घडामोडी आणि भानगडी २ : पत्रकार हेमंत जोशी
याआधीच्या लेखात नागपुरातले विशेषतः नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदार संघातले तापलेले राजकीय वातावरण, त्याविषयी लिहिल्यानंतर काही तासातच आमचे हे लिखाण त्या भागात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले, आणि काळ रात्री पासून माझे किमान दहा वेळा फोन खणाणले, जे लिहिले ते छान आहे पण आतली वस्तुस्थिती आणखी वेगळी असल्याचे दस्तुरखुद्द अनिल देशमुखांच्या एका अत्यंत विश्वासू मित्राने, स्थानिक नेत्याने थोडक्यात त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीने जे काय फोनवरून सांगितले ते तर आणखीनच धक्कादायक आहे, नागपूर जिल्ह्यातले राजकीय वातावरण या थंडीतही तापवणारे आहे, तेथे काहीतरी वेगळे घडते आहे…
जवळपास सतत २२ वर्षे आधी राज्यमंत्री तदनंतर पूर्णवेळ मंत्री म्हणून काम केलेल्या अनिल देशमुखांनी राजकीय महत्वाकांक्षेतून १९९५ नंतर बंधू रणजित देशमुखांशी तशी राजकीय फारकत घेतल्यानंतर हळूहळू त्यांनी थेट शरद पवार यांच्याशी आधी ओळख वाढविली नंतर लवकरच प्रफुल्ल पटेल यांचे खास असे संबंध स्थापित करून पुढे २००० नंतर थेट थोडक्यात राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ते शरद पवार अजित पवार विशेषतः प्रफुल्ल पटेल यांना घट्ट पकडून मोकळे झाले, राष्ट्रवादीमय झाले….
पण आता त्यांच्या त्या मित्राकडून जे कानावर पडले आहे ते मात्र भलतेच धक्कादायक आहे, राजकारणात काहीही घडू शकते, यावर ते एक बोलके उदाहरण ठरणार आहे. राष्ट्रवादी, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल या ज्या तिघांना गेले सतत १७-१८ वर्षे ज्या अनिल देशमुखांनी घट्ट मिठीत किंवा मुठीत पकडून ठेवले होते, त्यांची ती मिठी अलीकडे मोठ्या वेगाने ढिली पडलेली असून त्यांनी राष्ट्रवादी सोडल्यास फारसे यापुढे आश्चर्य वाटून घेऊ नये, अनिलबाबूंची म्हणे काँग्रेस नेत्यांशी झपाट्याने सलगी वाढलेली आहे, आणि राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनाही हेच वाटते, कम्पेअर टू आशिष देशमुख, त्यापेक्षा अनिल देशमुखांना उमेदवारी देणे म्हणजे आपला काटोल विधान सभा मतदारसंघातून उमेदवार आजच निवडून आलाय, त्यांना वाटते आहे म्हणून आशिष पेक्षा अनिलबाबुंना अधिक जवळ घेणे त्यांची ती पसंती आहे, आणि हे राष्ट्रवादीमध्ये झपाट्याने पसरल्याने ते त्यादिवशी तसे घडले असावे, म्हणजे हिवाळी अधिवेशनादरम्यान मुद्दाम मीडिया समोर अजितदादांनी आशिष देशमुखांशी केलेली बातचीत किंवा त्यांच्या एकमेकांच्या गाठीभेटी, मुद्दाम सर्वांसमोर उघड केल्या गेल्या जणू तो शरद पवार स्टाईलने अनिलबाबुंना दिलेले ते एक धक्कातंत्र होते, आम्हीही काय करू शकतो, राष्ट्रवादीने पुन्हा एकदा ताकदीने आपला काटोल विधानसभा मतदार संघ बांधणार्या अनिलबाबुंना चपराक देणारा तो एक राष्ट्रवादीतर्फे केविलवाणा प्रयत्न होता…
तसे बघितले तर विधानसभा निवडणूक दूर असतांनाच म्हणजे फार आधीपासून नागपूर जिल्ह्यातील काटोल हा विधानसभा मतदार संघ चर्चेत केवळ यामुळे आला कि भाजपाच्या तिकिटावर निवडून येऊनही विद्यमान आमदार आशिष यांनी भाजपा नेत्यांशी, थेट गडकरी आणि फडणवीसांशी आधी पंगा घेतला नंतर दंगा सुरु केला आहे. पण काटोलचे राजकारण केवळ देशमुख काका पुतण्याभोवती तेवढे फिरते आहे आणि या मतदार संघात भाजपा नेतृत्व झोपा काढते आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते नक्की चुकीचे आहे कारण या मतदार संघातून भाजपातर्फे पुढले उमेदवार, देशमुखांशी कायम पंगा घेणारे स्थानिक नेते आणि मोठा जनसंपर्क असलेल्या चरणसिंग ठाकूर यांना मोठी ताकद देते आहे, अत्यंत महत्वाचे म्हणजे, जेव्हापासून आशिष हे भविष्यातले आपले उमेदवार नसतील, फडणवीसांच्या लक्षात आले त्यांनी ठाकूर हेच जणू तेथले आजचे आमदार आहेत असे वलय आधी त्यांच्या भोवताली निर्माण केले आणि सार्वजनिक स्वरूपाच्या कामात त्यांना सहकार्य करायला सुरुवातही तेव्हाच केली, खूप आधी केली, आता बघूया काका पुतण्याच्या राजकीय भांडणात निदान यावेळी तरी चरणसिंग ठाकूर निवडून येतील कि छान तयारीला लागलेले अनिल देशमुख हेच निवडून येतील, तेथे काहीही होऊ शकते पण आजतरी अनिल देशमुखांचे पारडे सर्वाधिक जाड आहे, तेच प्रथम क्रमांकावर आहेत.एक नक्की यवतमाळ ते नागपूर दरम्यान राष्ट्रवादीने काढलेल्या शेतकऱ्यांच्या आक्रोश दिंडी मध्ये अगदी पुढे अनिल देशमुख हेच होते पण त्यांचे प्रफुल्ल पटेलांशी बिनसलेले संबंध, मला नाही वाटत जर प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीतून बाहेर पडले नाहीत तर अनिलबाबू तेथे राहणे, टिकणे शक्य आहे म्हणून जे काय माझ्याशी बाबूंच्या मित्राचे बोलणे झाले तेच घडते आहे, घडत असावे, अनिलबाबूंची पावले निदान आजतरी काँग्रेसकडे वाळू लागलेली आहेत, ते काँग्रेस मध्येच जातील असेच वारंवार वाटते आहे…
पत्रकार हेमंत जोशी