मंत्र्यांची समांतर यंत्रणा २ : पत्रकार हेमंत जोशी
मंत्रालय प्रेस रूम मध्ये नेहमीचे बातम्यांसाठी धावपळ धडपड करणारे वार्ताहर, त्यातला एखादा गायब दिसला कि मन खट्टू होते. अलीकडे पत्रकार अभिजित मुळे याच्या एका खास वार्ताहर मित्राचे दर्शन होईनासे झाले आहे, चौकशी केली असता असे कळले कि हे महाशय पुण्यातल्या एका जगप्रसिद्ध आयर्वेदिक तज्ञाचे औषध घेताहेत, ज्या गोळ्या त्यांना मधातून सकाळी एक दुपारी एक आणि सायंकाळी एक अशा घ्यायच्या होत्या, या वार्ताहर महाशयांनी म्हणे, ‘ मधातून ऐवजी मद्यातून ‘ असे वाचल्याने घोटाळा झाला आहे, स्वाभाविक आहे, सकाळ दुपार संध्याकाळ मधाऐवजी मद्य, कसे बरे त्यांचे मंत्रालयाकडे फिरकणे होईल, अर्थात या वार्ताहर साहेबांचे हे असे नेहमीचेच, एका दुकानावर, येथे जुलाबाच्या गोळ्या मिळतील, लिहिलेले होते, यांनी येथे गुलाबाच्या गोळ्या मिळतील, वाचले आणि ३/४ एकदम पाकिटे घेऊन त्यांनी त्या गोळ्या चोखायला केली कि सुरुवात, तेव्हाही हे असेच खूप दिवस गायब होते…
मुख्यमंत्री कार्यालयातील समांतर अशासकीय यंत्रणा, हा तसा फार चघळण्याचा,चावण्याचा, चर्चेचा विषय नाही, सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या सहाव्या माळ्यावरील माहिती आणि जनसंपर्क विभागात बाहेरचाही एक घ्यावा असे दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी ठरविले तेव्हा त्यांच्या नजरेसमोर दोन नावे होती, लोकमत चे नागपुरातून तडकाफडकी मुंबईत पाठविल्या गेलेले यदु जोशी आणि मुंबईचे रविकिरण देशमुख, पैकी यदु जोशी यांना घ्यावे असे फडणवीसांना नक्की वाटले होते पण त्यांना का घेऊ नये, यावर जेव्हा घरी आणि जवळच्या मित्रांनी फडणवीसांना पटवून दिले, यदु जोशी हे नाव मागे पडले आणि रविकिरण यांच्या नावावर जेव्हा शिक्का मोर्तब झाले तेव्हा रविकिरण ज्यांना आपले जवळचे सहकारी मित्र सखे समजत होते त्यांच्याही पोटात पुढले काही दिवस जाम दुखले, आता हा रविकिरण आपल्याला डोईजड ठरेल असे अनेकांना विनाकारण वाटून गेले, पुढे घडलेलंही तसेच, मुख्यमंत्र्यांच्या फार पुढे पुढे न करता, कामास काम, पद्धतीने रविकिरण वागत आले, दिलेली टाकलेली जबाबदारी व्यवस्थित आजतागायत पार पाडत आल्याने त्यांच्याविषयी सुरुवातीला विनाकारण निर्माण झालेली असूया पुढे आपोआप लयास गेली, सर्वाधिक अस्वस्थता शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यलयात काम करणारे किंवा मुख्यमंत्री कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्यात इच्छुक असलेल्यांमध्ये होती पण रविकिरण यांचे बॅलन्स वागणे आणि कामास काम पद्धतीचे वर्तन, आजतागायत ते त्यांच्या या खुबीने गोडीगुलाबीने वागण्यातून ना कधी वादग्रस्त ठरले ना कधी कोणाला डोईजड ठरले, फडणवीसांचा रविकिरण यांना घेण्याचा तो कठोर निर्णय पुढे नक्की कौतुकास पात्र ठरला…
मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यालयात जी समांतर अशासकीय यंत्रणा उभी केली त्यात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे सुमित वानखेडे. जेवढ्या अमृता फडणवीस देवेंद्र यांच्या संपर्कात नसतात तेवढे अधिक त्यांचे सहाय्यक म्हणून सुमित साक्षात सावलीसारखे मुख्यमंत्री फडणवीसांच्या साथीला असतात. सुमित यांची लोकप्रियता झपाट्याने वाढण्याचे नेमके कारण कोणते, असे तर अजिबात नाही कि सुमित रात्री नित्यनियमाने फडणवीसांच्या कपाळाला झंडू बाम लावून देतात किंवा फडणवीसांचा मूड नसला कि शीघ्रकवी आठवलेंसारख्या त्यांना कविता ऐकवतात, भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला पटापट मिठी मारतात किंवा जागच्या जागी उंचच उंच उडी मारून दाखवतात, भेटणाऱ्या प्रत्येकाचे पहाडी आवाजात हसून गाऊन स्वागत करतात, अहो, त्यांचे पहाडी हसणे त्यांच्या बायकोने बघितलेले नाही तेथे भेटणारे भेटायला येणारे कोण, सुमित फारतर स्माईल देतात, पत्नीला आणि इतरांनाही म्हणजे लोकांना एक्स्ट्रॉ खुश करण्यासाठी सुमित वेगळे असे काहीही करीत नाहीत तरीही ते नाकापेक्षा मोती जाड ठरलेले नाहीत, ते एकाचवेळी सर्वांना भावतात म्हणजे समोरचा सिनियर मोस्ट प्रशासकीय अधिकारी असो कि कार्यालयातील चपराशी असो, साक्षात अनिल किंवा मुकेश अंबानी असोत कि नागपुरातील मुख्यमंत्र्यांचे कोणीही कितीही जवळचे असो, मंत्री राज्यमंत्री आमदार खासदार भाजपा नेते जे ते सुमित वानखेडे हे नाव कौतुकाने आणि अलीकडे आदरानेही घेतात, सुमित मुख्यमंत्र्यांच्या आसपास नसलेत तर भेटायला आलेले अस्वस्थ नाराज होतात कारण अतिशय सोपे साधे सरळ आहे, सुमित कामास काम ठेवतात, येथे आपण स्वतः मोठे होण्यासाठी आलेलो नाही तर आपल्या या लाडक्या नेत्याला आणखी आणखी मोठे होतांना सुमित यांना बघायचे असल्याने नेमके कामास काम ठेवायचे, डोक्यावर बर्फ आणि तोंडावर साखर ठेवून दरक्षणी आपल्यामुळे मुख्यमंत्री कसे तणावमुक्त राहतील हि पोक्त सशक्त भूमिका सुमित वानखेडे यांनी अगदी पहिल्या वाहिल्या दिवसापासून घेतल्याने ते फडणवीसांचे एकाचवेळी हनुमान आणि लक्ष्मण ठरले आहेत, मुख्यमंत्र्यांचा विश्वासू माणूस कसा असावा हा आदर्श जणू त्यांनी इतरांसमोर ठेवला आहे,
इतिहास याची नक्की नोंद घेईल.मुख्यमंत्री आणि इतर सारे म्हणजे घरातले भेटणारे किंवा भेटायला येणारे जगातले सारे यांच्यात महत्वाचा दुवा ठरले आहेत सुमित कारण ते समन्वयाची महत्वाची भूमिका अतिशय जबाबदारीने आणि खुबीने पार पडतात, थकले आहेत, रागावले आहेत, डोईजड ठरले आहेत, खोटे बोलताहेत, व्हेस्टेड इंटरेस्ट ठेवताहेत असे कधी त्यांच्या बाबतीत घडत नाही, घडलेले नाही थोडक्यात सतत परिश्रम हेच यांच्या यशाचे द्योतक, महत्वाचे म्हणजे सुमित वानखेडे हे ‘ देवेन मेहता ‘ नाहीत कि जे मुख्यमंत्र्यांचे स्वतः बरोबरचे फोटो लोकांना दाखवत फिरतील आणि कामे करवून घेतील…क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी