उद्धव सेना ५ : पत्रकार हेमंत जोशी
उद्धव ठाकरे रस्त्याने ताठ मन करून आणि छाती फुगवून चालतात कारण त्यांचा मुलगा त्यांचा आदित्य बापाचा द्वेष राग मत्सर करीत नाही आणि हे भाग्य ज्या बापाच्या वाटेला येते तो नशीबवान असतो, भाग्यवान ठरतो. मुलांना दाबून ठेवू नका त्यांना उंच उडू द्या म्हणजे ते आदित्य ठाकरे होतील, सचिन तेंडुलकर ठरतील. राजकीय वंशावळीत हे क्वचित घडते, राजकारणात तू फार पुढे पुढे करायचे नाही हे पश्चिम महाराष्ट्रातील एका दिवंगत नेत्याने प्रत्यक्ष बापापेक्षा अधिक गुण असलेल्या मुलास सांगितल्यानंतर पुढे मुलाने देखील बापास त्यांच्या मालकीच्या शैक्षणिक संकुलात क्षेत्रात पाय ठेवू दिला नाही याउलट त्याने आपल्या काकाला अधिक जवळ केले होते. उद्या समजा अजितदादा त्यांच्या मुलांना हे करू नका ते करू नका, राजकारणात येऊ नका, स्वतःचा व्यवसाय उघडू नका असे कायम पोटच्या मुलांवर बिंबविणारे असतील तर मुलांनी करावे तरी काय, त्यातून त्यांना नैराश्य येणे स्वाभाविक आहे, असा बाप घरी यायच्या आधी मुले घराबाहेर पडतात आणि बाप बाहेर पडल्यानंतर घरी परततात कारण त्यांना स्वातंत्र्य न देणाऱ्या बापाचे तोंड देखील बघायचे नसते, अर्थात अजितदादांचे हे उदाहरण येथे सहजच दिले ते खोटेही असू शकते.मी जे तुम्हाला सांगतो, जे लिहितो ती माहिती अतिशय आतल्या गोटातून मिळालेली असते हे कायम लक्षात असू द्या. बाळासाहेब गेल्यानंतर काही काळ उद्धव ठाकरे मनाने खचले होते आणि शरीराने खंगले होते, त्यांनी आजारपण काढले होते पण त्यांना हिम्मत दोघांकडून मिळाली, रश्मीवाहिनी आणि आदित्य ठाकरे या दोघांकडून, असेही म्हणता येईल कि बाळासाहेब गेले आणि आदित्य अधिक जोमाने कामाला लागल्याने उद्धवजी नैराश्येतून फार लवकर बाहेर पडले,बघता बघता बाळासाहेबांच्याही पुढे निघून गेले, आणि हे असे घडेल, कोणालाही वाटले नव्हते याउलट राज ठाकरेच बाळासाहेबांची जागा घेतील जो तो म्हणत होता, ते घडलेलंही असते जर राज यांना सेनेतून बाहेर पडावे लागले नसते तर, पण शेवटी त्यांचाही नंबर लागला…
आदित्यच्या वयाच्या आसपास असलेल्या विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या मुलांना केव्हाच त्याने मागे टाकले आहे किंबहुना आदित्य त्यात पहिल्या क्रमांकाने पास झालेला आहे, त्याच्या आसपास देखील कोणी पोहोचलेले नाही, जयंत पाटील, अजित पवार इत्यादी नेत्यांना ते जमले नाही जे उद्धव ठाकरे यांना जमले आणि अशा या नेत्यांना स्वतःलाच अजून वाटते कि आपली मुले नव्हे आपणच तरुण आहोत, लग्नाचे आहोत. पुढले जाऊन सांगतो, राज्यातली प्लास्टिक बंदी हे पर्यावरण मंत्री रामदास कदमांचे नव्हे तर आदित्यचे यश आहे, त्यांनीच तसेआदेश कदमांना दिले होते, कोणतीही तोडपाणी न करता आपल्याला प्लास्टिक बंदी अभियान राबवायचे आहे असा दम आदित्यने दिल्याने निदान ते एक काम तरी कदम यांच्या कार्यालयातून चांगले झाले….
