फडणवीसांचे कारनामे : पत्रकार हेमंत जोशी
हा अंक जेव्हा तुमच्या हातात पडेल तेव्हा मी, आम्ही, हिवाळी अधिवशेना निमित्ते नागपुरात थंडीने कुडकुडत असू म्हणून हा लेख हे लिखाण आपले नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर करण्याचे आम्ही ठरविले आहे. समजा अधिवेशन पुण्यात असते तर अनेक मुख्यमंत्र्यांना खिशात ठेवणार्या अविनाश भोसलेंवर केले असते, रत्नागिरीत असते तर उदय धावपळकर-सामंत यांच्यावर केले असते. परळी वैजनाथ परिसरात असते तर विधान भवन परिसरात तोडपण्या करून एखादे प्रकरण पटलावरून कसे गायब करायचे त्यावर पुरावे देऊन मोकळे झालो असतो थोडक्यात अधिवेशनाचे स्थान जेथे तेथले वैशिष्ट्य लिहून मोकळा झालो असतो, अधिवेशन नागपूर येथे असल्याने या राज्याचे अमिताभ, सध्याचे शरद पवार म्हणजे सध्याचे लाडके आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व-मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावर,आलेल्या अनेक फर्माईशीमुळे लिहून मोकळा होतोय, देवेन्द्रही न आवडणाऱ्या काही बोटावर मोजण्याइतक्या मंडळींनी हा लेख, हे लिखाण गॉड करून घ्यावे. आपण आपल्या चौफेर सुटलेल्या बायकोची नव्हे तर शेजारच्या ज्या व्यक्तीला,(दुसऱ्याच्या ताटातला लाडू नेहमी मोठा दिसतो पद्धतीने ) काकडी चवळीची शेंग लाभलेली आहे तिची पप्पी घेतोय असे दृश्य नजरेसमोर ठेवून हे मुख्यमंत्री फडणवीसांचे सांगितलेले आत बाहेर, मीठे करून घ्यावे, आमचे हे आवाहन कृपया स्वीकारावे….
देवेंद्र फडणवीस नेमके कसे हे अगदी सुरुवातीला नेमक्या शब्दात सांगायचे झाल्यास, आमच्या ओळखीच्या एका ‘ सुरेख पुणेकर ‘ बाईचा किस्सा येथे सांगायलाच हवा. आपल्या मुलांवर कुठल्याशा निमित्ते झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी या सुरेख पुणेकर बाई जेव्हा न्यायालयात लढत होत्या, तेथल्या न्यायाधीशांनी त्यांना विचारले, आपल्या पहिल्या मुलाचे नाव काय, तेव्हा त्या म्हणाल्या राजू. दुसऱ्याचे न्यायाधीशांनी विचारताच त्या म्हणाल्या, राजू. तिसर्या अपत्याचे राजू, चौथ्याही अपत्याचे राजू, पाचव्या अपत्याचे नाव देखील त्यांनी जेव्हा राजू सांगितले, न्यायधीश चिडून विचारते झाले, साऱ्यांची नावे राजू, मग या मुलांना हाक मारतांना नेमके तुम्ही काय करता…? त्यावर सुरेख असलेल्या पुणेकर बाई म्हणाल्या, फार सोपे आहे, मी त्या मुलांना त्यांच्या त्यांच्या आडनावाने हाक मारते, मोठ्याला राजू मोहिते पाटील, दोन नंबरला राजू लोणीकर, तिसऱ्याला राजू शिंदे सोलापूरकर, तिसऱ्याला राजू पाचपुते, पाचव्याला राजू क्षीरसागर, वर लाजून त्या म्हणाल्या, सहावा पोटात आहे, यावेळी माझ्या मनात थोडा गोंधळही आहे, नेमके लक्षातच येत नाही, याचे आडनाव काय असेल म्हणजे पटेल गोंदियावाले कि पाटील कोल्हापूरवाले कि राजू रावसाहेब जालनावाले कि राजू चव्हाण नांदेडकर. असे ऐकलेय कि न्यायधीश अद्याप त्यादिवसापासून कोमातच आहेत…
