मंत्र्यांची समांतर यंत्रणा : पत्रकार हेमंत जोशी
राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री यातले काहीही एक झाल्यानंतर आपली कामे अधिक सुटसुटीत जलद वेगाने व्हावीत म्हणून हे तिघेही पदाची शपथ घेतल्यानंतर स्वतःच्या कार्यालयात मर्जीतले शासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी आवडीच्या उत्तान स्त्रिया, चपराशी, द्वारपाल, कार्यालयातील स्टाफ, अशासकीय माणसे, आवडीचे स्वीय सहाय्यक आणि खाजगी सचिव अगदी खानसामापासून तर थेट कार चालकापर्यंत यंत्रणा मोठ्या वेगाने उभी करतात नव्हे शपथविधीच्या आधीच नेमके कोण काय करेल किंवा कोणाकोणाला सभोवताली ठेवायचे हे या तिघांचे ठरलेले असते आणि मंत्रालयात शपथविधीनंतर पहिल्यांदा पाय ठेवतांना हि यंत्रणा त्यांच्या सोबतीनेच चालत येते जसे एकनाथ शिंदे यांनी जेव्हा मंत्रालयात पहिल्यांदा पाऊल ठेवले तेव्हाच त्यांच्या संगतीला आजचे त्यांचे अतिशय वादग्रस्त स्वीय सहाय्यक अजय अशर आणि सचिन जोशी त्यांनी सोबतीने घेतले होते अर्थात आजतागायत असे कितीतरी सचिन जोशी आणि अजय आशर छाप थर्डग्रेड स्वीय सहाय्यक विविध रूपात स्वरूपात या मंत्रालयात अवतारल्याने आम्ही मागचे पुढे चालू, पद्धतीने या प्रकाराकडे बघत असतो…
हा विषय येथे यासाठी कि अलीकडे मुख्यमंत्री कार्यालयातले मुख्यमंत्र्यांनी आपल्यासंगे आणलेले अशासकीय अधिकारी श्रीमान कौस्तुभ धवसे हे तद्दन नालायक कसे हे दाखविण्याचा काही वाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी प्रकार घडवून आणला, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय नेमके कसे त्यांची समांतर यंत्रणा काय काम करते त्यावर येथे काही सांगावेसे वाटते आहे, नेमक्या वस्तुस्थितीवर लिहावेसे वाटले म्हणून हा विषय येथे लिहायला घेतला आहे, हा विषय येथे महत्वाचा वाटण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे फडणवीसांच्या मंत्र्यांवर राज्यमंत्र्यांवर गेल्या तीन वर्षात त्यांना वाटून दिलेल्या खात्यांवरून सतत टीका होत आलेली आहे पण जी खाती मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे ठेवून घेतलेली आहेत त्या खात्यातील कामकाजांवर फार टीका केल्या गेली नव्हती पण कौस्तुभ धवसे हे टार्गेट झाल्याने थेट मुख्यमंत्र्यांवर जणू हा निशाणा साधल्या गेलाय, मम् मनाला वाटले म्हणूनही त्यावर येथे नेमके काय, तुम्हाला सांगावेसे वाटले…
हे लिखाण वाचतांना उगाचच मूड गंभीर करवून घेऊ नका, विषय थोडा वात्रट आणि किचकट आहे पण मी हे सारे अगदी सोपे करून तुम्हाला सांगणार आहे म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांचे कार्यालय नेमके कसे अगदी खुबीने युक्तीने नक्की तुम्हाला सारे सांगणार आहे. एक सांगू का, आपण जेव्हा अमुक एखाद्या घराचा पत्ता विचारतो तेव्हा त्या घराच्या आसपास राहणाऱ्यांना किंवा तुमच्या इमारतीतल्या लोकांनी अगदी तुमचा पत्ता सांगतानाही कसे आनंदाने सांगायला हवे आणि हेच तुमचे यश असते. मी आमच्या घरातल्यांना नेहमी गंमतीने म्हणतो कि आपला पत्ता विचारला कि आपल्याला ओळखणारे त्यांना मारत मारत आपल्या घरी आपल्या इमारतीत आणून सोडत असतील, अर्थात जेव्हा केव्हा माझ्या घरातले विचित्र वागतात तेव्हा. पुढे हेही सांगतो नशीब यदु जोशी आपल्या तळमजल्यावर राहायला नाही अन्यथा त्याला पत्ता विचारल्यानंतर त्याने आधी नेहमीसारखा मख्ख चेहरा करून, कोण हेमंत जोशी म्हटले असते नंतर विचारणाऱ्याला आधी शिव्या दिल्या असत्या नंतर काठीने मारून वरच्या मजल्यावर पाठवले असते, अर्थात हि गम्मत आहे…
थोडक्यात अमुक एखाद्या माणसाचे नाव ओठांवर तोंडावर येते तेव्हा म्हणजे ते नाव घेतांना घेणाऱ्याला मनापासून आनंद झाला तर आपण आयुष्य जिंकले असे म्हणता येईल, जाऊद्या,माझा पार भय्यू महाराज होतोय, उगाचच बोअरिंग ज्ञान पाजतोय. तर, जेव्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या कार्यालयात त्यांनी समांतर यंत्रणा उभी केली, त्यांच्या जवळचे त्यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात आणून बसविले. संघ मुख्यालयाच्या सूचनेवरून त्यांनी संघ भाजपा चे स्वयंसेवक, कार्यकर्ते, नेते आणि मंत्रालय यांच्यात समन्व्य राखण्यासाठी, आवश्यक ती कामे मार्गी लावण्यासाठी फडणवीसांनी दस्तुरखुद्द मोहन भागवत यांच्या सूचनेनुसार श्रीकांत भारतीय या बोलक्या भारदस्त व्यक्तिमत्व लाभलेल्या संघ स्वयंसेवकाला मुख्यमंत्री कार्यालयात मानाची केबिन देऊन आणून बसविले. श्रीकांत भारतीय यांची मुख्यमंत्री कार्यालयातली उठबैस किंवा त्यांचे मंत्रालयात फिरणे कधीही वाईट अर्थाने चर्चेचे ठरले नाही, आपण बरे आपले काम भले, पद्धतीने ते या तीन वर्षात वावरत वागत आल्याने वाईट अर्थाने ते नजरेत भरावे असे निदान आजतागायत तरी घडलेले नाही..
याशिवाय राजकीय महत्वाकांक्षा असलेले लातूरचे पण भाजपा मुंबई मुख्यालयात फडणवीस मुख्यमंत्री होण्याआधी कार्यालयाची जबाबदारी पेलणारे अभिमन्यू पवार, पत्रकार रविकिरण देशमुख, कौस्तुभ धवसे, ओमप्रकाश शेट्ये, प्रिया खान, निधी कामदार, सुमित वानखेडे, केतन पाठक, या साऱ्यांची बाहेरून थेट आत म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयात वर्णी लागली, पुढे नेमके हे सारे कसे घडले, वाढले, वागले, फडणवीसांनी त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्या त्यात कोण ठरले यशस्वी कोण ठरले अपयशी आणि कोण झाले मालामाल उर्वरित भाग क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी