मंत्रिमंडळ विस्तार : पत्रकार हेमंत जोशी
केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे. सतत धडपडावे, एकदा पडू, दोनदा पडू पण एकदा का यशाचे गमक साधले कि मागे वळून पाहण्याची गरज पडत नाही जर हाती घेतलेले काम योग्य असेल तरच. मागेही मी एकदा तुम्हाला सांगितले होते कि मुंबईतले मराठी केवढे कर्मदरिद्री आहेत, विशेषतः तरुणांना काहीही वेगळे करून दाखवायचे नसते, सार्वजनिक वर्गण्या जमा करून दहा दिवस गणपती मंडपाच्या आवारात जुगार खेळणे असले उद्योग मात्र त्यांना झक्कास जमतात, त्याच फायदा परप्रांतीय घेतात, येथे ते खिसे उलटे करून येतात आणि
जातांना स्वतःचे खिसे भरभरून जातात आणि आपले रिकामे करून…
आमच्या सांताक्रूझ पश्चिमेला परप्रांतीय म्हणजे फक्त आणि फक्त उत्तर भारतीय भाजीवाले भल्यापहाटे अतिशय स्वस्तदराने घाऊक मंडईतून भाजी विकत घेतात आणि येथे तीच भाजी कितीतरी अधिक पटीने विकून मालामाल होतात. दादर घाऊक मंडईत जर त्यांना फुलगोबी २० रुपये किलो दराने विकत मिळत असेल तर तीच फुलगोबी ते मुंबईत सर्वत्र साधारणतः ६० ते ८० रुपये किलो या दराने विकून मोकळे होतात आणि हे असे कितीतरी अधिक पट दर ते सर्वप्रकारच्या भाज्यांमधून आकारून मोकळे होतात. अलीकडे एक गम्मत झाली, एका मराठी माणसाने भाजीचा टेम्पो दर दिवशी सकाळी आमच्या परिसरात उभा करून त्यांच्यापेक्षा स्वस्त दराने भाजी विकायला सुरुवात केलेली आहे, गम्मत म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून त्याची भाजी पुढल्या दोन तासात ग्राहक संपवून मोकळे होतात आणि त्यानंतर या परप्रांतीयांना आता त्यांची विनाकारण महागडी भाजी विकावी लागते आहे. मी म्हणतो, मुंबईतल्या प्रत्येक गल्लीत हे असे घडले तर, चार मराठी तरुण एकत्र येऊन जर हे साधे सोपे काम त्यांनी हाती घेतले तर आम्ही मराठी उद्योग धंद्याला लागू आणि परप्रांतीयांच्या ढुंगणावर लाथ मारून मोकळे होऊ…
बघा जो करून दाखवतो ते केवढा पुढे निघून जातो. राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्र्यांवर म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर याआधी लिहिलेले तुम्ही वाचलेले आहेच, हा माणूस सतत दररोज दरदिवशी न थांबता न थकता १८-२० तास जे लोकांना देतो, परवा त्यांच्या ते जीवावर बेतते कि काय असे क्षणभर वाटून गेले पण लाखोंचा पोशिंदा जगायलाच हवा, देवाला देखील वाटले असावे म्हणून त्यांना अचानक हृदयाशी संबंधित आलेले दुखणे, त्यातून ते क्षणार्धात बाहेर आले, हा लेख तुमच्या हाती पडेपर्यंत बावनकुळे नेहमीसारखे धडपडायला लागलेही असतील. गडकरी, बावनकुळे, मुनगंटीवार, रंजीत पाटील किंवा फडणवीस हेही विदर्भातले जे दिवस रात्र झगडताहेत विदर्भासाठी, राज्यासाठी, देशासाठी आणि त्याच विदर्भातले पोटे किंवा आत्राम असे राज्यमंत्री आहेत कि त्यांना स्वतःची ओळख द्यावी लागते, आम्हीही मंत्री आहोत म्हणून. अलीकडे मी आणि एक अत्यंत बुजुर्ग पत्रकार मुख्यमंत्र्यांच्या लॉबीमध्ये सहजच फिरत असतांना त्या पत्रकाराने एक बलदंड आडदांड पैलवान माणसाकडे बोट दाखवत विचारले, हेच कारे ते अमुक तमुक पैलवान, ज्यांना अलीकडे पुरस्कार मिळालाय, मी हसून म्हणालो, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, ते सद्गृहस्थ ना पैलवानआहेत ना जादूगार ते आहेत या राज्याचे मंत्री, राज्यमंत्री पोट