घडामोडी आणि भानगडी : पत्रकार हेमंत जोशी
पुण्यातल्या सदाशिव पेठेतले जोशी कुलकर्णी गोखले परांजपे नेने काणे इत्यादी आमच्यातले काहीही करू शकतात म्हणजे कुलकरण्यांचा मुलगा जोशींची मुलगी बघायला गेला होता तेव्हा त्याने तिला द्यायला परसातली निघालेली मेथीच्या भाजीची जुडी सरप्राईज गिफ्ट म्हणून नेली होती आणि तिने देखील ते गिफ्ट स्वीकारतांना त्याकडे जणू कोहिनूरचा हिरा त्याने दिलाय पद्धतीने बघितले होते, तो गेल्यावर तिची आई हेच म्हणाली, कुळकर्ण्यांचा मुलगा बऱ्यापैकी उधळ्या दिसतोय, तिनेही काळजीने मान डोलावून हो म्हंटले होते…
आणखी एक सत्य किस्सा. मालमत्तेवरून याच सदाशिव पेठेतल्या परांजपे बापलेकात वाद होते, प्रकरण न्यायालयात होते, दोघेही तारखेवर जातांना आणि येतांना एकाच रिक्षेने जायचे यायचे, निम्मे निम्मे भाडे वाटून घेतल्यावर न्यायालयात मात्र एकमेकांसमोर एखाद्या शत्रूसारखे एकमेकांशी वाद घालायचे, खुनशी चेहऱ्याने एकमेकांकडे बघून भांड भांड भांडायचे पण रिक्षेत मात्र एकमेकांना खेटून बसायचे, त्यातल्या त्यात बाप थोडा दिलदार होता, पोराला मोठ्या मनाने खिशातले चार खारे शेंगदाणे तो काढून देत असे….
एकमेकातले वितुष्ट किंवा भाऊबंदकी त्यावरून नागपुरातले अनिल देशमुख आणि रणजित देशमुख आठवले. हे दोघेही माजी मंत्री आहेत, एकमेकांचे सख्खे चुलत भाऊ आहेत त्यांची गावाकडे किंवा नागपुरातले निवासस्थाने आजही एकमेकांना खेटून आहेत, त्यांचे एकमेकांकडे तसे जाणेही आहे पण राजकीय दृष्ट्या मात्र दोघेही आणि त्यांची पुढली पिढी देखील एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत, हा या राजकीय पक्षात असला कि तो दुसऱ्याच पक्षात असतो याने रणजित देशमुखांचे थोरले चिरंजीव मागे विधान सभा निवडणुका लागण्याच्या केवळ पंधरा दिवस आधी काँग्रेस मधून भाजपा मध्ये आले, त्यांना भाजपा ने विधानसभेची उमेदवारी दिली आणि आशिष देशमुख राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांचे चुलते श्रीमान अनिल देशमुख यांच्या विरोधात निवडणूक जिंकले आमदार देखील झाले. थोडक्यात रणजित देशमुख आणि अनिल देशमुख कायम दोन भिन्न राजकीय पक्षाचे नेतृत्व करतात. हा मुद्दा येथे यासाठी कि खासदार नाना पटोले यांच्या पाठोपाठ भाजपा नेतृत्वविरोधात आवाज उठविणारे भाजपातले आशिष देशमुख हे दुसरे, विशेष म्हणजे भंडाऱ्याचे पटोले हे खासदार म्हणून आणि आशिष देशमुख हे आमदार म्हणून त्यांच्या बंडखोरीला महत्व देण्यात आले, चर्चा झाली, नाही म्हणायला नागपुरातल्या भाजपमध्ये त्यातून खळबळ देखील उडाली…
