फडणवीसांचे कारनामे ३ : पत्रकार हेमंत जोशी
काही माणसे केव्हा एकदा सत्तेवरून खाली उतरतात किंवा पदावरून बाजूला होतात असे आपल्याला अनेकदा अनेकांविषयी वाटत राहते आणि काही नेते, अधिकारी, माणसे सत्तेतून पायउतार होऊच नयेत किंवा त्यांची निवृत्ती, बदली व्हायलाच नको असेही आपल्याला व्यक्तिपरत्वे वाटत असते, वाटत राहते. अमुक एखाद्याच्या सहवासाने जर वातावरण सुखदायक होत असेल तर अशांचे दूर होणे, दूर जाणे मनाला अतिशय क्लेशदायक वाटत राहते. एकदा मी प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर आर आर आबा पाटलांच्या त्यावेळेच्या खाजगी सचिवांना म्हणजे चंद्रकांत दळवींना नेमके हेच म्हणालो होतो कि तुमचे प्रमोशन होणे मला तितकेसे अजिबात आवडले नाही, वास्तविक आयएएस म्हणून प्रमोट होणे त्यांच्यासाठी ती मोठी उपलब्धी होती पण त्यांनी एखादा खाजगी सचिव त्याच्या मंत्र्याला कोठे नेऊन ठेवतो, किती उंचीवर नेऊन सोडतो याचे उदाहरण लोकांसमोर ठेवले होते. महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अतिशय महत्वाकांक्षी आणि लोकोपयोगी जलयुक्त शिवार योजना तशी याच चंद्रकांत दळवी यांच्या, आर आर पाटील ग्रामविकास मंत्री असतांना डोक्यातून निघालेली किंवा त्यावेळी अत्यल्प प्रमाणात राज्यात त्यावेळी राबविल्या गेलेली, दुर्दैवाने पुढे आर आर आबांकडे ग्रामविकास खाते आले नाही, दळवी हे देखील मंत्रालयातून बाहेर पडले आणि डब्ब्यात बंद पडलेली हि योजना जवळपास १५ वर्षांनी पुन्हा श्रीमान देवेंद्र फडणवीसांनी येथे या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तातडीने सुरु केली. येथे नेमके मला तेच सांगायचे आहे कि दळवी येत्या मार्च मध्ये सरकारी शासकीय नोकरीतून निवृत्त होताहेत, म्हणून मनात आले कि काही अधिकाऱ्यांनी कधी निवृत्तच होऊ नये, पण ते घडते आहे, श्री चंद्रकांत दळवी हे पुणे विभागाचे महसूल आयुक्त म्हणून निवृत्त होताहेत….
आर आर पाटलांसारख्या त्यावेळेच्या अतिशय प्रभावी मंत्र्यांचे खाजगी सचिवकिंवा पुण्याचे जिल्हाधिकारी किंवा पुणे महसूल विभागाचे आयुक्त किंवा अगदी सुरुवातीपासून तर निवृत्तीपर्यंत श्रीयुत दळवी सतत ज्या ज्या मोठी कमाई करून देणाऱ्या पदांवर राहून मोकळे झाले आहेत, मला वाटते त्यांच्या जागी सर्वसाधारण पैसे घेणारा जरी एखादा अधिकारी असता तरी निवृत्तीपर्यंत किमान पाचशे कोटी रुपयांची मालमत्ता रोख रक्कम दागदागिने कमावून मिळवून मोकळा झाला असता आणि टी. चंद्रशेखर यांच्यासारखा म्हणजे यांच्या रांगेतले जर दळवी असते तर आज मितीला त्यांच्याकडे किमान दोन हजार कोटी रुपये अगदी सहज जमा झाले असते पण हे त्यांनी काहीही केलेले नाही, केले ते फक्त आणि फक्त या राज्याचे भले आणि निवृत्तीनंतरही त्यांना पुढे न्यायची आहे ती ग्रामीण सामाजिक लोकोपयोगी चळवळ. बाबा आमटे किंवा अण्णा हजारे यांच्या रांगेतले. महत्वाचे म्हणजे असेही नाही कि आपण खायचे नाही आणि सतत संशय डोक्यात ठेवून प्रसंगी कोणालाही उभे करायचे नाही आणि लोकोपयोगी कामेही होऊ द्यायचे नाही, हे असे चंद्रकांत दळवी यांचे नाही, त्यांचा या समाजाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, त्यावर कौतुक करावे तेवढे कमी, सलाम या प्रशासकीय अधिकाऱ्याला….
हा अंक एका चांगल्या माणसावर लिहितोय त्या अनुषंगाने चंद्रकांत दळवीही आठवले. जसे पत्रकारितेतली सर्वाधिक वाईट हलकट माणसे कोणती असा विषय एखाद्या ठिकाणी निघाला कि नक्की आमच्या नावाचा उल्लेख होत असावा तसे. काही गोष्टी या अशा आपोआप घडत असतात म्हणजे शाळेतली मुले घरी येतांना रस्त्यात थांबून मुतण्यासाठी एकाने टांग वर केली कि इतरही थांबून एका रांगेत रांगोळीसारखे मुतून मोकळे होतात तसे. येथे या राज्याचे भले व्हावे असे मनापासून वाटणार्या देवेंद्र फडणवीसांवर लिहिताना दळवी आपोआप आठवले. फडणवीसांवर लिहितांना, अजूनही तितकीशी वेळ गेलेली नाही म्हणून मला एका मुद्द्याकडे पुन्हा एकदा वळायचे आहे….
अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्या आजच्या सत्तेतल्या भाजपाला मोठे करण्यासाठी या राज्यातल्या तीन चार पिढ्या दिवसरात्र झिजल्या, खपल्या, बरबाद झाल्या, तन मन धन सारे काही देऊन कित्येकांनी हे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नामें रोपट्याचे अतिशय अतिशय विपरीत परिस्थितीतून वटवृक्षात रूपांतर केले, ती सारी कुटुंबे आजही राजकीय दृष्ट्या विपन्नावस्थेत असतांना संधीसाधू नेत्यांना मात्र भाजपा विशेष म्हणजे संघानेही जवळ घेऊन त्यांचे कल्याण करणे सुरु ठेवले आहे, ते अत्यंत वाईट आहे. थोडक्यात संघ भाजपा ने या बाहेरच्या संधीसाधू नेत्यांना जवळ घेणे प्रवेश देणे सत्ता बहाल करणे म्हणजे सुस्वरूप पत्नीला बाजूला सारून एखाद्या मूर्ख माणसाने एड्स झालेल्या वेश्येला अंथरुणावर स्थान देण्यासारखे, मोठ्या प्रमाणावर त्यातून या राज्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आणि संघ स्वयंसेवकांमध्ये अस्वस्थता आहे, ते एकमेकांकडे अक्षरश: रडून डोळ्यात अश्रू आसवे आणून आपले मनीचे विव्हळणे व्यक्त करून मोकळे होतात…