भय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी
आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे पुढे त्या भरवशावर पैसे कामविणाऱ्यांचे लोकांना फसविणाऱ्यांचे प्रमाण फार मोठे आहे. मुंबईतीलाच एक फ्रॉड पत्रकार आहे, त्याने ज्यांना ज्यांना फसविले आहे असे किमान शंभर सत्य किस्से तर माझ्याकडेच पुराव्यांसहित आहेत, म्हणजे हा असा बेरड आणि चीटर पत्रकार कि ज्याने लग्न न करता मूल जन्माला घातलेले आहे, ना तो त्या मुलाचा स्वीकार करायला तयार आहे ना त्या एकट्या पडलेल्या तरुण स्त्रीला तो आधार वाटतो आहे, तरीही हे महाशय ताठ मानेने जगताहेत, कधी शरद पवार त्यांना डोक्यावर घेतात तर कधी या पत्रकार व भामट्या पद्धतीने नेतेगिरी करणाऱ्याला थेट देवेंद्र फडणवीस जवळ घेऊन मोकळे होतात. बड्या धेंडांसोबतचे फोटो लोकांना दाखवून त्यांची आर्थिक आणि शारीरिक फसवणूक करणे त्याला त्यातून सहज शक्य होते. नेत्यांनी, मान्यवरांनी कोणत्याही व्यक्तीसंगे फोटो काढण्यास परवानगी देण्याअगोदर नेमकी माहिती घेणे आवश्यक असते कि समोरची व्यक्ती त्या लायकीची आहे किंवा नाही….
थेट राष्ट्र्पतींपासून तर पंतप्रधानांपर्यंत जो तो त्या भय्यू महाराजांना पाया पडतोय, असे फोटो मुद्दाम व्हायरल केले जातात आणि भय्यू महाराज नेमके देव कसे परमेश्वर कसे युवराष्ट्रसंत कसे, महान कसे, संत महाराज कसे असे मोठ्या खुबीने सांगितल्या जाते आणि पुढे त्यातून घडते ती सामान्यांची फसवणूक, वास्तविक या देशातले मान्यवर का म्हणून भय्यू महाराजांच्या पाया पडून मोकळे होतात हे त्यांनी नेमके लोकांसमोर येऊन सांगायला हवे. असे कोणते चांगले अनुभव या बड्या मंडळींना त्या भय्युजीपासून आले आहेत, ते स्पष्ट व्हायला हवे….एखाद्या मान्यवरासंगे फोटो काढल्या गेला आहे म्हणजे तो माणूस त्या नेत्याशी किंवा अन्य कुठल्याही मान्यवरांशी क्लोज आहे, त्यांच्या जवळचा आहे, असे अजिबात नसते. उद्या मी सई ताम्हणकर संगे फोटो काढून घेतला म्हणजे माझे आणि तिचे सध्या प्रेमप्रकरण सुरु आहे असे अजिबात नसते आणि असे असेल तर उद्या मी पत्रकार राजन पारकर याचे अभिनेत्री सोनाली सांगे फोटो काढण्याची व्यवस्था करून मोकळा होतो, मग बंटी पाटलांसारख्या एखाद्या नेत्याने असा अर्थ काढायचा का कि तिचे राजन पारकर सोबत देखील प्रेमप्रकरण सुरु आहे…थोडक्यात अमुक एखाद्या बड्या व्यक्तीसंगे फोटो काढून घेतले म्हणजे तो फोटो काढून घेणारा देखील खूप मोठा आहे असे नसते उलट काढून घेतलेल्या फोटोंचे भांडवल करणारे नेहमी चीटर असतातच हे गृहीत धरून आपण कायम सावधगिरी बाळगावी….
ज्या इंदोर मध्ये भय्यू महाराजांचा मुख्य आश्रम आहे, निवासस्थान आहे तेथल्या एका पत्रकाराने, संझा लोकस्वामी नावाने वृत्तपत्र चालविणाऱ्या जितू सोनी या पत्रकाराने भय्यू महाराजांचे एक प्रकरण बाहेर काढून सध्या मोठी खळबळ उडवून दिली आहे. किंबहुना सोनी यांनी जे प्रकरण बाहेर काढले आहे तीच भय्यू महाराज यांची सर्वसामान्य देव भोळ्या भक्तांची फसवणूक करण्याची नेहमीची पद्धत आहे असे आता उजेडात येते आहे, ज्यांना हे असे विकृत अनुभव भय्यू महाराजनकडून आले ते हळूहळू बोलायला लागले आहेत, प्रकरण फार गंभीर आहे. मुंबईतील एका श्रीमंत व्यापाऱ्याला इंदोरच्या आश्रमात पैशांनी आणि शरीराने कसे नागडे करून लुटले, ते प्रकरण पुराव्यांसहित संझा लोकस्वामी ने छापले आहे, ‘ लेटेस्ट आयटम भय्यू अघोरी ‘ या मथळ्याखाली दिलेल्या माहितीने जे भय्यू महाराजांना आत बाहेर ते कसे ओळखत नाहीत अशा भक्तांमध्ये या लिखाणाने खळबळ उडवून दिली आहे…
हे प्रकरण जसेच्या तसे येथे देत आहोत अवश्य वाचावे, वाचल्यानंतर भोळ्या भाबड्या मंडळींनी हे लक्षात घेतले पाहिजे कि या पृथ्वीतलावर कोणीही परमेश्वरी अवतार धारण करून आलेले नाही त्यामुळे अशा बुवा बाबांवर अजिबात विसंबून राहू नये, विश्वास ठेवू नये….
पत्रकार हेमंत जोशी