खासदार नाना पटोले आणि आमदार आशिष देशमुख हे त्यांच्या पुढल्या निवडणुका नक्कीच भाजपाच्या तिकिटावर लढविणार नाहीत हे आता नक्की झाले आहे, भाजपानेते आणि हे खासदार आमदार यापुढे एकमेकांकडे ढुंकूनही पाहणार नाहीत हेही दिसते आहे, थोडक्यात आता या दोघांनी भाजपापासून काडीमोड घेतला आहे, घटस्फोट घेतला आहे, फारकत घेतली आहे हे आता तुम्हाला सांगणे म्हणजे दिनेश उपाध्याय नामें राजकीय नारदाला शेंडी आहे हे त्याच्या पत्नीला सांगण्यासारखे…
नाना पटोले यांच्या पाठोपाठ आशिष देशमुख यांनी नेमकी तोफ डागली नागपूर हिवाळी अधिवेशनाचे तोंडावर त्यामुळे खळबळ अधिक माजली विशेष म्हणजे याच अधिवेशनादरम्यान आशिष हे तटकरे किंवा अजितदादा यांना भेटल्याने
लोकांनी त्यातून वेगळे अर्थ काढले ज्या अर्थ काढण्याला तसा अजिबात अर्थ नाही म्हणजे पुढली निवडणूक आशिष देशमुख हे राष्ट्रवादीतर्फे लढविण्याची अजिबात शक्यता नाही, शरद पवार हे असे भलते सलते निर्णय घेणारेही नाहीत, इतर अनेक जेव्हा राष्ट्रवादीतून झपाट्याने बाहेर पडत होते तेव्हा क्षणिक फायद्याचा विचार न करता राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना घट्ट मिठी मारून बसलेल्या अनिल देशमुखांना डावलून शरद पवार नक्कीच आशिष देशमुख यांना आपल्या पक्षात स्थान देऊन उमेदवारी जाहीर करतील असे शंभर टक्के होणार नाही आणि हे आशिष यांना देखील तंतोतंत माहित आहे पण बंडखोरी करतांना त्यांनी एकाचवेळी काही क्षणांकरिता अनिल देशमुख आणि स्थानिक नागपूरकर भाजपा नेत्यांच्या गोटात खळबळ उडवून दिलेली आहे….
एक मात्र नक्की घडणार आहे, आशिष देशमुख आणि नाना पटोले पुन्हा एकदा त्यांच्या पूर्वीच्या पार्टीमध्ये प्रवेश करून मोकळे होतील ते दोघेही पुन्हा एकदा लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील आणि राज्यातल्या काँग्रेसला देखील बऱ्यापैकी तगड्या नेतृत्वाची पुढल्या साऱ्या निवडणूक लढविताना अशा नेत्यांची गरज असल्याने यांना प्रवेश देणे घेणे फारसे कठीण जाईल असे अजिबात नाही. एक मात्र कळीचा मुद्दा आहे, निवडणुका मग त्या लोकसभेच्या असोत कि विधानसभेच्या, सेना भाजपाच्या झंझावातासमोर टिकाव धरण्यासाठी पुन्हा एकदा राज्यातल्या राष्ट्रवादी तसेच काँग्रेसला आघाडी करून निवडणुका लढणे क्रमप्राप्त आहे, आणि ते अलीकडे काही दिवसात दिसूनही आले आहे, अगदी ज्याच्याकडे पृथ्वीराज चव्हाण हे शक्ती कपूर किंवा अमरीश पुरी म्हणून बघायचे तेच अजित पवार आता या चव्हाणांना किंवा काँग्रेस मधल्या इतरांनाही साक्षात हिरो वाटू लागले आहेत, नवीन निश्चल किंवा विजय अरोरा वाटू लागले आहेत म्हणजे उद्या एखाद्या जाहीर सभेत पृथ्वीराज यांनी अजितदादांना प्रेमाने जवळ घेतले किंवा अजितदादांनी चव्हाणांच्या कपाळाचे दीर्घ चुंबन घेतले तर फारसे आश्चर्य वाटून घेऊ नका, दोन्ही मित्र पक्षातली झोंबाझोंबी वाढलेली आहे…