पुढे आलेले पोटे पाटील, प्रवीण पोटे पाटील नंतर हसता हसता मी त्याला असेही म्हणालो, उद्या समजा तुला ओलांडून राज्यमंत्री विद्या ठाकूर पुढे निघून गेल्यात तर तू हेही म्हणशील याच कारे त्या फडणवीसांच्या मुलीच्या जन्माच्या वेळी ऐनवेळी दाईणबाई म्हणून धावून आल्या होत्या. जेव्हा मंत्री म्हणून संधी चालून येते तेव्हा तुम्ही लोकांसाठी धावायला हवे पळायला हवे आणि मोठे होऊन म्हणजे संधीचा फायदा घेऊन राज्याचे उभरते नेते म्हणून पुढे यायला हवे पण विद्या ठाकुरांसारख्या संधिप्राप्त मंत्र्यांना राज्यमंत्र्यांना राज्य गेले खड्ड्यात, स्वतःचे घर तेवढे भरून घेऊ या, असे जर वाटत असेल तर सेना भाजपाला १५ वर्षानंतर मिळालेली हि सुवर्णसंधी फारतर आणखी दोन वर्षे उपभोगता येईल नंतर सारे संपून जाईल, बसतील हात चोळत…
वर विदर्भातल्या मंत्र्यांचा उल्लेख करतांना मला नेमके हेच सांगायचे आहे कि जे उल्लेख केलेल्या कामसू मंत्र्यांना जमते ते वय वर्षे केवळ २८ असलेल्या अंबरीश राजे अत्राम यांना का जमू नये पण दुपारी चारच्या आधी उठायचे नाही आणि उठल्यानंतरही काही करायचे नाही असे जर त्यांनी ठरविलेच असेल तर राज्यमंत्रीपद टिकणे दूरचे, त्यांचे लग्नही होईल कि नाही याची चिंता म्हणे अलीकडे त्यांच्या जवळच्यांना वाटू लागलेली आहे. अतिशय देखणा, प्रचंड बुद्धिमान, परदेशातून शिकून आलेला त्याचवेळी गडचिरोली जिल्ह्याचा तंतोतंत अभ्यास असलेला हा स्थानिक राजा येथे मुंबईत या राज्यात राज्यमंत्री म्हणून पूर्णतः अयशस्वी ठरला आहे, ना ते मंत्रालयातील कार्यालयात असतात ना ते एखाद्या गरजूला मंत्रालयासमोरील त्यांच्या बंगल्यात उपलब्ध असतात, त्यांचे कार्यालय असो कि निवासस्थान, तेथे केव्हाही फेरफटका मारा, असे वाटते आत्ताच म्हणजे थोड्या वेळापूर्वी या घरातले कोणी गेले आहे वाटते, थोडक्यात स्मशानवात शांतता, एवढेच काय ते वर्णन करता येईल. चालून आलेल्या संधीचा फायदा घेणे त्यांना कधीही न जमल्याने, मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांचे नाव गच्छंतीच्या यादीत प्रथम क्रमांकावर असल्याचे माझी पक्की माहिती आहे. एक मंत्री तर असे आहेत कि त्यांनी पैसे जमा करण्यासाठी आणि ऐय्याशी करण्यासाठी म्हणे थेट मंत्रालयासमोरच एक सदनिका भाड्याने घेऊन ठेवलेली आहे, आजूबाजूचे म्हणजे त्या इमारतीतले त्यांचे रंगीले वर्तन छान रंगवून सांगतात. आपल्या खात्याची वाट लावून ठेवलेले हे महाशय आता बायकोनेही ओवाळून टाकलेले आहेत, माझा तेवढा मंगळसूत्राएवढा तरी अधिकार ठेवा, तिने त्यांना तसे सांगून टाकलेले आहे.अर्थात मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे आहे. अद्याप काहीही ठरलेले नाही कारण कोणत्याही राजकीय पक्षाचे श्रेष्ठ नेते हे मोकाट सोडविलेल्या रेड्यासारखे असतात, मोकाट सोडलेला रेडा जसा त्याच्या मनात आले रे आले कि म्हशीने त्याच्यासमोर ढुंगण करून उभे राहायचे असते ते तसे या पक्षश्रेष्ठींचे असते, त्यांच्या मनात आले रे
आले कि रात्री बारा वाजता देखील ते मंत्रिमंडळ फेरबदल करून मोकळे होतात, येथे देवेंद्र असोत कि अन्य कोणीही, त्यांनी फक्त आदेशाची वाट पाहायची आहे आणि दूरदूरपर्यंत मंत्री मंडळ फेरबदलाचे संकेत दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांना मिळालेले नाहीत, हीच वस्तुस्थिती आहे….
पत्रकार हेमंत जोशी