मुक्काम पोस्ट नागपूर : पत्रकार हेमंत जोशी
अलीकडे एका श्रीमंत उद्योगपतीच्या कम नेत्याच्या मुलीचे लग्न झाले. मुंबईत त्यांच्या पंचतारांकित हॉटेल मध्ये ठेवलेल्या स्वागत समारंभाला गेलो होतो. विवाह मग तो एखाद्या मंगलकार्यालयातला असो कि पंच तारांकित हॉटेलातला, आयोजोक खूप पैसे खर्च करतात पण तेथे दिले जाणारे जेवण अतिशय सामान्य असते वास्तविक ज्यांच्या घरातले फंक्शन असते त्यांनी डोळ्यात तेल घालून जेवणाची क्वालिटी कशी आहे त्यावर लक्ष द्यायचे असते पण ते घडत नाही, आपण विनाकारण खूप पैसे मोजतो पण ज्याकडे लक्ष द्यायला हवे, देत नाही त्यामुळेच बहुतेक समारंभातून एकसारखे तद्दन भिक्कार अन्न रिचवावे लागते, पोट देखील खराब होते, मला वाटते, जणूकाही हॉटेलातले उरले सुरले अन्न हॉटेलवाले देत असावेत. असे घडता कामा नये. मोठ्या प्रमाणावर रक्कम मोजूनही लग्न समारंभातल्या जेवणाचा दर्जा उत्तम राखल्या जातोय किंवा नाही याकडे आयोजकांनी अतिशय बारकाईने लक्ष देणे आवश्यक असते, ग्राहकांची फसवणूक करणे हे त्यांचे कामच असते…
या उद्योगपतीकडल्या समारंभात एका गोलाकार टेबलवर मी जेवत होतो, डीनर घेत असतांना माझ्यासमोर एक तरुणी आणि तिच्या उजव्या डाव्या बाजूला तिला अगदी खेटून दोन तरुण बसलेले होते, बघणाऱ्या नवख्याला हे लक्षात येणे अशक्य होते कि त्यातला तिचा नेमका नवरा कोण आहे, ते दोघे तिच्याशी आणि ती त्या दोघांशीही मस्ती करीत होती, मला सुरुवातीला वाटले त्यातला एक तिचा सख्खा भाऊ असावा पण तसे नव्हते, त्यातला एक त्या दुसऱ्याला अमुक आण तमुक आण, सांगत होता आणि दुसरा गुमान घेऊन येत होता. शेवटी याने त्याला स्वीट्स आणायला सांगितले, तो ते आणायला गेल्यावर हि तरुणी त्या खेटून बसलेल्या दुसर्या तरुणाला हिंदीतून म्हणाली, हे काय, आज तर तू माझ्या नवऱ्याला सरळ सरळ वेटर करून सोडले आहेस आणि मग माझी ट्यूब पेटली, त्यातला एक तिचा नवरा होता आणि दुसरा तिचा बॉस कम प्रियकर होता….आणि हे असे पैशांपायी, पैशांच्या मोहापायी, बायकोचा मित्र किंवा प्रियकर खपवून घेणे, बायकोच्या प्रेमाला मान्यता देणे या देशातही अनेकदा घडते, त्यावर माझी खात्री झालेली आहे. एकाचवेळी ते दोघेही खेटून बसलेले असतांना माझ्या लक्षात येत नव्हते कि नेमका तिचा नवरा कोण, एवढा सुंदर प्रेमाचा अभिनय ती त्या दोघांशीही करीत होती, दुर्दैव म्हणजे मर्द पतीराज हे सारे उघड्या डोळ्यांनी सहन करीत होते, वाईट वाटले, केवळ राहणीमानाचा उच्च दर्जा टिकविण्याच्या नादात आपल्याकडेही हे असे सहन न होणारे आणि भारतीय संस्कारांना तडा देणारे घडत असते…
झटपट श्रीमंत, अतिश्रीमंत होण्याच्या नादात शरद पवारांचे संभाजी म्हणजे या राज्यातल्या आधुनिक शिवाजी महाराजांचे पराक्रमी संभाजी शोभावे असे अजित पवार सत्तेत आल्यानंतर, मंत्री झाल्यानंतर केवळ पैसे मिळविण्याच्या नादात या राज्याचे आणि स्वतःचेही कसे नुकसान करवून बसले त्यावर मी आणि ज्याचे अजित पवारांच्या व्यक्तिगत कुटुंबात नेहमीची उठबैस आहे, त्याच्याशी याच विषयावर अलीकडे व्यापक बोलणे झाले. त्याच्या बोलण्यातून मला नेमके अजितदादा बाबतीत हेच वाटले नव्हे माझी खात्री पटली कि खाते मग ते सिंचनाचे असो कि वीजखाते, आपला अमुक एक वाटा मिळाला कि अजितदादा बाजूला व्हायचे आणि पुढले कोण किती खाते त्याकडे दुर्लक्ष करायचे त्यातून त्यांच्या भोवताली जमलेल्या त्यांच्या हुजऱ्यांनी, दलालांनी, कंत्राटदारांनी, नेत्यांनी, मग ते सुनील तटकरे असतील, बाजोरिया असतील, रेड्डी असतील, अन्य अनेक अधिकारी असतील, त्या सर्वांनी अजितदादांच्या खालोखाल माया जमवून वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास ते सारेच्या सारे अक्षरश: या अजित पवार
यांना च्यू बनवून मोकळे झाले. अर्थात हे असे बहुतेक मंत्र्यांच्या आणि वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांच्याही बाबतीत घडत असते मुख्य म्हणजे दादांनी एवढे घेतले का मग आपण तेवढे का नाही, या जीवघेण्या स्पर्धेतून सतत २५-२७ वर्षे मुख्यमंत्रीपद किंवा वीज आणि सिंचन खाते पवार कुटुंबीयांकडे असूनही या महत्वाच्या दोन्ही खात्याची अक्षरश: वाट लागली, पैसे तर पाण्यात गेले पण होणारा विकास खुंटला, पर्यायाने या राज्यातला शेतकरी, शेतमजूर कंगाल दरिद्री गरीब राहून तो सतत आत्महत्येला बिलगून मोकळा झाला, पवारांच्या लाडक्यांनी मग कधी ते भारत बोन्द्रे असतील तर कधी डॉ. पदमसिंह पाटील, कधी ते अजित पवार असतील तर कधी ते सुनील तटकरे, शरदरावांच्या या तमाम लाडक्यानी कधी शरदरावांच्या पसंतीने तर बहुतेकवेळा दस्तुरखुद्द शरद पवार यांच्याच डोळ्यात धूळ फेकून या राज्याची हे सारे वाट लावून मोकळे झाले. महत्वाचे म्हणजे या तमाम पैशांसाठी हपापलेल्या तटकरे यांच्यासारख्या मंडळींनी थेट सडेतोड अजित पवारांना देखील प्रसंगी उल्लू बनवून आपला कार्यभाग उरकला. अजित पवार मोहात अडकले नसते तर एक खमके पराक्रमी मेहनती नेतृत्व आम्हा तमाम मराठींना आधार देऊन मोकळे झाले असते. आजतागायत ज्यांनी ज्यांनी अजित पवार अगदी जवळून अनुभवले आहेत ( वाईट अर्थ काढू नका अन्यथा लगेच एखाद्या महाराणीचे नाव घेऊन मोकळे व्हाल ) त्यांचे हेच सांगणे असते आणि माझेही तेच ठाम मत आहे कि सुरुवातीचे जे अजित पवार होते ते शरद पवारांच्या देखील नक्की खूप पुढे निघून जातील असे दिसत होते, वाटत होते त्यातूनच त्यांना ‘ दादा ‘ हि उत्स्फूर्त उपाधी मिळाली कारण दादा म्हणजे आधाराचे नाते जणू कुटुंब प्रमुख किंवा थोरला, अख्या कुटुंबाला सांभाळून घेणारा भाऊ, परिसरात आदरयुक्त दरारा असलेला भाला माणूस, महापराक्रमी आणि सामान्य लोकांच्या भल्यासाठी प्रसंगी हाती तलवार घेऊन लढणारा लढवय्या आणि हे असेच त्यांचे, अजित पवारांचे पक्षातल्या, मतदारसंघाला, राज्यातल्या लोकांबरोबर वागणे होते पण सामान्यांवर बसलेली पकड राहिली बाजूला आणि ते जेव्हा मंत्री झाल्यानंतर नको ते उद्योग करण्यात रमले, तेथे दादा, लोकांच्या, नेत्यांच्या मनातून उतरले, पण अलीकडे असेही कानावर आले आहे कि नजीकच्या भविष्यात म्हणे ते पूर्वीचेच अजितदादा लोकांना अनुभवायला, बघायला मिळतील, त्यांना चूक उमगली आहे, त्यांनी म्हणे पुन्हा एकदा ठरविले आहे कि नेतृत्वात पुन्हा एकदा पूर्वीचे स्थान निर्माण करून मोकळे व्हायचे आहे पण असे असेल तर बिल्डर, कंत्रादार किंवा विजय गावित, सुनील तटकरे यांच्यासारखे लोभी भ्रष्ट नेते त्यांनी दूर ठेवायला हवेत, असे अद्याप नजरेस पडलेले नाही, पूर्वीचेच खाणारे त्यांच्या सभोवताली घोळका करून असतात आणि सामान्य माणूस भीत भीतच त्यांच्यासमोर जात असतो…