एक मात्र नक्की भविष्यातल्या निवडणुकात काँग्रेस भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातून जिंकून आलेल्या नाना पटोले आणि काटोल विधानसभेला निवडून आलेल्या आशिष देशमुख यांची उमेदवारी जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीकडे आपली प्रतिष्ठा पणाला लावेल आणि असे घडले म्हणजे या दोघांना जर उमेदवारी मिळाली तर शरद पवार नक्कीच आपला नेहमीचा फॉर्म्युला वापरून मोकळे होतील, ते लोकसभेला प्रफुल्ल पटेल आणि विधान सभेला काटोलमधून अनिल देशमुखांना नक्की हेच सांगतील कि अपक्ष म्हणून हि निवडणूक लढवा, माझी ताकद तुमच्या मागे उभी असेल हे ध्यानात ठेवा. विशेष म्हणजे शरद पवार आपली सारी ताकद पणाला लावून अनिल दवषमुख यांना निवडून आणण्यात मोलाची सुप्त व गुप्त भूमिका पार पाडतील. फारतर अगदीच वाईटपणा घेणे नको म्हणून शरद पवार त्या लबाड प्रफुल्ल पटेलांना पुन्हा एकदा राज्यसभेवर निवडून आणून मोकळे होतील पण अनिल देशमुख यांना मात्र अपक्ष लढविण्याच्या सूचना देतील, कारण हेच कि नजीकच्या काळात होणाऱ्या बिधान सभेच्या निवडणुकीला अनिल देशमुख यांचे पारडे काहीसे जड झालेले आहे, तीच वस्तुस्थिती आहे. आता आणखी एक धक्कादायक सांगतो, जे तंतोतंत मला ठाऊक आहे ते सांगतो, पुढल्या लोकसभेत जर सत्तेवर भाजपा पुन्हा एकदा विराजमान होते आहे असे जर प्रफुल्ल पटेलांच्या ध्यानात आले तर ते नक्की राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन आणि पवारांना ठेंगा दाखवून भाजपा मध्ये प्रवेश करून मोकळे होतील आणि हेच घडण्याची अतिशय दाट शक्यता आहे बहुदा तेच घडणार आहे…
जे मला दिसते ते असे आहे, भाजपा ने म्हणजे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी शक्यतो अलीकडे आतून लाडावून ठेवलेल्या प्रफुल्ल पटेलांच्या कानफ़ुसक्या फारशा ऐकून न घेता त्या नाना पटोलेंची नाराजी दूर करावी आणि त्यांची हमखास जिंकून येणारी एक जागा न गमावण्याची काळजी घ्यावी कारण पटोले मग ते कोणत्याही चिन्हावर लोकसभेला सामोरे गेले तरी ते नक्की जिंकून येतील हे त्या लोकसभा मतदार संघातील फार मोठ्या प्रमाणावर असलेले कुणबी समाजाचे नेते मतदार कार्यकर्ते छातीठोकपणे आजच सांगून मोकळे होताहेत, नाना पटोले हेच पुढले खासदार असतील, त्या साऱ्यांचे अगदी उघड सांगणे आहे, त्यांचे अंदाज खरे आहेत. अंदर कि बात अशी आहे कि नाना पटोले यांना अधिक दुःख त्यांच्याकडे दस्तुरखुद्द पंतप्रधानांचे दुर्लक्ष झाले किंवा ते पटोले यांना चार चौघात घालून पडून बोलले याचे नाही तर भाजपा नेतृत्व स्थानीक पातळीवर त्यांच्यापेक्षा प्रफुल पटेल नामक लबाड नेत्याला प्राधान्य देते आहे, ते त्यांना अधिक वेदनामय झालेले आहे, त्यातूनच काही दिवसांपूर्वी पटोले यांचा मनात साठलेला साचलेला राग जोरात उफाळून वर आला आणि त्यांनी दंड थोपटले, ते भाजपा विरोधात रस्त्यावर उतरले…
तूर्त एवढेच!
पत्रकार हेमंत जोशी