नाथा तो ‘ आनंद ‘ मिळेल का..पत्रकार हेमंत जोशी
नाथा म्हणजे काल परवा पर्यंत एक सच्चे पण कफल्लक शिवसैनिक म्हणून आनंद दिघे यांच्या सभोवताली वावरणारे मात्र आजचे अतिशय खूप श्रीमंत राजकारणी आणि या राज्याचे सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम ) मंत्री. ठाणे जिल्ह्यातले उद्धव ठाकरे यांनाही खूपसे डोईजोड ठरलेले शिवसेना नेते. हे एकटेच सत्तेच्या राजकारणात पोटच्या पोरासहित खूप पुढे गेले, बाकी सारे जणू काही सतरंज्या उचलण्यापुरते, कानाखालचे असतील तरच यांच्या अधिपत्याखाली काहीतरी पदरात पडून घेता येते, इतरांचा मात्र अनंत तरे होतो, झुरुन झुरुन कसेबसे दिवस कुंठतो. नाही म्हणायला अनेकांनी शिंदे यांच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला, पण अशांचा लवकरच प्रताप सरनाईक झाला. जोपर्यंत सरनाईक यांच्या कानाखालचे होते तोपर्यंत त्यांचा दबदबा होता, पण यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करताच, त्यांचाही मीरा भायंदर महापालिका निवडणुकीत मामा केल्या गेला, सरनाईक आता कसेबसे अस्तित्व टिकवून आहेत…
अर्थात असे अनेक सरनाईक, तरे किंवा नरेश म्हस्के ठाणे जिल्ह्यातल्या शिवसेनेत आहेत. असे वाटले होते आज जे जे भरभक्कम एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे ते त्यांच्या पुढे ठाणे जिल्ह्यातली शिवसेना भरभक्कम करण्यात कित्येक पाउल पुढे असलेल्या नरेश म्हस्के यांना मिळेल. पण कसचे काय आणि कसले काय, जेव्हा केव्हा म्हस्के यांना आता खूप मिळेल असे वाटत होते तेव्हा तेव्हा त्यांचा असा काही गणपती बाप्पा केल्या गेला कि ते अनुभवी धाडसी नरेश म्हस्के यांच्या स्वतःच्या देखील लक्षात आले नाही. पण लक्षात आल्यानंतर मात्र नरेश म्हस्के त्यांच्या स्वभावाला जागून ते असे काही चिडले कि शिंदे यांना वाटले आता आपले काही खरे नाही, मग तडजोड झाली असावी आणि म्हस्के यांना संघटनेत प्रमोशन देऊन पुन्हा केवळ ठाण्यातच ठेवण्यात आले, कित्येक ऐरेगैरे, ठाणे जिल्ह्यात, आमदार म्हणून शिवसेनेच्या भरवशावर आणि दिघेंच्या पुण्याईवर थेट मंत्रालय, विधान सभा, विधान परिषद गाठून मोकळे झाले पण तळहातावर प्राण घेऊन लढणार्या लढवय्या नरेश म्हस्के यांची मात्र कायम सतत सदैव आजतागायत झाली ती केवळ उपेक्षा आणि अवहेलनाही…
पक्ष सोडून गेले नाहीत तो भाग वेगळा पण सरनाईक किंवा म्हस्के यांच्यावर हि वेळ नक्की येऊन ठेपली होती, आजही फारसे वेगळे चित्र नाही पण पर्याय नसल्याने अपमान गिळून कधी कधी एखाद्या नेत्याला वाट पाहावीही लागते.असा एखादा भ्रमण ध्वनी अस्तित्वात आहे का कि जो फिरवल्यानंतर थेट शिंदे यांच्याशी संपर्क साधणे आमच्यासारख्या सामान्य माणसाला सहज शक्य होते, कृपया त्यांनी असा भ्रमण ध्वनी असलाच तर कळवावा. अर्थात आम्ही ना बिल्डर आहोत ना व्यापारी, ना भ्रष्ट अधिकारी आहोत ना कानाखालचे पदाधिकारी त्यामुळे शिंदे आम्हाला म्हणजे सामान्य लोकांना, मतदारांना, किंवा सतरंज्या उचलणार्या शिवसैनिकांना त्यांच्याशी थेट संपर्क साधण्याचा भ्रमण ध्वनी देतीलच असे नाही. पक्षांतर्गत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांचे नेमके स्वरूप कोणते हे सांगण्याची तयारी जेथे दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांच्यात नाही तेथे इतरांना स्वतःचा नरेश म्हस्के अनंत तरे प्रताप सरनाईक करवून घेणे शक्य नाही पण एक घडू शकते, तुमच्या मनातले नेमके जर आम्हाला सांगितले तर आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी थेट लेखणीतून पंगा घेण्यास नक्की तयार आहोत, बघा प्रयत्न करून…
क्रमश :
पत्रकार हेमंत जोशी