असे का घडते आहे ? : पत्रकार हेमंत जोशी
आम्हाला तलवारी काढण्याची वेळ आणू नका किंवा आम्हाला तलवारी काढाव्या लागतील, असे काहीतरी खासदार संभाजी राजे म्हणाले नि त्यावर अतिशय प्रगल्भ समर्पक थोडक्यात पण नेमकी प्रतिक्रिया मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली, ते एवढेच म्हणाले, राजा हा रयतेचा म्हणजे लोकांचा जनतेचा असतो, आता राजा रयतेवर तलवार काढणार का, वडेट्टीवारांचे हे म्हणणे बोलणे खूप काही सांगून गेले, ज्यावर मला वाटते संभाजी राजे यांनाही केवळ सारवासारव करावी लागली. तसेही मला कायम याचे मोठे वाईट वाटते कि जसे इतर संत महात्मे किंवा राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत आपल्या या राज्यात घडत आले आहे नेमके जे शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडायला नको होते ते बहुसंख्य मराठा नेत्यांनी आणि त्यांच्या आंदोलनाने या राज्यात नकळत घडवून आणले त्यांनी थेट शिवाजी महाराजांना केवळ मराठा समाजापुरते मर्यादित करून टाकले जे अत्यंत दुर्दैवी असे घडते आहे, ज्या शिवाजी महाराजांना रयतेचा प्रामाणिक राजा सतत आणि आजतागायत म्हटल्या जायचे म्हटल्या जाते त्या शिवाजी महाराजांना असे एका जातीपुरते मर्यादित करून इतिहासाची पाने बदलायला भाग पाडू नका. जसे काही ब्राम्हणेतर नालायकांनी सावरकर टिळक आगरकरांना ब्राम्हणांपुरते मर्यादित करून सोडले तेच जर शिवाजी महाराजांच्या बाबतीत असे घडणार असेल आणि त्यांचे वंशज त्यासाठी रयतेवर तलवारी उपसणार असतील तर मराठेतर देखील एक दिवस काश्मिरी पंडितांसारखे महाराष्ट्रातून इतरत्र स्थलांतरीत होण्या नक्की सुरुवात करतील. मराठ्यांनो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाव किंवा खेड्यातला, शहरातला राजा किंवा कप्तान हा कायम आजतागायत फक्त आणि फक्त मराठा हाच आहे आणि होता, राजाने स्वतःच स्वतःविरुद्ध स्वतःसाठी हे आंदोलन सुरु करून का म्हणून स्वतःला मराठेतर मंडळींच्या हृदयातले स्थान कमी करून घेण्यास सुरुवात केली आहे ?
या राज्यात गेल्या काही वर्षात काँग्रेस पक्षाची अवस्था शोले मधल्या ए. के. हंगलसारखी खंगलेली दुभंगलेली खालावलेली दिसते आहे पण पुन्हा एकवार ते सत्तेत आल्याने त्यांच्या विशेषतः कार्यकर्त्यांच्या अपेक्षा नक्की पल्लवित झाल्या आहेत. रात्रीच्या वेळी एखाद्या नवतरुणीच्या तिच्या कायम पाठ करून झोपणाऱ्या कायम कोमेजलेल्या नवऱ्याकडून अचानक एकेदिवशी आशा पल्लवित व्हाव्यात तसे या राज्यातल्या काँग्रेसबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटू लागलेले आहे आणि हे असे वाटणे शुभ लक्षण आहे मानण्यास हरकत नाही. आजही राज्यातल्या काँग्रेस मध्ये अनेक नेते आहेत म्हणजे विजय वडेट्टीवार आहेत, नितीन राऊत आहेत, अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण आहेत नाही म्हणायला त्यांचे ए. के. हंगल किंवा रवी पटवर्धन सुशीलकुमार शिंदे आहेत पण वर दिल्लीत ज्यांचे चालते किंवा चलती आहे त्यात प्रमुख या दिवसात प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचे सुपुत्र राजीव सातव हे आहेत, मी तर आजच तुम्हाला सांगून ठेवतो कि जर उद्या येथे पुन्हा एकदा काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना सांगून आली तर मराठेतर मधून राजीव सातव किंवा मराठा म्हणून बाळासाहेब थोरात यापैकी एक नक्की असतील. बाळासाहेब थोरात कमी बोलणारे पण मितभाषी आणि मेहनती त्यामुळे एकाचवेळी ते प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री म्हणून यशस्वी आहेत. महत्वाचे म्हणजे अशोक चव्हाण ह्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षावर जशी हुकमत होती म्हणजे त्यांना कोणी पुढे पुढे केलेले पसंत नसे नेमके त्यांच्या विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्या कामाची पद्धत आहे म्हणजे अमुक एखादा नेता किंवा कार्यकर्ता आपणहून पुढे जाण्यासाठी काहीतरी वेगळे करून दाखवत असेल, धडपडतांना दिसत असेल तर बाळासाहेब त्याला न अडवता उलट प्रोत्साहन देऊन मोकळे होतात अर्थात प्रदेशाध्यक्ष म्हणून तेही योग्य होते पण हेही अधिक योग्य आहेत असे थोरातांच्या बाबतीत म्हणता येईल, सांगता येईल…
दिवंगत शंकरराव चव्हाणांच्या मंत्री मंडळात रजनी सातव राज्यमंत्री होत्या, नंतरच्या काळात भाजपा आणि शिवसेना त्यांच्या जिल्ह्यात झपाट्याने पुढे आली आणि अशोक चव्हाण यांनाही त्या भागात माळी समाजाच्या स्त्री नेत्याला पुढे न येऊ देण्याचे मनात असल्याने रजनीताई काहीशा विस्मरणात गेल्या खऱ्या पण पुढे लवकरच ती कसर त्यांच्या खऱ्या अर्थाने काँग्रेस मध्ये लहानाचे मोठे होऊनही सुपुत्र असलेल्या राजीव सातव यांनी भरून काढली. यावेळी देखील राजीव सातव यांना लोकसभा लढवण्याची संधी होती तसे त्यांना वरून सांगण्यात आले होते पण राजीव यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला त्याऐवजी दिल्लीत राहून त्यांनी काँग्रेस पक्ष संघटना सांभाळणे पसंत केले एवढेच काय, पुढे महाराष्ट्रात महाआघाडी सत्तेत आल्यानंतर राजीव यांनी महत्वाच्या खात्याचे मंत्रिपद स्वीकारावे असे त्यांना त्यांच्या श्रेष्ठींनी त्यादिवसात अनेकवेळा सांगितले पण राजीव सातव यांनी अतिशय नम्रतेने मंत्री होण्यास साफ नकार दिला, सत्तेपासून आपणहून दूर राहण्याचा त्यांच्या स्वभावातला हा मोठेपणा त्यातून आजघडीला राजीव यांना वर दिल्लीत त्यांच्या पक्षात अतिशय आदराचे व मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. अगदी अलीकडे मला रजनीताई म्हणाल्या कि खूप लहान वयात ज्याच्या बापाचे छत्र देवाने हिरावून घेतले तो राजीव मात्र त्यांच्यासठी गॉड गिफ्ट आहे. कदाचित आपल्या या राज्यातल्या सामान्य जनतेला राजीव सातव कोण हे माहित नसेल पण लक्षात ठेवा अशा निष्ठा व त्यागाचे प्रतीक असलेले नेते या राज्याची गरज आहे भलेही अशांचा पक्ष कोणताही असला तरी…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी