पुढाऱ्यांची पुढली पिढी : पत्रकार हेमंत जोशी
नुकतेच विधान परिषदेवर निवडून गेलेले, आमदार प्रसाद लाड हा विषय मला कितीतरी विस्तृत लिहायचा आहे, तुम्हाला नेमका सांगायचा आहे, थोडा धीर धरा. चेहरा आणि मुखवटा यात मोठा फरक असतो, जसेकी मी अनेक वर्षांपासून दैनिक सकाळ वाचत आलोय, त्यांचे यश विशेषतः बापसे बेटा सवाई पद्धतीने अभिजित पवारांनी प्रतापराव पवारांच्याही मग ते वृत्तपत्र असो कि साम वाहिनीचे यश, सारे काही कौतुक करण्या सारखे पण जे वृत्तपत्र आणि जो पवार परिवार बुवाबाजीच्या विरोधात कायम उभा ठाकलेला तेच अभिजित पवार केवळ एखाद्या जाहिरातीच्या मोहापायी म्हणजे पैशांच्या मोहापायी त्याच फसव्या बुवाबाजीला बिलगून जवळ घेऊन प्रसिद्धी देऊन मोकळे होतात, वर्षानुवर्षे सकाळ वाचणाऱ्या मराठी मनांना सकाळची हि लोभी भूमिका किळस आणते, भामट्या शरद उपाध्येंसारख्या एखाद्या आदिनाथ साळवीने स्वतःच पुणेकरांचे श्रद्धास्थान आहे हे लोकांना जाहिरातीतून आधी पटवून द्यायचे नंतर मोठाल्या जाहिरातींचे खर्च आणि स्वतःचे उत्पन्न बुवा बाबा होऊन सामान्य भोळ्या मराठींच्या खिशातून लुटायचे लुबाडायचे हे योग्य नसतांना सकाळ सारख्या प्रचंड खपाच्या लोकमान्य दैनिकातून अशा फसव्या लोकांच्या जाहिराती करणे मनाला व्यथित करणारे आणि सकाळ व पवार या दोघांचाही धिक्कार करणारे, हृदयाला भिडणारे हे असे गैरवर्तन असते….
दिनांक १९ नोव्हेंबर च्या सकाळ दैनिकातून भविष्य वर्तवून त्या शरद उपाध्ये पद्धतीने सामान्य गरजू लोकांना फसवू पाहणाऱ्या कुण्या आदिनाथ साळवी सरांची जाहिरात सकाळ ने थेट प्रथम पानावर तेही मुख्य बातमीच्या शेजारी जेव्हा छापली, तेव्हा हेच मनात आले कि लोकांचे चेहरे आणि मुखवटे फार वेगळे असतात, जे वृत्तपत्र किंवा त्याचे शरद पवारांच्या खानदानातले मालक एकीकडे बुवाबाजीच्या विरोधात लढतात तेच जेव्हा वेळात वेळ काढून इंदोर किंवा पुण्यात थेट भय्यू महाराजांच्या पाय पडून मोकळे होतात किंवा साळवी यांच्यासारख्या नव्याने निर्माण होणाऱ्या बुवाच्या जाहिराती छापून मोकळे होतात, वाचक भित्रे असतात, ते उघड बोलायला टाळतात पण हे असले खोटे वर्तन बघून सकाळ दैनिक देखील फक्त पैशांच्या मागे, हि खूणगाठ मनाशी बांधून मोकळे होतात, असे घडता कामा नये, वाचकांच्या अभिजित पवारांकडून वेगळ्या अपेक्षा आहेत…
वयाची साठी पार केलेले याआधीचे बहुसंख्य नेते तसे फक्त आणि फक्त पैशांच्या मागे लागलेले त्यांची पुढली पिढी बापाच्या काळ्या कमाईतून तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली निदान राजकारणात आलेल्या या नवं तरुण पिढीने तरी बापासारखा गु खाऊ नये, जे मिळाले आहे त्यावर समाधान मानून देशसेवा हातून कशी घडेल हे बघावे. कदाचित तुम्ही मला चुकीचे ठरवाल,पण खासदार सुप्रिया यांनी म्हणजे शरद पवारांच्या या कर्तबगार मुलीने उठसुठ काळ्या कमाईच्या नसत्या सरकारी कार्यालयातून किंवा मंत्रालयातून क्लिअर करवून घेतल्याचे मला कधी दिसले नाही त्यामुळे बोलायला वागायला कधी कधी काहीशी उर्मट वाटणारी पवारांच्या हि लेक नेतृत्व म्हणून बहुतेकांच्या मनाला भावून जाते किंबहुना अजित पवार देखील सुप्रिया समोर फिके पडले ते तिच्या प्रामाणिक वर्तणुकीतूनच, माझा हा दावा नाही कि सुप्रिया सुळे या राजकारणातल्या संत सखू आहेत पण त्या काळ्या पैशांसाठी तुरुंगात जाणाऱ्या नक्कीच या राज्यातल्या जयललिता नाहीत…
