गावमामा अजय अग्रवाल : पत्रकार हेमंत जोशी
हल्ली निदान मला तरी नेते नारायण राणे यांना भेटणे सहज शक्य झाले आहे. पूर्वी असे नव्हते अनेक अडथळे पार करून त्यांची भेट घेणे शक्य होत असे. अलीकडे ते जुहूला राहायला आल्यापासून एकतर सकाळी फिरायला येतात किंवा नरिमन पॉईंट परिसरातील आरकेडिया इमारतींमधल्या त्यांच्या ऑफिस मध्ये दुपारच्या वेळेत लोकांना बहुतेकवेळा भेटतात. सारे म्हणतात नारायण राणे आणि त्यांच्या मुलांचे राजकीय ग्रह फिरले आहेत, मला असे अजिबात वाटत नाही, त्यांनी भाजपा ऐवजी शिवसेनेत जायला हवे होते हे म्हणणे किंवा हि चर्चा तशी चांगली पण प्रत्येक नेत्याचे स्वतःचे असे राजकीय आराखडे असतात, आपण त्यात फारशी ढवळाढवळ करणे योग्य नसते फारतर मत प्रकट करणे ठीक मात्र आग्रह धरणे चुकीचे ठरते. फार तर त्यांचा हा राजकीय दृष्ट्या कठीण किंवा परीक्षेचा काळ आहे असे म्हणता येईल पण राणे संपले, राजकीय दृष्ट्या बरबाद झाले हे म्हणणे चुकीचे आहे, ते लोकांचे नेते आहेत, वरून लादलेले नेते नाहीत, आणि असे उत्स्फूर्त नेते कधी कधी संपले आहेत असे विनाकारण आपल्याला वाटत असते मात्र असे अजिबात नसते. पूर्वीचे राणे पुन्हा एकदा उफाळून वर आले हे तुम्हाला नक्की एक दिवस म्हणावे लागेल, अपवाद त्यांच्या प्रकृतिस्वास्थ्याचा, त्यांनी वयोमानानुसार आणि सततचा राजकीय तणाव, तब्बेतीला जपणे नक्की गरजेचे आहे…
खरे तर त्यादिवशी नागपूर अधिवेशनातून मुंबईत परतल्यानंतर मित्र अजय अग्रवाल संगे जुहू चौपाटीला राणेँनाच भेटायला गेलो होतो पण राणे नेमके फिरायला आले नाहीत, कुठेतरी कदाचित मुंबई बाहेर असावेत पण चौपाटीवर फिरतांना जगश्रीमंत हिंदुजा बंधूंपैकी दोघे नेहमीप्रमाणे अशोकभाई आणि प्रकाशभाई हिंदुजा भेटले, चौपाटीवर फिरतांना एक बरे असते, विविध मान्यवर उद्योगपतींशी बोलणे होते, त्यादिवशीही सुभाष अग्रवाल होते, प्रख्यात शेअर दलाल सौरव बोरा होते, अजय अग्रवाल होते आणि हिंदुजा बंधूही…
विशेषतः उद्योगपती अशोक हिंदुजा यांच्याशी देशभरातल्या राजकीय गप्पा आणि त्यांचे त्यावरील संदर्भ उदाहरणे, माणसे उगाच मोठी होत नाहीत ते या अशा गप्पांच्या ओघात कळते. मोदी यांनी देशासाठी नेमके काय काय चांगले केले आणि नेमके ते कुठे चुकले, हे असे विषय अशोकजी जे काय त्यावर नेमके सांगतात, ऐकत राहावेसे वाटते अर्थात देशाचे नव्हे तर राज्याचे राजकारण, हा माझ्या नेहमीचा लिखाणाचा ढाचा असल्याने त्यांनी जे काय सांगितले किंवा ते जे काय सांगतात, ते येथे लिहिणे अशक्य आहे, देशाचे राजकारण हा माझा प्रांत नाही, जे आपले नाही त्यावर हक्क तरी कसा सांगायचा थोडक्यात, जर कतरिना कैफ माझी प्रेयसी नाही तर ते येथे मी का म्हणून सांगायचे किंवा ज्या गावी आपल्याला जायचेच नाही त्या गावचा रास्ता विचारानेही योग्य नाही…
प्रत्येक गावात हमखास एक असा माणूस असतो कि त्या गावातल्या प्रत्येक घरी त्याची उठबैस असते, बहुतेक गावातून अशा धावून जाणाऱ्या व्यक्तीला ‘ गावमामा ‘ लाडाने म्हटले जाते. आमचे एक मित्र , राज्यातल्या आम्हा सार्या चर्चेतल्या लोकांचे एक मित्र अजय अग्रवाल हे त्यातलेच एक, त्यांचे साऱ्यांशी घरचे, कौटुंबिक संबंध आहेत मग ते राजकारणी असोत कि उद्योगपती, फिल्मवाले असोत कि सरकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार, थोडक्यात सारे मान्यवर अजय यांचे मित्र आहेत, त्या सर्वांशी त्यांचे घरोब्याचे संबंध आहेत, मैत्री आहे, दोस्ती आहे, यारी आहे. पण हे सारे असूनही, अजयने स्वतःचे या अशा व्यक्तिगत संबंधातून फार मोठे भले करवून घेतले असे कधी ऐकिवात नाही उलट खर्च आम्ही करायचे आणि पैसे अजय अग्रवाल यांनी भरायचे, असेच अनेकदा किंवा बहुतेकवेळा