दोघे मित्र दोघेही गेले ३ : पत्रकार हेमंत जोशी
जेव्हा कोणी आसपास फिरकतही नव्हते तेव्हापासून मी आणि अनिल थत्ते ठाण्यातल्या त्यावेळेच्या म्हणजे ८० च्या दशकात वसंत डावखरे आणि आनंद दिघे यांच्याशी अतिशय क्लोज होतो, त्या दोघांवर अनिल थत्ते किंवा मी जेवढ्या अधिकाराने लिहू शकतो, असे पत्रकार आज क्वचित असतील, माझी वसंत डावखरे यांच्याशी आनंद दिघे यांनी आपणहून ओळख करून दिली होती, जी त्या दोघांशीही माझी मैत्री त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत टिकली. आनंद दिघे एखाद्याने चूक केली रे केली कि सरळ थोबाडात ठेवून द्यायचे मग मी त्यांच्याशी भांडून, तुम्ही त्या माणसाला बोलावून घ्या, सांगत असे आणि ते ऐकायचेही. एकदा त्यांची आणि त्यांच्या जिवलग मित्राची म्हणजे त्यावेळेचे ठाण्याचे महापौर वसंत डावखरे यांची मी एकत्र मुलाखत घेतली होती, पत्रकार गुरुदत्त लाड त्यावर छान आठवण सांगू शकेल. माझे अनेकदा डावखरेंशी वाद व्हायचे पण ते तेवढ्यापुरते, एकच सांगतो, मोठा नेता असूनही ते कायम नमते घायचे कारण आमचे नाते मैत्रीचे होते. माझे भावनिक लिखाणाचे तेही मनापासून चाहते होते. वास्तविक ते मृत्युशय्येवर असतांनाही त्यांनी निरंजनला सांगितले, हेमंतच्या मुलाचे लग्न आहे, तू जाऊन ये आणि निरंजन त्याही अवस्थेत येऊन गेले….
माझा एक जिवलग पत्रकार मित्र, सतत पंगे घेणारा तो काही वर्षे विनाकारण तुरुंगात खितपत पडला होता, तो ठाण्यातल्या डावखरेंसारख्या नेत्यांशी लिखाणातून पंगा घेऊन दंगा करीत असे मग कुठल्यातरी प्रकरणात त्याला पद्धतशीर गोवण्यात आले आणि तुरुंगात डाम्बल्या गेले, काही वर्षे उलटली, एकदा त्याचा मला थेट तुरुंगातून फोन आला, हेमंत मला आता बाहेर यायचे आहे, हे काम वसंत डावखरे अगदी सहज करू शकतात. मी उठलो आणि मंत्रालयासमोर असलेल्या डावखरेंचा बंगल्यात गेलो त्यांना म्हणालो, अमुक एक पत्रकार पुढल्या चार दिवसात तुरुंगातून बाहेर येणे गरजेचे आहे आणि हे काम तुम्ही करावे असा माझा हट्ट आहे, तो जोपर्यंत बाहेर येत नाही, मी दररोज येथे येऊन तुमच्याकडे धरणे धरेल आणि माझा तो लढाऊ सखा पुढल्या दोनच दिवसात बाहेर आला, मी डावखरेंना धन्यवाद देतांना अक्षरश: रडून मोकळा झालो..
अधिवेशन मग ते कोणतेही असो अगदी नागपुरातलेही, डावखरे यांच्या कार्यालयात तेथे येणारांच्या जेवणावळी चालायच्या, ते मला देखील जेव म्हणायचे, मी जेवत नसे, माझे त्यांना सांगणे असे, तुम्ही आवळा देऊन कोहळा काढता, मग ते शिवी हासडून मोकळे व्हायचे. तिकडे दत्तात्रेय म्हैसकर,पैशांनी अति मोठे असूनही खूप साधे होते, अगदी आत्ता आत्ता पर्यंत ते कॅम्री हि टोयोटोची जेमतेम किंमत असलेली कार वापरायचे आणि डोंबिवलीला तर बहुतेकवेळी लोकल पकडून जायचे. ते डावखरे यांच्या मंत्रालयासमोरील त्या बंगल्यावर दुपारी अनेकदा आराम देखील करायचे आणि तेथेच अगदी साधे जेवण घेऊन मोकळे व्हायचे. जसे नागपूर अधिवेशनात पत्रकार उदय तानपाठक याचे वळत घातलेले, उडून आजू बाजूला पडलेले शर्ट्स हमखास त्याला आणून दिले जातात एवढे ते आगळे वेगळे असतात जसे बहुतेक सिनेमात राजेंद्र नाथचे असायचे, नागपुरात अधिवेशनादरम्यान पत्रकार जेथे राहतात त्या आवारात एक न्यायालय देखील आहे, एकदा उडत उडत एक शर्ट थेट न्यायाधीशांच्या टेबलवर येऊन पडला, अरे, हा तर पत्रकार उदय तानपाठक यांचा शर्ट आहे, असे ते न्यायधीश मनाशी म्हणाले आणि उदय