ज्या उंच अपेक्षा सुप्रिया सुळे यांच्याकडून या राज्यातील जनतेच्या आहेत त्याच अपेक्षा रजनी सातव यांच्या राजीव कडून आहेत, पतंगराव कदमांच्या विश्व्जीत कडून आहेत, अनिल देशमुखांच्या सलील कडून आहेत, गिरीश गांधींच्या निशांत कडून आहेत, दत्ता मेघे यांच्या सागर आणि समीर कडून आहेत, पदमसिंह पाटलांच्या राणा जगजितसिंह यांच्याकडून आहेत, रणजित देशमुख यांच्या आमदार आशिष कडून आहेत, डी. वाय पाटलांच्या सतेज कडून आहेत, खडसे यांच्या घरातल्या रक्षा किंवा रोहिणी कडून आहेत, रुपाताईंच्या संभाजी पाटील निलंगेकरांकडून आहेत, सुशीलकुमारांच्या प्रणिती कडून आहेत, दिवंगत विलासराव देशमुखांच्या अमित कडून आहेत, गोपीनाथ मुंडे यांच्या पुतण्याकडून धनंजय कडून किंवा कन्या पंकजा कडून आहेत, प्रमोद महाजनांच्या पूनम कडून आहेत, उद्धव ठाकरे यांच्या आदित्य कडून आहेत, राज ठाकरे यांच्या अमित कडून आहेत. पण बहुतेक नेत्यांची राजकारणात आलेली पुढली पिढी बहुतेकवेळा पेज थ्री आहे आणि काळ्या पैशांच्याही मागे आहे, असे दिसते म्हणजे राज्यातल्या तरुण तरुणींनी या नवतरुण नेत्यांना आदर्श मानावे असे घडलेले नाही, जे नेमके घडायला हवे होते असे फारच कमी त्या सुप्रिया किंवा प्रणिती सारखे उद्धव यांच्या आदित्य किंवा राज यांच्या अमितसारखे जे खाजगी,मोठ्या कमाईचे कामे घेऊन मंत्रालयात किंवा सरकारी दरबारी न फिरणारे आहेत. जशी एखादी तरुण स्त्री अडचणीतून आजच्या नवतरुण धनंजय मुंडे यांच्याकडे येतांना सेफ महसूस करते, तेच इतरही तरुण पुरुष नेतृत्वाकडून आम्हाला अपेक्षित आहे. पण तरुण पिढीचे नेत्यांच्या नव्या पिढीचे चारित्र्य, त्यावर येथे न लिहिलेले बरे. तसेही त्यांचे खाजगी आयुष्य किती खालच्या दर्जाचे आणि व्यसनी, त्यात आम्हाला काहीही देणे घेणे नाही पण या तरुण पिढीने तरी जे त्यांच्या आधीच्या पिढीने मोठ्या प्रमाणावर केले ते करू नये म्हणजे लुटणे आणि आलेल्या तरुणीला झोपवणे, हे असे तरी करणे निदान टाळावे. मला येथे अमुक एखाद्या नेत्याचे नाव घ्यायचे नाही पण निदान त्यांच्या पुढल्या पिढीने काही पथ्ये पाळलीत तर पुढल्या पिढीचे तुम्ही ‘ अनंत गाडगीळ ‘ किंवा ‘ राजीव सातव ‘ आहात, असे अभिमानाने सांगता येईल, म्हणता येईल आणि लिहिताही येईल….
जाता जाता : अलीकडे हिवाळी अधिवेशनानिमित्ते नागपूर विमान तळावर उतरलो,बाहेर आलो तर हॉलमध्ये राज्यमंत्री दीपक केसरकर समोरच एका खुर्चीत कुणाची तरी वाट पाहतांना दिसले. मुद्दाम थांबलो, कोणासाठी आलात तर ते म्हणाले स्वतःच्या बायकोला घ्यायला आलोय, ती देखील मुंबईवरूनच येतेय. मला, मनाला छान वाटले. केसरकारांचे मनातल्या मनात कौतुकही केले. आयष्य हे असे असावे कि आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत पुरुषांना, दाम्पत्याला वाटावे कि आमचे लग्न कालच झालेले आहे. त्याचवेळी मागल्या वर्षीचा विमानातला किस्सा आठवला. पुण्याकडले एक राज्यमंत्री आदल्या दिवशी नेहमीप्रमाणे रात्री उशिरापर्यंत मैत्रिणीला घेऊन दारू ढोसत बसल्याचे त्या राज्यमंत्र्यांच्या बायकोला समजल्यानंतर ती तडक नागपुरात दाखल झाली होती आणि विमानांतही त्या दारू ढोसून बसलेल्या राज्यमंत्र्यांची सर्वांदेखत ती आई बहीण घेत होती आणि तो राज्यमंत्री गयावया करीत होता, तो वाघ होता पण त्याच्यावर दुर्गा आरूढ होती हाती वेपन घेऊन आणि तोंडाने शिव्या देऊन….
पत्रकार हेमंत जोशी