चला हवा येऊ द्या : पत्रकार हेमंत जोशी
www.vikrantjoshi.com
www.offtherecordonline.com
गयावया करणे किंवा चाटूगिरी करणे या वाक्प्रचारांचा नेमका वाक्यप्रयोग बघायचा ऐकायचा असेल तर झी वाहिनीवरील अलीकडे सुरु असलेल्या म्हटल्यापेक्षा जबरदस्तीने सुरु ठेवलेल्या, चला हवा येऊ द्या, या विनोदी शो चे भाग नजरेखालून घाला, व्यापक या दोन्ही वाक्प्रचारांचे अर्थ त्यातून विशेषतः विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेतून समजतील…
जेमतेम अनुभव जेमतेम वय जेमतेम अभिनय आणि जेमतेम अंगकाठी लाभलेल्या डॉ निलेश साबळे या जेमतेम अभिनेत्याच्या भरवशावर फारतर काही भाग लिहून आणि संचालन करून घेतले असते तर अमिताभचा कौन बनेगा करोडपती जसा आजही लोकप्रिय आहे किंवा सतत १५ वर्षे जसे आजही याच झी वाहिनीवरील आदेश बांदेकरांच्या होम मिनिस्टर या शो चे आकर्षण कायम टिकून आहे तेच चला हवा येऊ द्या बाबतीत घडले असते पण अतिरेक केल्या गेला आणि साऱ्यांचेच बारा वाजले म्हणजे या कार्यक्रमाचे आणि त्यात काम करणाऱ्या आधी उत्कृष्ट वाटलेल्या विनोदी नटांचे आणि दस्तुरखुद्द डॉ निलेश साबळे यांचे देखील….
एकतर मी अगदी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे कि वृत्तपत्रांनी आणि वाहिन्यांनी तद्दन धंदेवाईक असलेल्या टूर कंपन्यांना किंवा विवाह मंडळांना केवळ जाहिरातींच्या म्हणजे पैशांच्या हव्यासापोटी लोभापायी फार जवळ करू नये, त्यापुढे जाऊन मी म्हणेन, सरकारचे या दोन्ही उद्योगातील मालकांनी चालविलेल्या सामान्य लोकांच्या फसवणुकीकडे अजिबात लक्ष नाही, या राज्यातले तमाम विवाह मंडळे आणि टूर्स कंपन्या आम्हा मराठींना किंवा या राज्यातल्या साऱ्यांनाच अतिशय नियोजनपूर्वक आर्थिकदृष्ट्या फसवून लुबाडून मोकळे होताहेत, स्वतः आर्थिक दृष्ट्या गब्बर होताहेत त्याकडे ना आयकर खात्याचे लक्ष आहे ना पोलिसांचे ना राज्य सरकारचे….
अतिशय ग्ल्यामरस पद्धतीने या दोन्हीही धंद्यांचे सादरीकरण करून पै पै साठवून ठेवलेले मराठी कुटुंबे आर्थिक दृष्ट्या ज्या पद्धतीने या दोन्हीकडे बळी पडताहेत, बघून अंगाची आग आग होते. विवाह मंडळे आणि तमाम टूर्स कंपन्या म्हणजे आम्हा मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांच्या खिशांना कात्री लावणारे लबाड लुटारू भामटे उद्योग आहेत असे मी घेतलेल्या अनुभवातून, लोकांनी सांगितलेल्या अनुभवातून ठामपणे सांगू शकतो….
चला हवा येऊ द्या, हा कार्यक्रम आयोजक वीणा टूर्स यांनी जो जगभरातून फिरवून आणला आहे आणि त्याचे जे विविध एपिसोड सध्या दाखविले जात आहेत त्यातील विनोद आता बाजूला पडला कारण डॉ. निलेश साबळे यांचे रटाळ लिखाण रटाळ अभिनय आणि रटाळ संचलन हे तसेही डोक्याला झिणझिण्या आणणारे आणि इकडून तिकडून त्या वीणा टूर्स चे या विविध एपिसोड मधून उदात्तीकरण, आ रा रा रा म्हणायची वेळ खरोखरी सुद्न्य दर्शकांवर झी वाहिनीने आणून ठेवलेली आहे. वाईट याचे वाटते कि याच चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून सुरुवातीला जे भारत गणेशपुरे, भाऊ कदम,सागर कारंडे थोडक्यात त्यामध्ये अभिनय करणारे सारेच्या सारे दर्जेदार कलावंत या मराठीच्या मनोरंजन क्षेत्राला मिळाले होते, तेच ते आणि तेच ते त्यांच्याकडून प्रत्येक भागात भिक्कार अभिनय करवून घेऊन त्यांना भविष्यात या कार्यक्रमाने वाया घालविले असे म्हणणे शंभर टक्के योग्य ठरावे….
लोकमान्य वाहिन्या किंवा लोकमान्य वृत्तपत्रांनी वाट्टेल ती प्रसिद्धी देऊन लोकांना दरदिवशी आर्थिकदृष्ट्या अतिशय लबाडीने लुबाडणाऱ्या कोणत्याही विवाह मंडळांचे किंवा टूर्स कंपन्यांचे उद्दात्तीकरण करू नये असे आवाहन येथे या ठिकाणि करावेसे वाटते. वृत्तपत्रातून ज्या ज्या टूर्स कंपन्यांचे मालक लेख लिहून मोकळे होतात त्या त्यांच्या जाहिराती असतात, ते त्यांचे लेख म्हणून छापल्या जात नाहीत पण सामान्य वाचकांना वाटते, अरे वा, लोकसत्ता सारखे अनेक विश्वसनीय दैनिके यांचे लेख छापून आणतात म्हणजे हे व्यवसाय विश्वासाचे प्रतीक आहेत पण असे अजिबात नसते, वृत्तपत्रे आणि असे तद्दन फसवे व्यवसायिक पैसे मिळवून मोकळे होतात आणि आर्थिक मानसिक फसवणूक मात्र मराठी माणसांची होते….
डॉ. निलेश तुम्ही त्या वीणा टूर्स ला खुश करण्यासाठी किती रटाळ कंटाळवाण्या पद्धतीने हो सादरीकरण करून टूर्स कंपन्यांच्या फसवणुकीला साथ देता आहेत, हे तुमच्या नालयाकपणाचे लक्षण आहे, केवळ चार पैसे झटपट खिशात पडताहेत म्हणून सामान्य मराठी माणसांची या अशा आधी लोकप्रिय ठरलेल्या मनोरंजनपर कार्यक्रमातून फसवणूक करणे सोडून द्या. दुसऱ्या चांगल्या पद्धतीने पैसे मिळवा. थांबवा तुमची ती हलकट कंटाळवाणी बडबड. आता, चला हवा येऊ द्या या कार्यक्रमालाच मनापासून म्हणावेसे वाटते, चला हवा येऊ द्या…चला हवा येऊ द्या…
पत्रकार हेमंत जोशी