ज्यांची अजितदादांच्या घरी उठबैस असते त्यांना घरातलेही नेमके माहित असते, त्यावर येथे लिहिणे टाळतो पण पुन्हा तेच, वाम मार्गाने घरी येणारे पैसे, घर मग ते माझे असो कि अजितदादांचे किंवा घराणे मग ते प्रमोद महाजनांचे असो कि तटकरे यांचे, तुमच्या आमच्या घरात आलेल्या काळ्या पैशातून फारसे चांगले काही घडत नसते, येथेच सारे भोगून मोकळे व्हायचे असते. वर काहीही घेऊन जायचे नसते, वर ना स्वर्ग आहे ना नरक आहे. वर फक्त मुक्ती आहे ती चांगले कर्म केले तरच मिळते. असो, सांगणे हेच कि खाते मग ते सिंचन असो कि वीज, खाल्ले अनेकांनी पण बदनाम या राज्याचे उभरते नेतृत्व झाले, इतरही श्रीमंत झाले बदनाम मात्र अजितदादा झाले. वाईट वाटले, एक मर्द पराक्रमी नेता उगाच नको त्या मोहापायी बदनाम झाला. थोडे थोडे हळू हळू खाल्ले कि पचतेही, शिल्लकही राहते, पाप लागत नाही, बदनामी आणि नको त्या कटकटी देखील मागे लागत नाहीत मुख्य म्हणजे हे राज्य हे राष्ट्र पुढे पुढे जाते आणि लोक सुखी होतात….
वर दिलेली दोनही उदाहरणे तशी भिन्न पण त्यातून नेमका हाच अर्थ निघतो, पैशांच्या मोहापायी आपण सारे वाट्टेल ते वाट्टेल तसे वागतो, क्षणिक समाधान मिळते पण हळू हळू आलेल्या काळ्या कमाईतून आपण पुढली पिढी बरबाद करून मोकळे होतो. सध्या अशाच काळ्या कमाईतून उध्वस्ततेकडे निघालेल्या या राज्यातल्या एका बड्या सरकारी अधिकाऱ्याचे जीवन मी अगदी जवळून न्याहाळतोय, हे महाशय आता फक्त वेड्यांच्या इस्पितळात तेवढे दाखल व्हायचे बाकी आहेत त्यांना अलीकडे जो तो समोरचा मग तो त्यांच्यावर कितीही प्रेम करणारा असला तरी त्यांचा शत्रू वाटतोय, हे अधिकारी तुमच्या लक्षात आलेच असतील, ठीक आहे, वाईट फक्त याचेच वाटते त्यांनी जी अमाप संपत्ती जमा केली किंवा अद्यापही त्यांना तो मोह सुटलेला नाही, ते सारे पैसे ना त्यांचे कुटुंब उपभोगतेय ना ते स्वतः विशेष म्हणजे त्यांच्या भोवताली जमा झालेले इतरही अधिकारी नजीकच्या काळात त्यांच्या त्यांच्या घरातले सुख समृद्धीचे आनंदाचे वातावरण गमावून बसलेत तर मला त्याचे अजिबात आश्चर्य वाटणार नाही, गरिबांचे नकळत मिळालेले शाप येथेच भोगून मोकळे व्हावे लागते प्रसंगी मलाही ते भोगावे लागतील जर माझ्या हातून काही गरीब जर उध्वस्त झालेले असतील….
मित्रहो, पर्वत किंवा डोंगर दुरून साजरे दिसतात. चेहरा रंगविल्यावर वेश्या किती छान सुंदर दिसतात हे अगदी अलीकडे मी अनुभवले आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान मी ज्या नागपुरातल्या पंचतारांकित हॉटेल मध्ये उतरलो होतो तेथे पुढाऱ्यांची नेत्यांची शौकीन मंत्र्यांची सोया म्हणून मंत्रालयात कामे करवून घेणाऱ्या काही बड्या दलालांनी कॉल गर्ल्स आणून ठेवल्या होत्या, दुरून त्या अतिशय देखण्या होत्या पण सकाळी जेव्हा त्या नेमक्या माझ्या टेबल शेजारी येऊन बसल्या, त्यांनी तोंड उघडताच क्षणार्धात लक्षात आले या महागड्या रांडा आहेत म्हणून, थोडक्यात जशी युद्धाची बातमी दुरून ऐकायला चांगली वाटते किंवा वेश्या जशा दुरूनच देखण्या वाटतात तेच आपल्यातले काळे पैसे मिळवून श्रीमंत झालेल्यांच्या घरातले असते, जे दुरून सुंदर दिसते पण जवळून हि कुटुंबे बघायला मिळाली तर आपण पटकन मनाशी हेच म्हणून मोकळे होतो, आपली ती भाजी भाकरीच न्यारी आणि प्यारी, तीच लज्जत न्यारी…
पत्रकार हेमंत जोशी