समग्र तटकरे ४ : पत्रकार हेमंत जोशी
पूर्वीच्या अनेक हिंदी सिनेमातून एक दृश्य बघायला मिळायचे. एखादा डाकू विविध ठिकाणी डाके घालतो आणि अमुक एखाद्या गावात त्यातला काही भाग वाटून मोकळा होतो, अशा गावातल्या गोरगरिबांचा तो मसीहा देव देवदूत ठरतो, गावातली माणसे तो आला कि त्याच्या पाया पडतात, त्याचा जयजयकार करतात, हमखास बघायला मिळणारे हे दृश्य. आपणही सारे हेच करतो कि म्हणजे इतरत्र लुटपाट करून त्यातले थोडेसे आपल्या अंगावर फेकणाऱ्या भ्रष्ट वडिलांना, घरातल्या प्रमुखांना, बुवा बाबांना, नेत्यांना, मंत्र्यांना तथाकथित समाजसेवकांना साक्षात परमेश्वर मानून मोकळे होतो. दरदिवशी जवळपास आपल्या साऱ्यांच्याच हातून हे घडत असते, आपण अप्रत्यक्ष या समाजातल्या वाईट प्रवृत्तीचे उदात्तीकरण करीत असतो, हे असे आपल्याच देशात घडते जे अत्यंत चुकीचे घडते….
अलीकडे गुटख्याचे ड्रग्स सारखे व्यसन लावून अख्खी पिढी बरबाद करणाऱ्या माणिकचंदच्या रसिकलाल धारीवालचे बरे झाले कर्करोगानेच निधन झाले. पुण्यात म्हणे त्याचे समाजसेवक असे उदात्तीकरण करून दुःख व्यक्त करणारे अनेक ठिकाणी होर्डिंग लावण्यात आले होते. ज्या पुणेकरांना आपण सारेच सुसंस्कृत समजतो त्या पुणेकरांनी ह्या अशा वाईट माणसाचे उदात्तीकरण करावे, मनसोक्त राग यावा असे हे त्यांचे वागणे झाले. तरुणांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण करून रग्गड पैसे मिळविणारे दिवंगत रसिकलाल ते ज्या परिसरात राहत होते त्या स्थानिकांना त्यांच्या काळ्या मिळकतीतले थोडेसे काढून देतात आणि त्यांना मृत्यू पश्चात मसीहा ठरविले जाते, काय म्हणावे पुणेकरांच्या या मानसिक विकृतीला….?
१९८७-८८ च्या दरम्यान केवळ एका लहानशा सदनिकेतून हे रसिकलाल या जीवघेण्या धंद्यात उतरले, बघता बघता त्यांनी या ड्रग्स छाप धंद्यातून आर्थिक साम्राज्य उभे केले, एरवी स्वतःला देशभक्त समजणाऱ्या याच पुणेकरांनी त्या रसिकलाल यांना निदान या सुसंस्क्रुत पुण्यातून तरी चालते व्हा, सांगायला हवे होते, ते तर घडलेच नाही उलट त्यांच्या मृत्यू पश्चात ते कसे देवदूत संबोधून त्यांचे मरण दुःखद कसे सांगण्यात आले….शी…
केवढ्या त्यांच्या जाहिराती असायच्या, असे म्हटल्या जाते कि माणिकचंदची जाहिरात आल्यानंतर सकाळ सारखे वृत्तपत्र देखील प्रसंगी महत्वाची बातमी बाजूला सारून रसिकलाल यांच्या या जीवघेण्या जाहिरातींना प्राधान्य देत असे. विशेषतः गणेशोत्सवात पुणे मुंबईत असे एकही मोठे मंडळ नसायचे ज्यांचा माणिकचंदच्या जाहिराती, होर्डिंग्स लावण्यासाठी आटापिटा नसे, आम्ही मराठींनी या अशा अमराठी शेटजींचे केवळ क्षणिक धनासाठी स्वतःला विकून मोकळे व्हायचे, चुकीचे आहे. त्याकाळी गमतीने असे म्हटल्या जायचे कि गणपतीसमोर माणिकचंदचे होर्डिंग्स बघून कदाचित एखाद्या दिवशी साक्षात गणपती प्रकट होऊन माणिकचंदची पुडि मागून मोकळा होईल…