आदित्यची काम करण्याची पद्धत रा. स्व. संघासारखी आहे, अतिशय खुबीने त्याचे कार्य तो सुरु ठेवतो आणि हाती घेतलेली मोहीम यशस्वी करूनच दाखवतो. माझ्या घराखाली जुहू गार्डन आहे, तेथे मी अनेकदा फिरायला जातो. अलिकडल्या वर्षा दोन वर्षात त्या गार्डन मध्ये जिम उभारल्या गेल्याने आसपासचे म्हणजे अगदी मुस्लिम स्त्रिया देखील तेथे अगदी बुरखा ओढून व्यायाम करतांना दिसतात आणि
हे असे जिम्स मुंबईतल्या रस्त्यारस्त्यावर उभारल्याचे श्रेय द्यावे ते फक्त आणि फक्त आदित्य ठाकरेला, असे म्हणता येईल कि मुंबई महापालिकेचा खऱ्या अर्थाने इमेज डेव्हलप करतांना त्याने खुबीने उपयोग करून घेतला आणि लोकांच्या विशेषतः तरुणांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आणि असे उपक्रम राबविल्यानेच अलीकडे आदित्य ठाकरे यांनी थेट अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला चारी मुंड्या चित करून मुंबई विद्यापीठाच्या त्या सिनेट निवडणुकीत दहा पैकी दहा जागा जिंकून घेतल्या, विरोधकांची अनपेक्षित वाट लावली….
आजच्या युवा पिढीने त्याच्या कार्यपद्धतीचा अगदी शिकवणी लावून अभ्यास करावा. यापुढे अनेक वर्षे विधान परिषद सदस्यांची जी पदवीधर मतदारांतून निवड होते तेथे देखील या पट्ठ्याने तब्बल ४६००० मतदार नोंदवून घेतल्याने यापुढे शिवसेनेच्या उमेदवाराला परमेश्वराला देखील पराभूत करणे अशक्य आहे. एवढेच सांगतो, नेते मग ते सेनेतले असतील किंवा या राज्यातले, अनेकांनी आदित्यचे शिवसेनेत नेता म्हणून ऍक्टिव्ह होणे हसण्यावारी नेले होते त्या सर्वांचे दात पडले. ज्या आदित्यलाहे सारे इटुकला पिटुकला इवलासा नखाएवढा लुंगापुंगा चिमुरडा चिमणा छोटासा सानुला लेकुर्डा छोटेखानी समजले तो नेतृत्वात विशाल महाकाय भलामोठा कसा त्याने ते फार लहान वयात दाखवून दिले, आता तर त्याने स्वतःची टीम देखील उभी केलेली आहे, समाधान सदा सरवणकर सारखे धाडसी तरुण त्याने मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून धाडले आहेत किंवा सुरज चव्हाण सारख्या नजीकच्या सवंगड्याला थेट सेनेतले नेतेपद मिळवून दिले आहे. पुढल्या विधानसभा निवडणुकीनंतर तुम्हाला हे चित्र विधानसभेतही दिसेल त्याची तशी तयारी आहे….
जो धैर्यशील पराक्रमी असूनही डोक्यात मस्ती जाऊ न देता भेटायला येणाऱ्यांशी, वडिलधाऱ्यांशी लोकांशी सर्वांशी आदराने वागतो आणि नेमके शब्द त्यात्या वेळी बोलण्यातून वापरतो, जो गर्वाने गलेलठ्ठ होत नाही तोच नेता होण्यास लायकीचा असतो, मोठा नेता होण्याची त्याच्यात नक्की क्षमता असते. आदित्य ठाकरे तुमचे छान सुरु आहे…
तूर्त एवढेच.
पत्रकार हेमंत जोशी