागरजी तेवढे ऐका. अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि जैन मुनी यांनी संजय राऊत यांना अगदी उघड टार्गेट केल्यानंतर सेना नेते किंवा शिव सैनिकांच्या तोंडून निषेध करणारा ब्र शब्द बाहेर पडलेला नाही याचा सरळ अर्थ असा, राऊतांचे ते तसे वागणे आणि बोलणे शिवसेनेत कोणालाही रुचलेले दिसत नाही अगदी उद्धव ठाकरे यांना सुद्धा. यापुढे एरवी बऱ्यापैकी शिवसेनेला सहकार्य करणार जैन समाज पुन्हा एकदा आपल्याकडे खेचणे, सेनेला ते नक्की जड जाईल, हि काळ्या दगडावरची रेघ आहे…
जैन मुनी सूर्यासागरजी ज्या पद्धतीने संजय राऊतांना आडवे तिडवे घेऊन मोकळे
झाले आहेत, ते ऐकण्यासारखे…
” संजय राऊत तु हे असे लिहून शिवसेनेला शवसेना करून मोकळा झाला आहेस. जैन मंदिरासमोर तुम्ही मास मटण शिजवून खाल्ले, अरे तुमच्यात ताकद असेल तर मशिदीसमोर डुक्कर शिजवून दाखवा. सर्वाधिक आयकर भरणारा जैन समाज आहे, तुम्हाला कुठे उखडून फेकू, सेनेला ते कळणार देखील नाही. बाळासाहेब स्वर्गातून तुमचे हे असे कृत्य बघून नक्की अस्वस्थ होत असतील, केव्हा मी एकदा खाली जातो आणि या अशा मंडळींना थोबाडात मारतो, हे त्या बाळासाहेबांना वाटत असेल. राऊत तुझी औकात आहे का, आम्हाला ठेचून काढण्याची, असेल तर पाठव त्या मंडळींना आमच्या कडे, गुटखा खाऊन राजकारण होत नसते…संजय राऊत नामक जोकरने जैन मुनींची जी झाकीर नाईक शी तुलना केली आहे, त्याचा मी निषेध करतो, तुम्ही आम्हाला छेडू नका, अन्यथा आम्ही तुम्हाला सोडणार नाही. या संजय राऊत ला कोण ओळखते? तू एक लहान माणूस आहे. अरे मूर्खांनो, तुम्हाला काय वाटते मुंबई तुझी आहे, अजिबात तुझी नाही. तुझ्या आईने तुला संजय संस्कार दिले नाहीत काय, एका मुनीला तू जोकर म्हणून मोकळा होतो, तुला कोणीही माफ करणार नाही. तंबाखू खाऊन कॅमेरासमोर येणारा संजय राऊत, आमच्या समोर तुझी गुंडागर्दी अजिबात चालणार नाही…”
राजकीय कलह, भांडणे, कुरापती, झिगझिग, धुसफूस, बाचाबाची, टीका, बदनामी, भुणभुण, किरकिर राजकारण्यांना नवीन नसते, त्यांच्या पाचवीला पुजलेली असते, आलेले राजकीय संकट किंवा अपयश अतिशय नियोजनबद्ध म्हणजे आधी शांततेने नंतर तयारीनिशी आक्रमकतेने परतवून लावायचे असते, संजय राऊत तुमच्या या अपशब्दातून तुमची एकट्याची नव्हे तर अख्ख्या शिवसेनेची त्या जैन मुनींनी बिना पाण्याने भादरून ठेवलेली आहे आणि त्यांना प्रत्युत्तर देणे निदान या विषयावर तरी तुम्हाला अजिबात शक्य नाही किंवा तसा प्रयत्न देखील आपण करू नये, माणसे कणाकणांनी जोडायची असतात, माणामणांनी दूर फेकून द्यायची नसतात…
तूर्त एवढेच.
पत्रकार हेमंत जोशी