महाराजांचा शर्ट थेट आपल्या हाती म्हणून ते गहिवरले देखील, चड्डी हाती आली असती तर ती त्यांनी नक्की परत केली नसती, आपल्या संग्रहात ठेवली असती, त्यांनी थेट उदय यांचे निवास गाठले. उद्या उदय यांचे कपडे हाती घेऊन नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी जरी त्यांच्या घरी आलेत तरी मला फारसे आश्चर्य वाटणार नाही कारण उदय हे असे व्यक्तिमत्व आहे ज्याच्यासाठी प्रेमातून प्रसंगी पृथ्वीराज चव्हाण सारखा खडूस देखील हाताने तयार केलेला टिफिन त्याच्या घरी मुलुंडला पाठवून मोकळा होईल, किंवा दीक्षितांची माधुरी देखील मधल्या सुटीत त्याला प्रेमाने दोन घास भरवितांना आपल्याला दिसेल. आणखी एक छोटीशी गम्मत सांगतो, नॉट फॉर सेल असे लिहिलेली म्हणजे फुकटात मिळणारी बाटली नागपूर अधिवेशनातल्या पत्रकारांच्या आवारात अशी बाटली दिसली रे दिसली कि ती जाधव यांचीच आहे याची खात्री धरून ती थेट त्याच्या खोलीत पाठविण्यात येते…
जगप्रसिद्ध आयआरबी आणि एमपी लिमिटेड कंपनीचे दत्तात्रेय म्हैसकर यांचेही हे असेच या डोंबिवलीकर उदय सारखे होते म्हणजे त्यांची ती कॅम्री जेथे, तेथे आसपास म्हैसकर आहेत, त्यांना भेटण्यासाठी आलेल्यांना माहित व्हायचे, बडेजाव न दाखविता दत्तात्रेय म्हैसकर अखेरपर्यंत एखाद्या व्रतस्थासारखे जगले मोठे उद्योगपती असूनही…मी म्हणालो तेच सत्य होते, वसंत डावखरे अगदी भल्याभल्यांचे थेट किचन फ्रेंड होते, आधी ते त्या त्या घरातल्या माउलीचे मन जिंकायचे, त्यांनी ते फार सोपे करून ठेवले
होते म्हणजे डावखरे कोणत्याही मोठ्या थोर व्यक्तीकडे जातांना हमखास त्या घरी असलेल्या प्रमुख स्त्रीसाठी पैठणी घेऊन जायचे आणि घरातल्याची मने क्षणार्धात जिंकून मोकळे व्हायचे म्हणून मी त्यांना गमतीने हिणवत असे, तुम्ही आवळा देऊन कोहळा काढता म्हणून, ते आणखी खूप मोठे झाले असते पण राज्यभर ओळखी असूनही त्यांनी आधी स्वतःला ठाणे मुंबई बाहेर नेते म्हणून मोठे केले नाही, नको त्या बाबतीत, नको त्या ठिकाणी, गरज नसतांना ते गुंतून पडले अन्यथा ते आज या राज्यातले शरद पवारांच्या खालोखाल या राज्याचे नेतृत्व गाजवून मोकळे झाले असते, जाऊ द्या आता त्या विषयांवर येथे आठवण काढणेही नको….
एकच सांगतो, जेवढ्यास तेवढे संबंध ठेवून त्रास करून न घेणे केव्हाही चांगले, हे मी शरद पवारांकडून शिकलो, त्याचे असे झाले जेव्हा पत्रकारितेत माझे वय अगदीच जेमतेम होते तेव्हा पवारांचे दर्शन घेतले नाही असे माझे कधीही झाले नाही पण एक दिवस त्यांचे टाळके कुठे फिरले माहित नाही, त्यांनी मला टाळणे सुरु केले, ज्याचा मला पुढे काही महिने अतिशय मानसिक त्रास झाला पण एक बरे झाले त्यानंतर मात्र ओळखी प्रचंड पण भावनिकरीत्या अति जवळ जाणे मी बंद केले, जेवढ्यास तेवढे, मी वागणे सुरु केले, डोक्याला ताप होत नाही, पण ज्यांनी मोठे केले त्यात प्रमुख शरद पवारही, म्हणून मी त्यांना जिव्हारी लागेल असे कधीही लिहीत नाही, त्यांचे त्यावेळी मीठ खाल्ले हे मी लपविणे योग्य नाही, त्यांनी मला माझ्या पडत्या काळात जवळ घेतले होते, खूप लाड केले होते, थोडक्यात डावखरे असोत कि म्हैसकर, नक्की संबंध चांगले ठेवायचे अशा कित्येक बड्या मंडळींशी, पण खूप क्लोज होणे नको, त्रास होतो आणि लिहिण्यावर देखील बंधने येतात, वसंत डावखरे गेले, पण अनेक आणि अनेकांच्या कडू गोड आठवणी मागे ठेवून…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी