पोरकट पत्रकारिता २ : पत्रकार हेमंत जोशी
एखाद्या ठिकाणी ठेवलेल्या लाकडांवर कोणीही पाय देऊन जाऊ शकतो पण एकदा का हि लाकडे पेटली, पेटविल्या गेली कि त्यावर पाय देऊन जाण्याची कोणाचीही हिम्मत नसते. हे असेच पेटलेल्या लाकडासारखे पत्रकारांचेही जीवन असावे, म्हणजे मुळात तेजस्वी असलेल्या पत्रकारांनी आपले पराक्रम लपवून, स्वार्थापोटी झाकून ठेवू नयेत. आपल्या लेखणीचा खोटा मान सन्मान मिळविणे म्हणजे एखाद्या वेश्येने तिच्या आयुष्यात आलेल्या प्रियकराला मी व्हर्जिन आहे, सांगण्यासारखे…
पत्रकारिता हे निश्चित स्वरूपाचे समाधान मिळवून देणारे साधन आहे, तरीही आमच्यातले बहुतेक हे निश्चित स्थान सोडून अस्थिर गोष्टींच्या साधनांच्या मागे सतत का धावतात, कळत नाही. मला आजवरच्या पत्रकारितेतील आयुष्यात अनेकदा अशा संधी साधून आल्यात कि मी जर पत्रकारितेशी संबंधित असलेले व्यवसाय सुरु केले असते तर दिवसाकाठी लाखो रुपये मिळवून मोकळा झालो असतो. समजा मी पत्रकारितेचा उपयोग करून एखादया बांधकाम खात्यात कंत्राटदार करणाऱ्याला हाताशी धरून जर कंत्राटदारी केली असती तर मला वाटते आज मी या राज्यातला मोठा कंत्राटदार म्हणून नावारूपाला आलो असतो पण ते न करता, वाढत्या वयाच्या मुलांसाठी, वाढत्या कुटुंबासाठी समांतर अशा उद्योगाचे तेही on मेरिट असे जाळे उभे केले ज्याचा दूरदूरपर्यंत पत्रकारितेशी संबंध नाही किंबहुना मी आणि पत्रकारितेतील पुत्र विक्रांत त्या व्यवसायात फारसे लक्षही घालत नाही,असा व्यवसाय आधी जगभर फिरून त्याचा सखोल अभ्यास केला नंतर सुरु केला. त्रास झाला. पण आज समाधानी आहोत, खुश आहोत आणि उद्या हा व्यवसाय जरी एखाद्या कारणाने दूर गेला तरी मुलांनी त्यांच्या बायकांनी उच्च शिक्षण घेतले असल्याने लाथ मारू तेथे पाणी काढू, पद्धतीने जगण्याचे तंत्र त्यांना शिकवून मोकळा झालो आहे. आमची हि अशी सततची खतरनाक पत्रकारिता, केव्हा कोणते संकट उभे ठाकेल, सांगता येत नाही म्हणून तशी मानसिकता मनाशी ठेवूनच दररोज बाहेर पडतो, कोणतेही संरक्षण न घेता फिरत राहतो. आम्ही एकत्रितपणे उत्पन्नाचे स्रोत हळूहळू उभे केले त्यासाठी तब्बल ३५-३६ वर्षे मेहनत घेतली, त्यानंतर आज थोडेफार यश चालून आलेले आहे. जे आपल्या वाटेला आलेले आहे त्यात इतरही नातेवाईकांना प्रसंगी मी स्वतः अर्धपोटी राहून वयाच्या १८ व्या वर्षांपासून या कानाचे त्या कानाला कळू न देता, थोडे फार काढून देत आलो आहे, मी फार वेगळे केले असे नाही, माझे ते कर्तव्य होते, मी घरात मोठा होतो, मोठा आहे, मोठेपणाने जगणे आवश्यक असते. घरातल्याची रेषा पुसण्याचा कधी प्रयत्न केला नाही, आपली रेषा मात्र मोठी करण्याचा नेहमी कायम सतत आमचा प्रयत्न असतो. एक मात्र नक्की, रावण मग तो माझ्या पोटी जरी जन्माला आलेला असेल तर माझी लेखणी रुपी तलवार प्रसंगी मी पोटच्या मुलांवर देखील चालवून मोकळा होईल. माफ करा, फार व्यक्तिगत येथे लिहिल्या गेले आहे पण मोह देवाला सुटत नाही मी तर फार सामान्य माणूस आहे, आमच्या कुटुंबातल्या नातेवाइकातल्या अनेकांनी तर अनेकदा आजवर हेच सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे कि हेमंत हे चांगले व्यक्तिमत्व नाही, अर्थात तेही सांगून सांगून थकले असावेत कारण आमच्या नातेवाईकांनी जेव्हा मला माझ्या व्यक्तिगत कुटुंबाला जवळून एकदा नव्हे अनेकदा अनुभवले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, अरे, हेमंत यांचे संसकार फार वेगळे आहेत….
अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो. आमची हि अशी धडाकेबाज म्हणजे कोणा कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारी लेखणी त्यामुळे सुरुवातीला अनेक माझ्या जवळ यायला किंवा माझ्याशी मैत्री ठेवायलाही घाबरायचे, पण जसजसा माझा उभ्या राज्यात प्रचंड मित्र परिवार वाढला मग हळू हळू जवळ आलेल्यानीच इतरांना सांगितले, जे तुम्हाला दुरून वाटते ते हे व्यक्तिमत्व नाही, प्रसंगी या जोशी कुटुंबाची इतरांचे भले करण्यासाठी, भले साधण्यासाठी जीवही देण्याची मानसिकता असते. पण हा सारा प्रवास अंगावर शहरे आणणारा होता विशेषतः काही नातेवाईकांनीच दिलेला त्रास, बापरे, मी लेचापेचा असतो तर अक्षरश: मला आत्महत्या करावी लागली असती, कुठलेतरी पुण्य आजवर आड आले, पुढले माहित नाही. आनंद याचा कि माझ्यापासून काहींनी हिरावून नेलेले, दूर केलेले नातेवाईक आता पुन्हा एकदा आमच्याकडे परतले आहेत आणि हे माझ्यासाठी फार मोठे यश आहे. पैसे आणखीही मिळविता येतील पण चांगले नातेवाईक आणि मित्र मिळविणे, सांभाळणे, जोपासणे तसे कठीण, पण आईवडिलांची पुण्याई आणि परमेश्वराचे आशीर्वाद, दुःख आता थोडे हलके झालेले आहे….
पत्रकार हेमंत जोशी