फडणवीसांचे कारनामे ४ : पत्रकार हेमंत जोशी
डोक्यावर दोन भोवरे असलेत कि मोठेपणी दोन दोन बायका मिळतात, तुमची दोन लग्ने होतात असे आम्हाला लहानपणी हमखास सांगितले जायचे. हट..असे काहीही नसते, उगाचच मोठी माणसे खोटे खोटे सांगून विनाकारण आमच्या आशा पल्लवित करून ठेवतात. दत्ता मेघे, पतंगराव कदम, डी वाय पाटील, भय्यू महाराजांच्या डोक्यावर कुठे आहेत दोन भोवरे, किंवा बहुसंख्य नेत्यांच्या डोक्यावर तर भोंवरेच भोवरे असायला हवे होते, असे काही नसते हो, उगाचच हि मोठी माणसे ना, लहान मुलांच्या भावनांशी खेळून मोकळे होतात. आमच्या पत्रकार राजन पारकरच्या डोक्यावर तर तीन तीन भोवरे आहेत, पत्रकार अभय देशपांडे किंवा राष्ट्रवादीचे हेमंत ‘ टकले ‘ आडनाव असूनही त्यांच्या डोक्यावर दोन दोन भवरे आहेत, राजन तर आजही म्हणजे चाळीशी उलटल्यानंतरही बायको मिळावी म्हणून अशवथाम्यासारखा दर दर भटकतोय एकतरी मिळावी म्हणून. विशेष म्हणजे माझे असे अनेक मित्र आहेत ज्यांच्या डोक्यावर दोन दोन भोवरे असतांनाही सांगतात, दुसरी तर अजिबात नको उलट पहिली आहे तीही कोणतीतरी घेऊन जा. आणखी एक अशीच अफवा लहानपणीची कि एखाद्या पुरुषाने बेडूक मारले तर त्याचे अपत्य मुके जन्माला येते. अहो, माझ्या सासर्यांनी तर त्यांच्या आयुष्यात कितीतरी बेडूक मारल्याचे माझ्या सासूबाई कौतुकाने चार चौघात सांगतात. हि देखील एक अफवाच निघाली कि, माझी बायको आणि तिचे दोघे भाऊ, अहो, त्यांच्यासमोर सुवर्णा दुसाने देखील स्वतःच स्वतःच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून मोकळी होईल किंवा जितेंद्र आव्हाड देखील सहा महिन्यांसाठी मौनव्रत धारण करून मोकळे होतील. महत्वाचे म्हणजे सौभाग्यवती मुनगंटीवार यांच्या वडिलांनी त्या जन्माला यायच्या आधी म्हणे बेडूक मारले होते आणि देव देखील बघा कधी कधी कसा एखाद्या दुष्ट माणसासारखा वागतो, गेले दोन महिने सुधीर मुनगंटीवार हेच मुक्याच्या भूमिकेत आहेत, उलट घरी बसले आहेत म्हणून वरून त्यांनाच बायकोची वाट्टेल ती बोलणी खाऊन घायवी लागतात. जसे काही सुधीरभाऊ कामावर गेले नाहीत तर त्यांच्या घरातली चूल पेटणार नाही, पण नवरा कुख्यात दाऊद जरी असला आणि घरी बसला रे बसला कि त्याला बायकोची बोलणी खाणे, टोमणी ऐकणे अपरिहार्य असते म्हणूनच तर असे सारेच सरकारी अधिकारी आहेत कि जे निवृत्त होऊन देखील घरी बसायला मागत नाहीत मग ते सुभाष हजारे असोत कि अरुण बोनगिनवार, विश्वास पाटील असोत राजेश कुलकर्णी, लक्ष्मीकांत देशमुख असोत कि सतीश भिडे, इत्यादी इत्यादी. महत्वाचे म्हणजे मुनगंटीवार यांचे खाणाखुणा किंवा हातवारे करून सांगणे, गैरसमज त्यातून लोकांचे होताहेत. कारण ते खऱ्या अर्थाने नेते आहेत, नेत्यांमधले अभिनेते नाहीत म्हणजे सदाभाऊ खोत नाहीत. अलीकडे त्यांनी फडणवीसांना हातवारे करून सांगितले कि तुम्ही किती छान ड्रेसअप झाला आहेत ते, पण शेजारी उभ्या असलेल्या मंत्री राजकुमार बडोलेंना वाटले, ते आपल्याला म्हणताहेत म्हणून…वास्तविक असे मुनगंटीवार यांनी बडोलेंना म्हणणे अजिबात शक्य नाही, असे म्हणतात, बडोले हे त्यांच्याकडे फार पूर्वी पासून असलेल्या कोटांच्या ब्लेझर्सच्या बाह्या कापून त्याचे जॅकेट करून, घालून मोकळे होतात. नशीब, मुनगंटीवार सध्या मुके आहेत पण तिरळे नक्कीच नाहीत अन्यथा अनेक मंत्र्यांना म्हणजे अगदी सदाभाऊ खोतांना देखील वाटले असते कि आपण छान ड्रेसअप होतोय म्हणून…आणखी एक बरे झाले कि काही महिन्यांसाठी मुकेपण मुनगंटीवार यांच्या वाट्याला आलेले आहे त्याऐवजी ते राम शिंदे यांच्या वाट्याला आले असते तर ते कदाचित म्हणत सुटले असते, मुका घ्या मुका, मुका घ्या मुका…अर्थात यातला गंमतीचा भाग सोडा, देवाला मनापासून प्रार्थना, भाषणप्रभू असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांचा आवाज लवकरात लवकर ठणठणीत करून मोकळा हो रे देवा, परमेशवरा…
तळहातावर तीळ असलेल्यांना म्हणे खूप खूप पैसे मिळतात, त्या सुनील तटकरे यांच्या तळहातावर कुठे तीळ आहेत. मोटार सायकलवर बसून फिरतांना बघितलेले मी तटकरे, अगदी अलीकडे कोकणात फिरतांना, त्यांची काळ्या पैशांच्या मिळकतीतून फक्त कोकणातल्या दिवे आगार समुद्रकाठी असलेली गुंतवणूक बघितल्यानंतर तेथे मी फक्त बेशुद्ध पडायचा तेवढा बाकी होतो, अशा कितीतरी त्यांच्या मालमत्ता, अर्थात दिवे आगार नेमके प्रकरण मी पुढे येथे मांडणार आहेच पण येथे त्यांच्या नावाचा उल्लेख यासाठी कि ताटकरेंच्या तळहातावर कुठे तीळ आहेत किंवा कित्येकांच्या कमरेखालच्या अवयवावर तीळ असतात याचा अर्थ असा नाही कि ते दिवसभर बाहेर कमी कमोडवर अधिक बसून असतात, या सार्या भ्रामक कल्पना, असे काहीही नसते हो….
क्रमश :