गुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी
११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला सहज चकवा दिला होता त्याच मृत्यूला त्यांनी आपणहून बोलाविले आणि अचानक ते वरच्या प्रवासाला निघून गेले, सर्वाधिक फोन त्या दोन दिवसात अनेकांचे मला आले आणि असे फोन अपेक्षितच होते, मी नेमके काय म्हणतो हे सर्वांना ऐकायचे असावे, ऐकायचे होते, कारण जे अगदीच बोटावर मोजण्या इतके अविनाश दुधे सारखे निरपेक्ष त्यांचे चार दोन क्रिटिक होते, मला वाटते त्यात मी सर्वाधिक आघाडीवर होतो…
पण ११ तारखेच्या आधी चार दोन दिवस जे घडले ते यापुढे मला न विसरता येणारे किंवा मनाला चटका लावून गेलेले, हे असे नक्की निघून जायचे याचा सरळ अर्थ आहे त्यांनी ते आधीच ठरविलेले होते, मला हे असं वाटते, कारण त्याचे असे झाले, ११ तारखेच्या केवळ दोन तीन दिवस आधी, मी नेहमीप्रमाणे माझे आयपॅड लिहायला उघडले, तत्पूर्वी फेसबुक ओपन केले आणि समोर बघतो तर भय्यू महाराज यांची फ्रेंड रिक्वेस्ट, ती नाकारणे मला स्वप्नातही शक्य नव्हते, क्षणार्धात आम्ही फेसबुक फ्रेंड देखील झालो…
उदय निरगुडकरांसारख्या अनेक मान्यवरांना उगाचच वाटायचे कि ते केवळ त्यांनाच ‘ दादा ‘ म्हणायचे, असे अजिबात नव्हते, त्यांच्या तोंडात बसलेले ते टोपण नाव होते आणि चतुर महाराज हे तोंडात बसलेले टोपणनाव एखाद्याला आपलेसे करायचे झाल्यास हमखास वापरायचे, ते माझ्याशी देखील दादा याच टोपण नावाने बोलायचे, जाण्यापूर्वी त्यांनी जणू फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मला तेच सूचित होते कि, दादा मी निघतो आहे पुन्हा न भेटण्यासाठी तत्पूर्वी कट्टी संपवून आपली आता पक्की, मी अर्थात त्यांच्या समोर फार लहान असल्याने मैत्री नाकारण्याचा प्रश्न नव्हताच, मी ती रिक्वेस्ट लगेच स्वीकारली, आणि बातमी कानावर आल्यावर ‘ पुन्हा स्वीकारलेल्या या मित्राचे ‘ हे असे निघून जाणे, त्याक्षणी, म्हणजे पहिल्यांदा बातमी कानावर आली तेव्हा ढसा ढसा रडण्यापलीकडे माझ्या हातात काहीही उरलेले नव्हते…त्यांच्याविषयी कितीतरी कडू-गोड आठवणी आहेत पण जे मी झी २४ तास वर अजित चव्हाण आणि पडद्यामागे याच वाहिनीच्या प्रसाद काथे या अत्यंत आवडत्या तरुण मित्रांना म्हणालो तेच येथेही, गेलेल्या व्यक्तीविषयी कधीही वाईट बोलायचे नसते, मी ते यापुढे शक्यतो पाळणार आहे. मी, झी २४ तासच्या या मित्रांना किंवा अगदी टीव्ही ९ वर बोलावणे आले कि तेथल्याही सचिन परब सारख्या मित्रांना हेच सांगत आलोय, का रे मला बोलविता, अनेक तथाकथित मान्यवरांच्या त्यातून भुवया उंचावतात, तुम्ही पण निरगुडकरांसारखे सावध असलेले बरे…
www.vikrantjoshi.com
अजित चव्हाण म्हणाले ते शंभर टक्के योग्य होते, मी महाराजांचा शत्रू होतो म्हणून नव्हे तर दरवेळी लोकांच्या अनेकांच्या भक्तांच्या देवाचे वागणे चुकू नये त्यांचे महत्व कमी होऊ नये म्हणून माझे ते अगदी कळवळून ते लिखाण असायचे, अगदी प्रत्यक्ष भेटीत देखील किंवा फोनवरून देखील ते जे चुकायचे, मी त्यांना कोणताही मुलाहिजा न ठेवता सांगून मोकळा होत असे, जसे एकदा मी त्यांना म्हणालो कि महाराज, भक्तांना आपला देव वारंवार आजारी पडतो हे न भावणारे असते त्यासाठी तुम्ही मला एक वचन द्यायचे आहे, यापुढे सतत स्वतः दोन दोन हजार किलोमीटर कार ड्राइव्ह करणे तुम्हाला थांबवायचे आहे, ते एकतर अतिशय रिस्की असते आणि त्या थकव्याने तुमचे विनाकारण नको ते आजारपण बळावते, त्यांनी ते तदनंतर बऱ्यापैकी पाळले होते..