आमचे मित्र अभय देवरे यांनी धारिवाल यांच्या जाण्याने एके ठिकाणी फार छान लिहून ठेवले आहे. ते लिहितात, केवळ प्रचंड संपत्ती मिळविली त्यातली चिमूटभर दान केली म्हणून धारिवाल यांची पापातून सुटका झाली असे होत नाही. गुटखा व्यसनाचे जे शेवटचे ठिकाण कर्करोग, त्या रोगाच्या वेदना नेमक्या रसिकलाल यांनाही व्हाव्यात हा परमेश्वरी योगायोग आहे. आज समाजातल्या संवेदना क्षीण झालेल्या आहेत धारिवाल यांच्या निधनाची बातमी देतानाही जणू आर्थिक हितसंबंध जोपासल्या गेले म्हणजे रसिकलाल कर्करोगाने गेले तरी काही वृत्तपत्रांनी ते मधुमेहाने किंवा प्रदीर्घ आजराने गेले, असे लिहिले. विशेष म्हणजे त्यांनी उभारलेल्या गुटक्याच्या व्यवसायातील
साम्राज्याचा एकानेही उल्लेख केला नाही वरून सुप्रसिद्ध उद्योगपती असे लिहून आम्ही कसे नालायक, पुण्यातल्या राज्यातल्या अनेक बृत्तपत्रांनी दाखवून दिले. वा अभयजी, छान अंजन घातले तुम्ही…
तेच सुनील तटकरे यांच्याबाबतीत वाटले, तटकरे आणि धारिवाल वेगळ्या वृत्तीचे आहेत असे वाटत नाही, १९९० पर्यंत मोटार सायकलवर फिरणाऱ्या सुनील तटकरे यांच्या महालाचे फोटो समग्र मध्ये टाकून मधुकर भावे सारखे बुजुर्ग पत्रकार त्यांचे उदात्तीकरण करून मोकळे होतात वरून हेच भावे जेव्हा लिहितात कि हे राज्य आणि हे तखत उलटवून टाकेपर्यंत जिद्दीने महाराष्ट्रात फिरणारे सुनील तटकरे अग्रभागी राहून फिरतील आणि त्यांचा एक मोठा शपथविधी महाराष्ट्र काही काळानंतर पाहणार आहे, हि अशी वाक्ये वाचल्यानंतर भावे यांच्या या अशा विकाऊ वाटणाऱ्या लेखनावर लेखणीवर पान खाऊन थुंकावे…
भावे लिहितात, पुरोगामी महाराष्ट्र आणि हा पुरोगामी देश चुकीच्या लोकांच्या हातात गेला आहे, हे असे लिहीणार्या भावेंची हिम्मत असेल तर त्यांनी मला येऊन भेटावे तटकरे कसे आणि किती नालायक कसे भ्रष्ट आणि नीतीभ्रष्ट दाखवून मी मोकळा होईल, आणि हे भावे यांना ठाऊक नाही का किंबहुना हेच तटकरे नालायक कसे हे आम्ही ज्या भावे यांच्या लेखणीतून त्या लोकमत मध्ये वाचलेले आहे तेच भावे नेमक्या कोणत्या लोभापायी तटकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढावा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या परंपरांना समृद्ध करावे, लिहितात, मी हुकूमशाह असतो तर भावे यांना फटके मारण्याची सजा सुनावली असती…मधुकर भावे किंवा समग्र मधले तत्सम लेखक, रसिकलाल धारिवाल हे विषय येथेच पूर्ण झालेले नाहीत. त्यावर आणखी खूप खूप काही…
पत्रकार हेमंत जोशी