घडते, घडत आलेले आहे किंबहुना अजय हे आमच्यातले शापित असे व्यक्तिमत्व आहे, हे त्यांच्याबाबतीत म्हणणे अधिक योग्य ठरावे. त्यांनी मोठ्यांच्या ओळखीतून आपल्या कुटुंबासाठी फार काही केल्याचे ऐकिवात नाही उलट मैत्री जपता जपता त्याचे स्वतःच्या धंद्याकडे झालेले दुर्लक्ष, असे कानावर आहे, अजयच्या पत्नीने म्हणे अलीकडे त्यांना दम भरलाय, घराबाहेर काढीन म्हणून, खरे खोटे देव जाणे. अजयच्या मित्रांना, मग अडचण कोणतीही येऊ, अजयने मित्रांसाठी मार्ग काढला नाही असे कधी होत नाही. मित्रांच्या घरातले कार्य असो किंवा आलेले एखादे संकट असो, एकदा का अमुक एक काम अजय यांना सांगितले कि आपण निश्चिन्त व्हायचे असते, आपण अजयला काम सांगितल्याचे भलेही विसरतो, मग अजय फोन करून सांगतील, भाऊ तुम्ही सांगितलेले काम झाले बरे, असा हा सब दर्द का एकही इलाज, अजय अग्रवाल. विदर्भातल्या मलकापूरचे माझे मित्र माजी नगराध्यक्ष, सुरुवातीपासून काँग्रेसचे निष्ठावान अतिशय मोठ्या मनाचे श्याम राठी असोत किंवा जळगाव भुसावळ हे मूळ स्थान सोडून मुंबईत स्थिरावलेले हे अजय महाशय, अतिशय श्रीमंत व्यापारी कर्मठ मारवाडी घरातले, मात्र मित्रांसाठी वाट्टेल ते करणारे प्रसंगी स्वतःला विकून मित्रांचे भले करणारे, यांची नजर आणि नियतही चांगली त्यामुळे त्यांना थेट घराघरातल्या चुलीपर्यंत प्रवेश असतो, संभाजी झेंडे पाटलांसारख्या मराठ्यांच्या घरी हे अजयभाऊ अगदी सकाळी गप्पा मारायला जातात किंवा हिंदुजा असोत कि हर्षवर्धन पाटील, हक्काने सांगून मोकळे होतात, मी नाश्टा करायला येतो, विशष म्हणजे एकाचवेळी ते अनिल गोटेंना बिलगून मोकळे होतात आणि गोटे यांचे विरोधक राधेश्याम मोपलवार देखील अजयला हक्काने आणलेल्या टिफिन मधून जेवायला वाढतात. इकडचे तिकडे न सांगता, केवळ सकारात्मक मैत्रीसाठी जगणारे हे व्यक्तिमत्व म्हणूनच सर्वांना मनापासून भावते, एकमेकांचे कट्टर विरोधक असलेया दोघांनाही एकाचवेळी आवडते.एक मात्र नक्की सारे गाव मामाचे पण कोणी नाही कामाचे, या म्हणी, उक्ती नुसार, थोडक्यात या राज्यातले जवळपास सारेच मान्यवर अजय अग्रवाल यांच्या जणू घरातले पण अजय असोत कि मलकापूरचे ज्येष्ठ नेते श्याम राठी, यांचे भले साधण्या कोणी मनापासून धावून आल्याचे मला कधी फारसे दिसले नाही, वाईट वाटते. एक सांगू का, ज्यांना या भव्य मुंबापुरीतल्या वरच्या वर्तुळात अलगद जाऊन बसायचे आहे त्याने आमच्या या मारवाडी असूनही काहीशा भाबड्या आणि कमालीच्या बडबड्या अजय अग्रवाल या व्यावसायिकांशी मैत्री करून मोकळे व्हावे, फायदे होतील. एक मात्र नक्की, हे महाशय, सतत मित्रांसाठी वाट्टेल ते करण्यात गुंतलेले असतात, भले मित्रांचे होते आणि हे असे राठी किंवा अग्रवाल यांच्यासारखे बोटावर मोजण्याइतके असे शेटजी असावेत जे मित्रांसाठी आपले आर्थिक गणितही प्रसंगी बिघडवून मोकळे होतात. असे कसे हो हे व्यापारी असून मारवाडी घरातले त्या कर्णासारखे वागणारे…
मित्रहो, केवढे हे उपकार या मुंबईचे माझ्यावर, जिने मला खूप काही दिले, छान छान मित्र आणि थोडेफार व्यवसायिक यश देखील. पुढे जाऊन अत्यंत महत्वाचे सांगतो, मी बहुतेक वेळा अनेकांच्या विरोधात जाऊन लिहितो, ते तरीही माझे शत्रू नाहीत, मला त्यांचा त्रास नाही कारण त्यांना हे नेमके माहित असते कि मी जे लिहिलेले असते ते हिमनगाचे एक टोक असते, ते नेमके काय करताहेत हे सांगण्यासाठी म्हणाल तर ते एक फुटकळ लिखाण असते, त्यामागचे विदारक सत्य त्याहून महाभयंकर असते, जणू त्यांना हि सूचना असते कि स्वतःला आवरा आणि जनतेलाही सावरून घ्या, त्यांना खड्ड्यात नेऊन सोडू नका…
तूर्त एवढेच !
पत्रकार हेमंत जोशी
www.offtherecordonline.com
www.vikrantjoshi.com