परवा नागपुरातले ‘ गांधी ‘ गिरीश गांधी फोनवरून मला जे महाराजांविषयी म्हणाले ते मनाला तंतोतंत पटले आणि त्यांना जे अतिशय जवळून बघणारे होते त्यांनाही ते पटणारे आहे कि महाराजांची अवस्था गाईड मधल्या देवानंद सारखी होती म्हणजे त्यांना कमालीचे ग्लॅमरस वागणे आवडायचे आणि लोकांनी तर त्यांना देव करून सोडलेले होते, शेवटपर्यंत ते याच द्विधा, काहीशा गोंधळलेल्या म्हणाला तर अवस्थेत आणि म्हणलं तर मनस्थितीत जगले, त्यांना त्यातले नेमके एक वागता आले नाही, त्यांना धड देव होता आले नाही किंवा एखाद्या फिल्मी हिरो सारखे भयमुक्त स्वच्छंद जगता आले नाही, शेवटी जे या अशा द्विधा स्वभावाच्या त्यातून अत्यंत अत्यंत हळव्या मनाच्या व्यक्तीचे घडते, तेच त्यांचे झाले, त्यांनी आत्महत्या करून घेतली, साधू संतांनी पदरी कधी रिव्हॉल्वर बाळगायची असते का, पण हे असे त्यांचे चंचल वागणे होते..
आणखी एक अतिशय महत्वाचे सांगतो, जेव्हा एखादे व्यक्तिमत्व मोठे होते, आभाळाला टेकते तेव्हा अशा व्यक्तीने मोठे होतांना आणि मोठे झाल्यावर देखील आपले कुटुंब आपले घर आधी सांभाळायचे असते आणि त्यापुढे जाऊन आणखी एक सांगतो, कुटुंब सदस्यांनी देखील अशा उत्तुंग व्यक्तीला त्याच्या गुण दोषांसहित स्वीकारून त्याला मनापासून साथ द्यायची असते जे मी माझ्या घरात देखील सांगत असतो आणि तेच अनेकदा माझ्या स्वतःच्या घरी देखील घडते म्हणजे त्यांचे अनेकदा मला नको तेवढा त्रास देणे विनाकारण सुरु असते. मोठ्या व्यक्तींच्या घरातल्या सदस्यांनी त्यांना अचानक चालून आलेले हे असे भव्य सुख पचवायचे असते अन्यथा सर्वांचे प्रमोद महाजन होणे अपरिहार्य असते, भय्यू महाराज किंवा प्रमोद महाजन यांच्या ते जीवावर बेतले, ते आणि त्यांचे कुटुंब उध्वस्त झाले, त्यांच्यासारखे असे कितीतरी माझ्या पाहण्यात आहेत त्यात अधिकारी आणि पुढारी तर मोठ्या प्रमाणावर आहेत, फक्त त्यांचा अद्याप भय्यू महाराज आणि प्रमोद महाजन झालेला नाही एवढाच काय तो फरक, फक्त त्यांनी आत्महत्या केलेली नाही किंवा त्यांची हत्या झालेली नाही एवढाच काय तो डिफरंस…
ते साधू संत बुवा होते त्यामुळे त्यांच्या भोवताली तरुण बायका जमा होणे स्वाभाविक असते हे विवाहाआधीच डॉ. आयुषी यांनी ध्यानात घेऊन लग्न करायचे होते पण जी व्यक्ती ज्या पद्धतीने बोलून आपल्याला गटविते पटविते तो नवरा इतरांशी देखील तसेच वागतो आणि तेच करणार आहे हे प्रेमविवाह करणाऱ्या बहुतेक साऱ्याच स्त्रियांना नेहमी वाटत असते आणि तेच दिवंगत माधवी वहिनींना आणि अलीकडे डॉ. आयुषी यांना देखील कायम भय्यू महाराज यांच्या बाबतीत वाटायचे त्यातून त्या दोघींचे त्यांच्याशी पटले नाही आणि हे घडले, त्यातले एकही सुखी झाले नाही, नुकसान मात्र त्यांच्या अपत्यांचे झाले…
महाराज तेथे तरी आता आराम करा, शांत चित्ताने रहा, तुमच्या जाण्याने माझे,आमच्या सर्वांचे मन अतिशय अस्वस्थ आहे, तुमचे जाणे यापुढे दरदिवशी मनाला छळणारे असेल, तुम्हाला मनापासून श्रद्धांजली…
पत्रकार हेमंत जोशी