समग्र तटकरे २ : पत्रकार हेमंत जोशी
नुकत्याच बाळंत झालेल्या मांजरीसारखी शरद पवारांची त्यांच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी अवस्था करून आवडली आहे. मांजर बाहेर पडते, चार घरी जाऊन दूध पिऊन येते, पिल्लांजवळ येते, त्यांना जवळ घेऊन दूध पाजते. पिल्ले काहीच करीत नाहीत, कारण पिल्लाना काही उमजत नाही. त्यांना फक्त एवढेच ठाऊक असते, आई घरी आली कि तिला लटकायचे नंतर दिवसभर इकडे तिकडे फक्त हुंदडायचे, आईच्या जीवावर पिल्लांचे छान सुरु असते. शरद पवार सक्रिय आहे तोपर्यंत त्यांच्या या राज्यातल्या तमाम पिल्लांना फारसे काही करायचेच नाही कारण पवार म्हणतात, मैं हू ना…
खोटे वाटत असेल तर चला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांसंगे त्यांचा तेवढा रोहा मतदार संघ सोडून फिरुया, त्यांना सभा घ्या सांगूया. त्यांच्या सभेला उत्स्फूर्त चार श्रोते जरी जमले तरी ते पावन झाले, सांगून मोकळे होऊ या. स्वतः पवार चुकले कि त्यांना ताटाखालचे मांजर प्रदेशाध्यक्ष हवे होते, नेमके लक्षात आलेले नाही पण तटकरे यांचा अजिबात प्रभाव नाही, असून देखील अडचण आहे आणि ते नसलेत तरी खोळंबा नाही, जो काय तो त्यांचा तेवढा आता रोहा विधान सभा मतदार संघापुरता तेवढा थोडाफार प्रभाव कायम आहे, तेथेही त्यांना त्यांचे बंधू अनिल आणि पुतणे अवधूत उरून पुरले आहेत, उरून पुरणारे आहेत, समग्र पुस्तकात या बंधू आणि पुतण्याचा अभावानेच उल्लेख आहे, तटकरे जेव्हा येथे मंत्रालयात बसून पैसे जमा करीत होते तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना मतदार संघात ताकद देणारे हेच ते अनिल आणि अवधूत होते. ज्यांच्या कुबड्यांवर सुनील उड्या मारून पुढे आले त्यांना काळाच्या ओघात बाजूला सारून तटकरेंनी पोटच्या मुलीस म्हणजे आदिती आणि चिरंजीव अनिकेत यांना पुढे नेण्याचा संकल्प सोडला, दोघांमधली कुस्ती म्हणूनच रंगते आहे…
माहीम परिसरातील दर्ग्याजवळ भर रस्त्यात जे भिकारी बसलेले असतात, त्या रांगेत एखादी देखणी तरुणी भरजरी महागडे कपडे घालून चुकून बसल्यानंतर ते जे दृश्य असेल तसे सुनील तटकरे यांच्यावर काढलेल्या कि काढून घेतलेल्या समग्र या महागड्या चकचकीत कागदांवर काढलेल्या रंगीत पुस्तकाचे झाले आहे. केवळ तटकरे यांच्यासारख्या डाकू मंत्र्यांनी आम्हाला जे लुटले लुबाडले आणि राज्य भिकारी केले त्यातून हि माहीम दर्ग्याजवळ बसणाऱ्या भिकाऱ्यांची उपमा येथे दिली म्हणजे यांनी करून ठेवलेली भिकारी जनता आणि त्या मधोमध सुनील ताटकरेंचे महागडे पुस्तक, असे दृश्य नजरेसमोर तरळून गेले. समजा एखादे तसे निमित्त असते म्हणजे तटकरे यांनी अमुक एखादी अफलातून कामगिरी केली ज्यातून त्यांचे चौफेर कौतुक होते आहे किंवा त्यांचा वाढदिवस आहे, असे एखादे निमित्त असते आणि समग्र निघाले असते तर त्याचे काही कोणाला वाटले नसते पण येथे असे काही नाही, तटकरेंना आली लहर म्हणून त्यांनी हा केला कहर एवढेच काय ते या पुस्तके निमित्ते म्हणता येईल, किंवा ताटकरेंच्या जागी पुढला कोण, हे जे वादळ सध्या राष्ट्रवादी परिसरात तुफान घोंगावते आहे, त्यातून हे घडले असावे म्हणजे तटकरे यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने हे पुस्तक तडकाफडकी ओढूनताणून काढल्या गेले असावे, वादग्रस्त भ्रष्ट तटकरे महान श्रेष्ठ ग्रेट बलवान ताकदवान कसे हे जेव्हा मधुकर भावे यांच्यासारख्या अनुभवी आणि माहितगार ज्येष्ठ पत्रकाराने लिहिले तेव्हा मधुकर भावेंना लालूच दाखविली कि ते काहीही करू शकतात अशी जी त्यांच्या विषयी पत्रकारितेच्या वर्तुळात अनेकदा चर्चा रंगते, ते आज मनाला पटले, खरे वाटले कारण पूर्वी लोकमत मध्ये असतांना ज्या सुनील तटकरे यांची बिन पाण्याने जे भावे भादरून ठेवायचे तेच भावे समग्र मध्ये याच तटकरेंची न थकता न थांबता तारीफ करून मोकळे झाले, तेव्हा हेच वाटले हि अशी माणसे केव्हा आमच्या पत्रकारितेतून निवृत्त होतील….
पत्रकार हेमंत जोशी