मंत्री हे असे कसे आहेत ? पत्रकार हेमंत जोशी
माणसाने रामदास कदमांसारखे आरंभशूर असू नये, आर. आर आबांसारखेच असावे, वागावे. आमिषे आणि दबाव यांची रीघ लागूनही दिवंगत आबांनी ना डान्स बार सुरु केलेत ना गुटखा बंदी उठवू दिली, तेच त्या वन आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे, तेही आरंभशूर ठरले नाहीत, करोडो झाडे लावण्याचा केवळ संकल्प करून ते स्वस्थ शांत बसले नाहीत तर लावलेली झाडे जगताहेत किंवा नाही याकडे देखील त्यांचे लक्ष असते. मी मागे एकदा भाऊंना गप्पांच्या ओघात गमतीने म्हणालो होतो, केवळ झाडे लावू नका, ती जगवा, नाहीतर बघा, तुमचे महाविद्यालयातले प्रेमप्रकरण काढून मोकळा होईल. अर्थात हे सारे लटक्या रागाने, जो माणूस स्वतःच्या पत्नीकडे देखील अनंत काळाची माता म्हणून बघतो, त्याची कसली आलीत लफडी…
प्लास्टिक बंदी च्या बाबतीत असे अजिबात घडले नाही, मंत्री कदमांनी निर्णय दणक्यात घेतला, पाठ थोपटून घेतली पण आता केवळ नावापुरती प्लास्टिक बंदी दिसते, आबांच्या पश्चात त्या गुटखा बंदीसारखी, शेवटी राज यांनी केलेले आरोप नेमके निघाले, नाव रामदास यांचे नव्हे उद्धवजींचे ज्यादा खराब होते आहे, त्यांनी कदमांना दम भरून सांगायला हवे, खबरदार, राज्यात प्लास्टिक चा चिटोरा देखील बघायला मिळाला तर…
उद्धवजी अनेकदा त्यांचे नाव खराब होणार नाही याची फारशी काळजी घेतांना दिसत नाही त्यामुळे त्यांच्या मंत्र्यांनी हवा तसा प्रभाव पडला नाही, स्वतःची घरे भरण्याची तेवढी काळजी घेतली, त्यांच्याच एका तिरसट स्वभावाच्या मंत्र्याने तर निघालेल्या नालायक मुलांचे मंत्री झाल्यानंतर मोठमोठाल्या रकमांचे खात्याला कि खात्यांना लुटून मोठे सेफ डिपॉझिट करून घेतले, त्यांना आपल्या खात्याच्या भरवशावर व्यवसायात स्थिर केले. त्या मंत्र्याला उगाचच वाटते, डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखे कि पत्रकारांना म्हणजे आम्हाला काही कळत नाही, ज्यादिवशी पुरावे मांडेल, त्या मंत्र्याला कदाचित आत्महत्या करावी लागेल….
अलीकडे मला पुण्यातून माझ्या एका हॉटेलीयर मित्राचा फोन आला, त्याने एक टेप केलेले संभाषण ऐकवले. त्या मित्राने पुण्यात नव्याने सुरु केलेल्या हॉटेलसाठी त्याला दारू विक्रीचा परवाना हवा आहे, त्या साठी चंद्रशेखर बावनकुळे यांचे पीए, नातेवाईक आहे सांगून लुटणाऱ्या, त्यांच्या जवळपास राहणाऱ्या व्यक्तीचे संभाषण ऐकवले, परवानगी हवी असेल तर २१ लाख रुपये मोजावे लागतील, असे ते धमकी वजा संभाषण होते, पैसे देऊ का, विचारण्यासाठी त्याने मला फोन केला होता. मी त्याला तात्काळ सांगितले, अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे, थेट स्वप्नात देखील चंद्रशेखर बावनकुळे या क्षुल्लक कामासाठी पैसे अगदी शंभर टक्के स्वीकारणार नाहीत, दुसरे म्हणजे परमिट रूम च्या परवानगीसाठी उद्या तुम्ही या खात्यातले एक प्रस्थ विशवनाथ इंदिसे यांच्याकडे जरी चौकशी केली तरी ते स्वतः कमालीचे वादग्रस्त असूनही हेच सांगतील, परवान्यासाठी एवढे पैसे मोजायचे नसतात…
पुढले महत्वाचे म्हणजे या खात्यातील साऱ्या बदमाशांचा खतरनाक बाप चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांनी परस्पर संमतीने तेथे आणून ठेवला आहे, आणि त्या पराक्रमी आणि देशभक्त प्रशासकीय अधिकाऱ्याचे, आयुक्तांचे नाव आहे, श्रीमती अश्विनी जोशी. अश्विनी यांना असे कळले जरी कि त्यांच्या खात्यात हे असे घडते आहे म्हणजे हॉटेल परमिट रूम साठी तब्बल २१ लाख रुपये मोजावे लागताहेत, ती समोरच्या संबंधित अधिकाऱ्याला, भीमासारखी थेट वर उचलेल आणि खालच्या
मजल्यावर फेकून मोकळी होईल…
त्याला पुढे म्हणालो, राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित जी कामे असतात ती सारी कामे बावनकुळे यांचे अतिशय बुद्धिमान सावध आणि विश्वासू सहकारी समीर बाक्रे जातीने लक्ष घालून पुढे नेतात, मंत्र्यांचे नाव खराब होणार नाही याची ते अतिशय काळजी घेतात त्यामुळे बाक्रे यांना न विचारता देखील मी हे ठामपणे सांगू शकतो कि ते या अशा कामांसाठी कधीही पैसे मागून मंत्र्यांचे नाव खराब होऊ देणार नाहीत, माझे सांगणे, मी जातीने चौकशी केल्यानंतर खरे निघाले, याउलट त्या पीए ने साहेबांच्या नावाने केलेल्या भानगडींची जंत्रीच माझ्यासमोर आली.शेवटी, मित्राला हेच सांगितले, आवश्यक आहेत ती कागदपत्रे घेऊन थेट आयुक्तांकडे जा, त्या तुझ्याकडे ढुंकून देखील न बघता एकदा का कायद्यात बसले कि तुझे काम तेथल्या तेथे करून मोकळ्या होतील, शेवटी त्याही ‘ जोशी ‘ आहेत. सुरुवात तर झाली आहे, केली आहे, मंत्र्यांच्या भानगडी सांगायला. आगे आज देखो, मी काय लिहिणार आहे ते..
तूर्त एवढेच:
पत्रकार हेमंत जोशी