आपल्या या मुख्यमंत्र्यांचे देखील हे असेच म्हणजे त्यांचे नेमके वर्णन करायचे तरी कसे, निर्व्यसनी फडणवीस म्हणायचे कि उत्तम वक्ते फडणवीस म्हणायचे, सकाळी तीन तीन वाजेपर्यंत देशासाठी राज्यासाठी वाहून घेणारे फडणवीस असा उल्लेख करायचा कि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडविणारे बदलविणारे मुख्यमंत्री असा उल्लेख करून मोकळे व्हायचे, नवी दृष्टी लाभलेले महाराष्ट्राला आधुनिकतेकडे नेणारे आणि संकल्प सोडून तो पूर्णत्वाकडे नेणारे फडणवीस म्हणायचे कि व्यापक दृष्टी आणि दूरदृष्टीने काम करणारे फडणवीस हा असा त्यांचा उल्लेख करायचा, जलयुक्त शिवारासारखे विविध प्रयोग यशस्वी करणारे मुख्यमंत्री असे त्यांना हाका मारायचे कि अमृता फडणवीसांचे राजकारणी असूनही गुड कॅरेक्टर पती असे म्हणून मोकळे व्हायचे, आपला तर पार भेजा फ्राय झालाय, आता वाचकांनो तुम्हीच नेमके सांगावे, फडणवीस यांचे नेमके कसे कोणत्या पद्धतीने नाव घेऊन मोकळे व्हावे…
विरोधकांचे छेद करणारे नेमका वेध घेणारे हे हेच ते मुख्यमंत्री, ज्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या योजनेंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंचाची निवड थेट निवडणूक पद्धतीने करण्याचा धाडसी आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला, अमलात आणला. काय हि दूरदृष्टी, गावपातळीवरचे नियोजन स्थानिक लोकांनी करावे, विकासकामांचे प्राधान्यक्रम त्यांनीच ठरवावे, त्याची अंमलबजावणी आणि लोक सहभाग देखील त्यांच्याच हाती ठेवावा आणि शासनाने निधी उपलब्ध करून देण्यापुरते आपले अस्तित्व ठेवावे अशा वेगळ्या धोरणात्मक विचारांचे निर्णयांचे प्रणेते देवेंद्र फडणवीस येथे मोजक्या शब्दात रेखाटने अशक्य आहे….
सुरुवातीपासून जे देवेंद्र मी बघितले मग ते विद्यार्थी परिषदेचे नेते म्हणून असोत कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निस्सीम स्वयंसेवक म्हणून पायाला भिंगरीलागल्या सारखे एखादे कार्य सिद्धीस नेणारे निष्ठावान असोत, कधी ते नगरसेवक म्हणून बघितले आहेत तर कधी आमदार म्हणून, कधी हेच फडणवीस विधान सभेत विरोधकांच्या तोंडाला फेस आणतांना बघितले आहेत तर कधी भाजपाचे अत्यंत लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष म्हणून व्यस्त असतांना अनुभवले आहेत, आणि आजचे आजवरचे अतिशय प्रामाणिक आणि देशभक्त मुख्यमंत्री म्हणून, एखादे व्यक्तिमत्व किती झपाटल्यागत वर्षानुवर्षे तोच उत्साह कायम ठेवून केवढे म्हणजे आभाळाएवढे काम करू शकते, मला वाटते आजवर जे चार दोन नेते लोकांनी त्या शरद पवार, यशवंतराव चव्हाणांसारखे अनुभवलेत, त्याच रांगेतले आपले हे आजचे मुख्यमंत्रीही, सलाम त्यांच्या अफाट कर्तुत्वाला, आणि हि अशी त्यांची एक पत्रकार असूनही तोंड फ़ाटेस्तो तारीफ करतांना मला याठिकाणी काहीही कमीपणाचे वाटत नाही, जी वस्तुस्थिती आहे, ती मांडतांना त्यात लाज ती कसली?
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी